मुंबई, 7 ऑक्टोबर : प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सेवानिवृत्तीनंतरचं नियोजन अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण यामुळे भविष्यातील मोठ्या उद्दिष्टांसाठी एक मोठी रक्कम जमवता येते. यासाठी गुंतवणुकीची, बचतीची अनेक माध्यमं आणि उत्पादनं बाजारात उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने म्युच्युअल फंड, राष्ट्रीय पेन्शन योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आदींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही अशी गुंतवणुकीची साधनं आहेत, जी विशेष लोकप्रिय आहेत. यामध्ये गुंतवणूक केल्याने केवळ आकर्षक परतावा मिळत नाही तर आयकर कपातीमध्येही फायदा होतो. ज्या गुंतवणूकदारांना जोखीममुक्त आणि खात्रीशीर रिटर्न हवे आहेत, त्यांच्यासाठी या दोन्ही योजना उत्तम पर्याय आहेत. तथापि, अनेक गुंतवणूकदार ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी अर्थात व्हीपीएफमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त करतात. व्हीपीएफ म्हणजे काय, त्यात गुंतवणुकीचे फायदे कोणते याविषयी जाणून घेऊया. ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे काय? वास्तविक व्हीपीएफ योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे (ईपीएफ) एक वेगळे स्वरूप आहे. सर्व कर्मचारी त्यांच्या पगाराच्या 12 टक्के योगदान ईपीएफमध्ये देतात. तसेच कंपन्यादेखील त्यात इतकंच योगदान देतात. पण तुमची इच्छा असेल तर ऐच्छिक भविष्य निर्वाह निधीत तुम्ही या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा करू शकता. विशेष म्हणजे व्हीपीएफवरदेखील तुम्हाला ईपीएफ इतकाच रिटर्न मिळतो. ईपीएफ आणि व्हीपीएफ अंतर्गत तुम्हाला वार्षिक 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या योगदानावर कर सवलत मिळते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ ही गुंतवणुकीची एक ऐच्छिक योजना आहे. कारण या योजनेतून चक्रवाढ व्याज मिळते. पीपीएफमध्ये एकरकमी किंवा दरमहा हप्त्याच्या स्वरूपात गुंतवणूक करता येते. परंतु, यामध्ये गुंतवणुकीची एकूण रक्कम दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. पीपीएफ आणि व्हीपीएफमध्ये कोणता पर्याय अधिक चांगला? गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे पीपीएफ आणि व्हीपीएफ असे दोन्ही पर्याय आहेत. परंतु, व्हीपीएफ हा अनेक प्रकारे पीपीएफपेक्षा चांगला पर्याय आहे, कारण व्हीपीएफमध्ये 8.1 टक्के व्याजदर आहे. पीपीएफमध्ये तुम्हाला केवळ 7.1 टक्के व्याजदर मिळेल. पीपीएफमध्ये तुम्ही कमाल 1.5 लाख रुपये गुंतवू शकता, परंतु, व्हीपीएफमध्ये गुंतवणुकीसाठी ही मर्यादा जास्त आहे. त्यामुळे दीर्घ कालावधीकरिता गुंतवणुकीसाठी व्हीपीएफ हा सर्वोत्तम पर्याय आहे. या योजनेतून तुम्हाला व्याज जास्त मिळेल तसेच अधिक रकमेवर आयकरात सवलत देखील मिळेल. वाचा - महामारीच्या काळात ‘ही’ योजना भारतासाठी बूस्टर, वर्ल्ड बँकेनंही केलं कौतुक प्रत्येकजण व्हीपीएफ अकाउंट उघडू शकतो का? केवळ नोकरदार वर्ग व्हीपीएफ अकाउंट उघडू शकतो. सर्वसामान्यपणे हे अकाउंट ईपीएफ अकाउंटसोबत सुरू केलं जातं. अकाउंट उघडण्याचं काम संबंधित कंपन्याद्वारे केलं जातं. दुसरीकडे पीपीएफ अकाउंट कोणताही नागरिक उघडू शकतो. काही मोठ्या बॅंकांमध्ये पीपीएफ अकाउंटची सुविधा उपलब्ध आहे. ऐच्छिक भविष्य निर्वाह निधीत तुम्ही सेवानिवृत्तीच्या वयापर्यंत गुंतवणूक करू शकता. तथापि, त्याचा लॉक-इन कालावधी पाच वर्षांचा आहे. याचाच अर्थ जेव्हा तुम्ही तुमचं व्हीपीएफ अकाउंट उघडता तेव्हा तुम्ही पाच वर्षांचा मूळ कालावधी पूर्ण होण्यापूर्वी ते अकाउंट रद्द किंवा बंद करू शकत नाही. नोकरी बदलल्यानंतर तुम्ही तुमचं व्हीपीएफ अकाउंट एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत हस्तांतरित करू शकता. पीपीएफ अकाउंटचा कालावधी 15 वर्षाचा असतो. व्हीपीएफवर 2022-23 या आर्थिक वर्षासाठी व्याजदर 8.1 टक्के आहे तर पीपीएफमध्ये व्याजदर तिमाही आधारावर निश्चित केला जातो. जुलै-सप्टेंबरसाठी हा दर 7.1 टक्के आहे.
पैसे काढण्याची सुविधा तुम्ही निवृत्तीनंतर किंवा दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार असाल तर यातून संपूर्ण रक्कम काढू शकता. तसेच विवाह, वैद्यकीय खर्च किंवा गृह खरेदीसाठी कर्जाच्या स्वरूपात आंशिक पैसे यातून काढता येतात. पीपीएफ योजनेत 15 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर एकूण रक्कम काढता येते. याशिवाय सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर अल्प रक्कम काढण्याची सुविधा मिळते.