मुंबई, 30 ऑगस्ट: दोन दिवसांनी नवीन महिना म्हणजेच सप्टेंबर सुरू होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून आपल्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी आणि नियमांमध्ये बदल होणार आहे. बँकिंग नियम, एलपीजीच्या (LPG) किमतींमध्ये बदल होऊ शकतो. नवीन महिना सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान योजनेशी संबंधित कामांचा निपटारा करणंही आवश्यक आहे. असे अनेक बदल आहेत, जे 1 सप्टेंबरपासून होणार (Change in Rules from September) आहेत. तुमचं एखादं महत्त्वाचं काम आतापर्यंत पूर्ण झाले नसेल, तर ते त्वरित पूर्ण करा. 1. पंजाब नॅशनल बँक केवायसी अपडेट (PNB KYC Updates): पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना बऱ्याच काळापासून KYC (Know Your Customers) अपडेट करण्यास सांगत आहे. केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट असल्याचं बँकेनं स्पष्टपणं सांगितलं आहे. बँकेनं ट्विट करून ग्राहकांना कळवलं होतं की, रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व ग्राहकांनी केवायसी अपडेट करणं आवश्यक आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी बँकेनं 31 ऑगस्ट 2022 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, जर तुमचं खाते 31 मार्च 2022 पर्यंत KYC अपडेट केलं नसेल तर ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण करा. केवायसी अपडेट करण्यासाठी, तुमच्या मूळ शाखेशी संपर्क साधा. जर तुम्ही KYC अपडेट केलं नसेल, तर तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करू शकणार नाही. 2. एलपीजीच्या किंमतीत बदल- पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीत बदल करतात. अशा परिस्थितीत एलपीजीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. वाढलेल्या किमतीपासून दिलासा हवा असेल तर आजच तुमचा एलपीजी सिलिंडर बुक करा, आजच बुक केल्यास तुम्हाला नवीन दरातून पैसे द्यावे लागणार नाहीत. 3. पीएम किसान योजना ईकेवायसी- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ई-केवायसीची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे. शेतकऱ्यांनी हे काम 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण न केल्यास त्यांचा पुढील हप्ता अडकून पडू शकतो. हेही वाचा- SSY, SCSS, NSC Vs PPF: ‘या’ पोस्ट ऑफिस बचत योजना सुपरहिट आहेत, लोकप्रियतेमध्ये पीपीएफलाही टाकलं मागं 4. टोल टॅक्स वाढणार - तुम्ही जर दिल्लीला जाण्यासाठी यमुना एक्सप्रेसवेचा वापर करत असाल तर 1 सप्टेंबरपासून अधिक टोल टॅक्स भरावा लागणार आहे. नवीन भाडेवाढीनुसार, कार, जीप, व्हॅन आणि हलकी मोटार वाहनांसाठी टोल दर प्रति किमी 2.50 रुपये वरून 2.65 किमी करण्यात आला आहे. प्रति किलोमीटर 10 पैशांची वाढ झाली आहे. हलकी व्यावसायिक वाहनं, हलकी मालवाहू वाहनं किंवा मिनीबससाठी टोल टॅक्स 3.90 रुपये प्रति किमीवरून 4.15 रुपये प्रति किमी करण्यात आला आहे. बस किंवा ट्रकचा टोल दर 7.90 रुपये प्रति किमीवरून 8.45 रुपये प्रति किमी करण्यात आला आहे. यापूर्वी 2021 मध्ये यमुना एक्सप्रेस वेच्या टोल टॅक्समध्ये वाढ करण्यात आली होती. 5. विमा एजंटचं कमिशन होणार कमी - IRDAI ने सामान्य विम्याचे नियम बदलले आहेत. आता विमा एजंटला 30 ते 35 टक्क्यांऐवजी केवळ 20 टक्के कमिशन मिळणार आहे. यामुळं लोकांच्या प्रीमियमची रक्कम कमी होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.