मुंबई, 11 नोव्हेंबर: सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP हा गुंतवणूकदारांमध्ये एक पसंतीचा पर्याय म्हणून उदयास येत आहे. ऑक्टोबरमध्ये एसआयपीमध्ये विक्रमी गुंतवणूक झाली आहे. एसआयपी फ्लो ऑक्टोबरमध्ये 13,041 कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. मागील महिन्यात तो 12,976 कोटी रुपये होता. त्याच वेळी, इक्विटी योजनांमधील गुंतवणूक 9,390 कोटी रुपयांवर घसरली आहे. तर, सप्टेंबरमध्ये ती 14,100 कोटी रुपये होती. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाच्या (AMFI) आकडेवारीवरून ही माहिती प्राप्त झाली आहे. आता प्रश्न पडतो की लोक SIP मध्ये गुंतवणुकीकडे का आकर्षित होत आहेत, चला त्याबद्दल जाणून घेऊया. SIP म्हणजे काय? सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा एसआयपी हा गुंतवणुकीचा एक प्रकार आहे ज्याद्वारे तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. त्यात वेळोवेळी ठराविक रक्कम गुंतवता येते. हा कालावधी मासिक, त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक इत्यादी असू शकतो. जेव्हा तुम्ही या पद्धतीने सातत्याने गुंतवणूक करता तेव्हा तुमच्यासाठी तुमचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करणं सोपं होतं. SIP कशी काम करते? जेव्हा तुम्ही SIP द्वारे गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही ठराविक कालावधीत ठराविक रक्कम गुंतवता. या रकमेतून तुम्ही काही फंड युनिट्स खरेदी करता. तुम्ही हे दीर्घ कालावधीत करत राहिल्यास, तुम्ही फंडाच्या उच्च आणि निम्न पातळीवर गुंतवणूक कराल. म्हणजेच तुम्हाला बाजार पाहण्याची गरज नाही. मार्केट टाइमिंग ट्रॅक करणं कठीण होऊ शकते. कारण एखादी व्यक्ती चुकीच्या वेळी गुंतवणूक करू शकते. SIP मध्ये अनिश्चिततेचा प्रश्नच येत नाही. त्याची सर्वात मोठी खास गोष्ट म्हणजे यामध्ये 500 रुपये गुंतवूनही तुम्ही दीर्घ मुदतीसाठी करोडोंचा फंड बनवू शकता. हेही वाचा: इंटरनेटशिवायही करू शकता UPI पेमेंट, घरबसल्या शून्य मिनिटांत भरा वीज बिल SIP मध्ये गुंतवणुकीचे फायदे- थोडे पैसे भरून करू शकता गुंतवणुकीची सुरुवात- तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडात फक्त 500 रुपये प्रति महिना गुंतवणूक सुरू करू शकता. गुंतवणुकीचा हा एक अतिशय किफायतशीर मार्ग आहे, ज्यामध्ये तुमच्या खिशाचं कोणतंही नुकसान होत नाही. तुमचं उत्पन्न वाढत असताना, तुम्ही SIP स्टेप अप फीचरद्वारे तुमची मासिक गुंतवणूक रक्कम वाढवू शकता. म्युच्युअल फंड हाऊसेस गुंतवणूकदारांना एसआयपी टॉप-अप करण्याची परवानगी देतात. त्यामुळे, जर तुम्ही रु. 500 ते रु. 1,000 दरमहा गुंतवणुकीला सुरुवात केली, तर तुम्ही वर्षानुवर्षे अधिक गुंतवणूक करू शकता. अशा प्रकारे, तुम्ही तुमचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट लवकरच गाठाल. गुंतवणूक करण्याचा सोपा मार्ग- एसआयपी हा गुंतवणुकीचा सोपा मार्ग आहे. बहुतेक गुंतवणूकदारांप्रमाणे, तुमच्याकडे जास्त मार्केट रिसर्च आणि एनालिसिस करण्यासाठी वेळ नाही. त्यामुळं तुम्हाला फक्त त्यात एक चांगला फंड निवडायचा आहे. तुम्ही बँकेला स्टँडींग इन्स्ट्रक्शन देऊ शकता आणि SIP तुमच्या मासिक गुंतवणुकीची काळजी घेईल.
फायदे कालांतराने वाढतात- यामध्ये रुपी कॉस्ट एव्हरेजिंगची संकल्पना असते. यामध्ये, जेव्हा फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य कमी असते तेव्हा तुम्ही अधिक युनिट्स खरेदी करता आणि जेव्हा हे मूल्य जास्त असेल तेव्हा कमी युनिट्स. गुंतवणुकीचा कालावधी संपल्यानंतर तुमची किंमत वसूल केली जाते.