नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर : देशात महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जातात. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, हा या योजनांचा प्रमुख उद्देश आहे. सुकन्या समृद्धी योजना ही त्यापैकीच एक होय. सुकन्या समृद्धी योजना ही अर्थ मंत्रालयाची एक लहान डिपॉझिट योजना असून, ही योजना केवळ मुलींसाठी राबवण्यात येते. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत 22 जानेवारी 2015 रोजी सुकन्या समृद्धी योजनेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. मुलीच्या भविष्यातील शिक्षण आणि लग्नाचा खर्च भागवण्यासाठी सामान्य नागरिकांना तरतूद करता यावी, यासाठी ही ठेव योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून सुमारे 2.73 कोटी अकाउंट उघडण्यात आली आहेत. त्यात सुमारे 1.19 लाख कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.
सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पालक पोस्ट ऑफिस, सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या शाखा तसंच एचडीएफसी बॅंक, अॅक्सिस बॅंक आणि आयसीआयसीआय बॅंक या खासगी क्षेत्रातील बॅंकेत अर्ज करून अकाउंट सुरू करू शकतात. मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक हे या योजनेसाठी अकाउंट सुरू करू शकतात. या योजनेसाठी संबंधित मुलीचं वय 10 वर्षांपेक्षा कमी असावं. तसंच या योजनेच्या लाभासाठी केवळ एक अकाउंट सुरू करता येईल. तसंच एका कुटुंबाला या योजनेसाठी फक्त दोन अकाउंट सुरू करता येतील. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 21 वर्षं आहे.
NPS Scheme: सबस्क्रायबरच्या मृत्यूनंतर नॉमिनी बदलता येईल का? या योजनेत गुंतवणूक केल्यास पालकांना करसवलत मिळते. या योजनेसाठी 7.6 टक्के असा व्याजदर आहे. या योजनेसाठी अकाउंट सुरू करताना तुम्हाला पहिली डिपॉझिटची रक्कम रोख, धनादेश किंवा डिमांड ड्राफ्टच्या स्वरुपात भरावी लागते. तुम्ही पहिल्यांदा कमीतकमी 250 रुपये भरून खातं उघडू शकता. तसंच वर्षाला 250 ते 1.5 लाख रुपये या अकाउंटमध्ये भरता येतात. समृद्धी सुकन्या योजनेचं अकाउंट अॅक्टिव्हेट झाल्यावर तुम्हाला पासबुक दिलं जातं. या योजनेंतर्गत तुम्ही किमान 250 रुपये तर कमाल दीड लाख रुपये प्रतिवर्षी गुंतवणूक करू शकता. या योजनेचं अकाउंट देशभरात एका पोस्ट ऑफिस किंवा बॅंक शाखेतून दुसऱ्या पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेत ट्रान्सफर करता येतं.
ही कागदपत्रं हवीत
सुकन्या समृध्दी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रं आवश्यक असतात. या योजनेच्या लाभासाठी तसेच अकाउंट सुरू करण्यासाठी मुलीचा जन्म दाखला, पालक किंवा कायदेशीर पालक अर्जदाराचा फोटो आयडी, पालक किंवा कायदेशीर पालकांचा रहिवासी पुरावा, पॅनकार्ड, व्होटर कार्ड, एसएसवाय अकाउंट सुरु करण्यासाठी फॉर्म, एकाचवेळी अनेक मुलांचा जन्म झाला असल्यास म्हणजे जुळं झालं असेल आणि एक मुलगा व एक मुलगी असेल तर त्या मुलीच्या नावे खातं काढताना वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावं लागतं. याशिवाय पोस्ट ऑफिस किंवा बॅंकेच्या गरजेनुसार अन्य कागदपत्रं लागतात.