मराठी बातम्या /बातम्या /मनी /

लीज-रेंट अ‍ॅग्रीमेंटमधला फरक माहिती आहे का? कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी घ्या पुरेशी काळजी

लीज-रेंट अ‍ॅग्रीमेंटमधला फरक माहिती आहे का? कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी घ्या पुरेशी काळजी

लीज-रेंट अ‍ॅग्रीमेंट

लीज-रेंट अ‍ॅग्रीमेंट

घर किंवा कार भाडेतत्त्वावर घेताना संबंधित मालकासोबत लीज करावं की रेंट अ‍ॅग्रीमेंट असा प्रश्न अनेकांना पडतो. खरं तर लीज आणि रेंट अ‍ॅग्रीमेंटमध्ये बराच फरक आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने अनेक जण मोठ्या शहरांमध्ये वास्तव्य करतात. अशा व्यक्तींना पुरेशा उत्पन्नाअभावी स्वमालकीचं घर घेणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर भाडेतत्त्वावर घर घेण्याचा पर्याय असतो. घर भाड्यानं घेण्यापूर्वी संबंधित घरमालकासोबत करार अर्थात अ‍ॅग्रीमेंट केलं जातं. घराप्रमाणेच कार भाडेतत्त्वावर घेण्यासाठीदेखील अ‍ॅग्रीमेंट केलं जातं; पण बऱ्याचदा कार किंवा घर भाडेतत्त्वावर घेताना लीज करावं की रेंट अ‍ॅग्रीमेंट करावं असा संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण होतो. या दोन्हींमध्ये फरक असतो. तसंच लीजचे अनेक प्रकारदेखील आहेत.

घर किंवा कार भाडेतत्त्वावर घेताना संबंधित मालकासोबत लीज करावं की रेंट अ‍ॅग्रीमेंट असा प्रश्न अनेकांना पडतो. खरं तर लीज आणि रेंट अ‍ॅग्रीमेंटमध्ये बराच फरक आहे. तुम्ही 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी एखादी गोष्ट भाड्याने घेतली तरच रेंट अ‍ॅग्रीमेंट अर्थात भाडेकरार करणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ, आपण ओला किंवा उबरची कॅब एक, दोन किंवा पाच दिवसांसाठी भाडेतत्त्वावर घेतो. ऑफिसमध्ये कामासाठी एखादा कम्प्युटर दहा, 20, 25 किंवा 30 दिवसांसाठी बाहेरून मागवतो. रेंट अ‍ॅग्रीमेंट हे 11 महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी तयार केलं जातं. सर्वसामान्यपणे घरासाठीचं रेंट अ‍ॅग्रीमेंट हे 11 महिन्यांसाठीच असतं.

एखादी गोष्ट, वस्तू आपण जास्त काळ म्हणजेच एक वर्षापेक्षा जास्त म्हणजे सुमारे दहा ते 15 वर्षांपर्यंत वापरण्यासाठी घेणार असू तेव्हा लीज तयार केलं जातं. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या व्यवसायाकरिता ऑफिससाठी जागा भाडेतत्त्वावर घेता, तेव्हा लीज अ‍ॅग्रीमेंट केलं जातं. तसंच विमान कंपन्या 10 ते 15 वर्षांसाठी विमानं लीजवर घेतात. कन्स्ट्रक्शन कंपन्या वेगवेगळ्या मशीनरी लीजवर घेतात. तुम्ही एखादी मालमत्ता, वस्तू दीर्घ कालावधीसाठी भाडेतत्त्वावर घेतली, तर त्यासाठी लीज अ‍ॅग्रीमेंट केलं जातं. याला लीज डीड असंही म्हणतात.

हेही वाचा - Birthday Status In Marathi : प्रियजनांचा वाढदिवस करा आणखी विशेष, अशा द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

लीज अ‍ॅग्रीमेंटचे काही प्रकार आहेत. यात आर्थिक लीज, विक्री आणि लीज बॅक, थेट लीज, ओपन एंडेड लीज, क्लोज एंडेड लीज , एकल गुंतवणूकदार लीज, आंतरराष्ट्रीय लीज, डोमेस्टिक लीज, लीव्हरेज्ड लीज यांचा समावेश होतो. लीज आणि रेंट अ‍ॅग्रीमेंटचा विचार करता, लीज हे नेहमी दीर्घकालीन, तर रेंट अ‍ॅग्रीमेंट अल्पकालीन असतं.

लीज आणि रेंटचा तुलनात्मक विचार करायचा झाल्यास लीजसाठी एएस-19 असं लेखा मानक असतं, तर रेंटसाठी कोणतंही विशिष्ट लेखा मानक नसतं. लीजचा कालावधी दीर्घ, तर रेंटचा अल्प असतो. लीजमध्ये देवाणघेवाण करणारे घटक मर्यादित किंवा अल्प असतात. रेंटमध्ये जमीन मालक आणि भाडेकरू असे दोन घटक असतात. लीजमध्ये देखभाल-दुरुस्ती भाडेपट्टीच्या प्रकारावर अवलंबून असते. रेंटमध्ये दुरुस्ती ही घरमालकावर अवलंबून असते. लीज अ‍ॅग्रीमेंट अस्तित्वात आहे तोपर्यंत कराराच्या अटींमध्ये सुधारणा करता येत नाही. रेंट अ‍ॅग्रीमेंटमध्ये कराराच्या अटींमध्ये जमीनमालक किंवा घरमालक सुधारणा करू शकतो.

याशिवाय लीज आणि रेंट अ‍ॅग्रीमेंटमध्ये काही तुलनात्मक फरक असतो. रेंट अ‍ॅग्रीमेंट आपोआप रिन्यू होऊ शकतं; पण लीज आपोआप रिन्यू होऊ शकत नाही. लीज अ‍ॅग्रीमेंटमध्ये दोन पक्ष असतात. त्यात भाडेपट्टेदार आणि भाडेकरू यांचा समावेश असतो. याउलट रेंट अ‍ॅग्रीमेंटमध्ये घरमालक आणि भाडेकरू हे भाडेपट्टीशी संबंधित पक्षकार असतात. लीजमध्ये भाडेकरू पट्टेदाराला भाडं देतो, तर रेंट अ‍ॅग्रीमेंटनुसार भाडेकरू घरमालकास भाडं देतो.

तुम्ही एखादी वस्तू लीजवर घेतली तर त्याची देखभाल करण्याची जबाबदारी तुमची असते. परंतु, तुम्ही ती रेंटवर घेतली असेल तर तिच्या देखभालीची जबाबदारी मालकाची असते. लीजवर घेतलेल्या वस्तूचं भाडं हे एकदाच ठरतं. परंतु, रेंटवर घेतलेल्या वस्तूचं भाडं महिना, दिवस किंवा तासानुसार बदलत राहतं. उदाहरणार्थ, तुम्ही 10 वर्षांसाठी एखादं ऑफिस लीजवर घेतलं तर त्याचं भाडं एकदा ठरवलं जातं. त्यात वारंवार बदल होत नाही; पण रेंटवर घर किंवा गाडी घेतली असेल तर त्याचं भाडं ठराविक कालावधीनंतर बदलू शकतं.

हेही वाचा - दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी VPF बेस्ट पर्याय; 8 टक्क्यांपर्यंत मिळतंय व्याज, कसं उघडावं खातं?

रेंट अ‍ॅग्रीमेंटमध्ये घरमालक अ‍ॅग्रीमेंट रद्द करून अल्पावधीत घर सोडण्यास सांगू शकतो; पण लीज अ‍ॅग्रीमेंटमध्ये असा प्रकार होत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या घराचं लीज 10 वर्षांसाठी असेल आणि संबंधित मालकानं पाच किंवा सात वर्षात अ‍ॅग्रीमेंट रद्द करून भाडेकरूला घर रिकामं करण्यास सांगितलं तर त्याला मोठा दंड भरावा लागू शकतो. लीजचे नियम अवधी पूर्ण होईपर्यंत बदलता येत नाहीत.

रेंट अ‍ॅग्रीमेंटमध्ये मालक कायमस्वरूपी मालकच राहतो; मात्र लीजमध्ये भाडेकरूने योग्य किंमत मोजली तर तो भविष्यात त्या संपत्तीचा मालक बनू शकतो. लीज अ‍ॅग्रीमेंट संपुष्टात येतेवेळी भाडेकरूला अवशिष्ट मूल्यावर मालमत्ता खरेदी करण्याचा पर्याय असतो. लेखांकन मानकानुसार लीजचे नियम विहित केलेले आहेत; मात्र रेंट अ‍ॅग्रीमेंटबाबत कोणतेही विशिष्ट नियम जारी केलेले नाहीत.

First published:

Tags: Money