Small Savings Schemes: सुकन्‍या समृद्धी, PPF, SCSS की KVP; तुमच्यासाठी कोणता पर्याय आहे योग्य ?

Small Savings Schemes: सुकन्‍या समृद्धी, PPF, SCSS की KVP; तुमच्यासाठी कोणता पर्याय आहे योग्य ?

सरकारकडून अनेक छोट्या बचत योजना (Small Savings Scheme) चालवल्या जात असतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही योजनांची माहिती देणार आहोत, की ज्यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला निश्चित परतावा (Guaranteed Returns) मिळू शकेल.

  • Share this:

नवी दिल्ली 03 एप्रिल : केंद्र सरकारकडून अनेक छोट्या बचत योजना (Small Savings Scheme) चालवल्या जात असतात. सर्वसामान्य नागरिकांना एकदम मोठी बचत करणं शक्य होत नाही, म्हणून त्यांच्या उत्पन्नातला अगदी छोटा वाटाही त्यांना वेळोवेळी बचतीसाठी वापरता यावा. या हेतूने या योजना सुरू आहेत. या योजनांचे व्याजदर सर्वसाधारण व्याजदरांच्या तुलनेत थोडे अधिक असतात आणि त्यात दर तिमाहीला सुधारणा केली जात असते. एक एप्रिल 2021 रोजी सुरू झालेल्या नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय 31 मार्च रोजी जाहीर झाला होता; मात्र तो 12 तासांतच मागे घेण्यात आला. त्यामुळे मागील तिमाहीत जे व्याजदर होते, तेच आता पुढच्या तिमाहीतही लागू राहणार आहेत. या योजनांमध्ये वार्षिक 4 ते 7.6 टक्क्यांपर्यंत व्याज मिळतं. आज आम्ही तुम्हाला अशा काही योजनांची माहिती देणार आहोत, की ज्यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला निश्चित परतावा (Guaranteed Returns) मिळू शकेल.

त्यात किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि सुकन्या समृद्धी योजना आदींचा समावेश आहे. यापैकी कोणत्या योजनेत तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर त्यात किती व्याज मिळेल, हे जाणून घ्या.

सुकन्या समृद्धी योजना (SS)

ही योजना केवळ 10 वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी असून, लोकप्रिय आहे. एक एप्रिल 2021पासून नवा व्याजदर लागू होणार असून, तो 7.6 टक्के आहे. या योजनेअंतर्गत कोणीही व्यक्ती आपल्या दोन मुलींच्या नावाने खातं उघडू शकते. मुलींच्या 21व्या वर्षी या खात्यातून पैसे काढता येतात. या योजनेत सध्याच्या व्याजदरानुसार नऊ वर्षं चार महिन्यांत रक्कम दुप्पट होते.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) ही लोकप्रिय करबचत योजना आहे. यात केलेली गुंतवणूक 15 वर्षांनी मॅच्युअर होते. पीपीएफमध्ये केलेल्या गुंतवणुकीला पाच वर्षांचा लॉक-इन पीरियड असतो. त्यात वर्षाला कमीत कमी 500 रुपये गुंतवणूक करणं गरजेचं असतं. सध्या या योजनेत 7.1 टक्के दराने व्याज दिलं जात आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)

ज्या नागरिकांचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक (Senior Citizens) असतं, ते एकदाच 15 लाख रुपयांची गुंतवणूक करून नियमित उत्पन्न मिळवू शकतात. ज्येष्ठ नागरिक दाम्पत्य मिळून 30 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक या योजनेत करू शकतं. या योजनेतही पाच वर्षांचा लॉकइन पीरियड असतो. म्हणजेच गुंतवणूक केल्यापासून पाच वर्षांपर्यंत यातून पैसे काढता येत नाहीत. सध्या या योजनेत 7.4 टक्के दराने व्याज मिळत आहे.

किसान विकास पत्र (KVP)

किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) योजनेत किमान एक हजार रुपये भरून खातं उघडता येतं. सध्या या योजनेत दर साल दर शेकडा 6.9 दराने व्याज मिळत आहे. किसान विकास पत्रात गुंतवणूक केली, तर गुंतवणूक 10 वर्षं चार महिन्यांत गुंतवणूक दुप्पट होते, असा दावा केला जातो.

Published by: Kiran Pharate
First published: April 3, 2021, 4:22 PM IST

ताज्या बातम्या