Home /News /money /

BSNLच्या 'या' निर्णयाने टेलिकॉम कंपन्यांची उडाली झोप, काय आहे हा निर्णय?

BSNLच्या 'या' निर्णयाने टेलिकॉम कंपन्यांची उडाली झोप, काय आहे हा निर्णय?

बीएसएनएलच्या या निर्णयाने दूरसंचार क्षेत्रातल्या कंपन्यांची झोप उडाली आहे.

    नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : देशातल्या दूरसंचार क्षेत्रातली एक महत्त्वाची सरकारी कंपनी (Government Telecom Company) म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल (BSNL). देशातल्या नागरिकांना दूरध्वनी या सुविधेची ओळख करून दिली ती बीएसएनएलने. मोबाइलचा सुळसुळाट होईपर्यंत दूरसंचार क्षेत्रात फक्त आणि फक्त बीएसएनएलचं वर्चस्व होतं. मोबाइल (Mobile) आल्यावर मात्र बीएसएनएलच्या या साम्राज्याला उतरती कळा लागली. अर्थात कालानुरूप बदल करत बीएसएनएलने मोबाइल सेवा क्षेत्रात प्रवेश करून या क्षेत्रातलं आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं; मात्र तिची कामगिरी इतरांच्या तुलनेत कमकुवतच राहिली आहे. आता दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर बीएसएनएलने 4G सेवा दाखल करण्याची तयारी केली असून, यासाठी कंपनीने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसबरोबर (TCS) भागीदारी केली आहे; मात्र अद्याप ही सेवा दाखल करण्याची नेमकी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. बीएसएनएल या वर्षी याची घोषणा करू शकतं, असा अंदाज काही माध्यमांनी वर्तवला आहे. बीएसएनएलच्या या निर्णयाने दूरसंचार क्षेत्रातल्या कंपन्यांची झोप उडाली आहे. 'मनीकंट्रोल'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. 'बीएसएनएलने संपूर्ण देशात 1 लाख टॉवर, तर 40 हजार टॉवर फक्त बिहारमध्ये बसवण्याची योजना आखली असून, कंपनी स्मार्ट टॉवरऐवजी मोनोपोल वापरणार आहे. ते स्वस्त, तसंच अधिक प्रभावी आहेत. फोर जी सेवेसाठी कंपनीने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसबरोबर (TCS) भागीदारी केली आहे. फोर जी सेवेसाठी भारतीय तंत्रज्ञान वापरण्याची ही पहिलीच वेळ असेल. दिल्ली आणि मुंबईमध्ये कंपनी फोर जी सेवा प्रदान करणार आहे,' अशी माहिती कंपनीच्या कंझ्युमर मोबिलिटी विभागाचे संचालक सुशील कुमार मिश्रा यांनी दिली. 'बीएसएनएलचे प्लॅन खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त आहेत. त्यामुळे कंपनीचा ग्राहक वर्ग वाढत आहे. केवळ डिसेंबर महिन्यातच, बीएसएनएलचे नवीन 11 लाख ग्राहक झाले आहेत,' असंही मिश्रा यांनी सांगितलं. हे ही वाचा-सीनियर सिटिजन्ससाठी या बँकांमध्ये खास सुविधा, सुरक्षेसह मिळेल अधिकचे व्याज सध्या बीएसएनएल थ्रीजी (3G) कनेक्टिव्हिटी आणि ब्रॉडबँड (Broadband Service) सेवा देत असून, इतर कंपन्यांच्या तुलनेत त्याचे दर अत्यंत किफायतशीर आहेत. त्यामुळे बीएसएनएलकडून या सेवा घेणाऱ्या ग्राहकांची संख्याही मोठी आहे. विशेषत: ग्रामीण भागात कंपनीचं नेटवर्क दूरवर पसरलेलं असल्यानं तिथं बीएसएनएलला फार स्पर्धा नाही. अर्थात, फोर जी मोबाइल कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत एअरटेल (Airtel), व्होडाफोन (Vodafone), आयडिया (Idea) आणि जिओ (Jio) इत्यादी खासगी कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएल एक पाऊल मागे आहे. या खासगी दूरसंचार कंपन्या अनेक वर्षांपासून फोर जी सेवा देत आहेत. आता या कंपन्या 2023 पासून फाइव्ह जी (5G) सेवा द्यायला सुरुवात करू शकतात. त्यासाठी या कंपन्यांनी चाचणीही सुरू केली आहे. तरीही जय्यत तयारीनिशी या उद्योगात उतरलेल्या बीएसएनएलला टक्कर देण्याचं आव्हान या कंपन्यांसमोर आहे.
    First published:

    Tags: BSNL, Telecom

    पुढील बातम्या