नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : आज आपण त्या कंपनीबद्दल बोलणार आहोत, जिने भारतातील कोट्यवधी तरुणांच्या जीवनात क्रांती घडवून आणली आहे. प्रत्येकाच्या जीवनातील दोन अत्यंत अवघड अशा कामांना सोपे काम बनवले. ती दोन्ही कठीण कामं म्हणजे चांगली नोकरी शोधणं आणि लग्नासाठी जीवनसाथी शोधणं. या दोन गोष्टी सोप्या आहेत का? नाही, ना. अनेकांसाठी इन्फो एज (Know about Info Edge) ने या दोन्ही गोष्टी सोप्या केल्या आहेत. नोकरी डॉट कॉम (Naukari.com) आणि जीवनसाथी डॉट कॉम (Jeevansathi.com) ही दोन्ही पोर्टल इन्फोएज कंपनीची प्रॉडक्ट आहेत.
ही कंपनी स्थापन करणाऱ्या व्यक्तीचे नाव संजीव बिखचंदानी (Sanjeev Bikhchandani Success Story) आहे. त्यांना 2020 मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. जर इन्फोएजबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर संजीव बिखचंदानी यांच्याबद्दल पण जाणून घ्यावं लागेल. त्यामुळे आपण प्रथम संजीव यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊ या.
वाह रे पठ्ठ्या! कंपनीनं क्रेडिट कार्ड देण्यास दिला नकार तर सुरु केली कंपनी
संजीव बिखचंदानी शिक्षण घेत असताना त्यांना वाटत होतं की आयुष्यात काहीतरी मोठं करावं. त्यांची इच्छा होती की, महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर काही काळ नोकरी करावी आणि नंतर काही मोठे काम करावं. पण नेमकं काय करायचं? याबद्दल त्यांना काहीच कल्पना नव्हती. संजीव यांनी अर्थशास्त्र विषय घेऊन बीए पदवी घेतली. 1984 मध्ये अकाउंट एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. तीन वर्षे ही नोकरी केली, 1987 मध्ये नोकरी सोडून ते अहमदाबादला आयआयएम (IIM) संस्थेत शिकण्यासाठी गेले. 1989 मध्ये, त्यांना कॅम्पस प्लेसमेंट इव्हेंटमध्ये ग्लॅक्सोस्मिथक्लाइन (GlaxoSmithKline) मध्ये प्रॉडक्ट एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी मिळाली. ही कंपनी तेव्हा हिंदुस्तान मिल्कफूड मॅन्युफॅक्चरर्स नावाने ओळखली जात असे.
संजीव यांची नोकरी चांगली चालली होती, पण काही तरी वेगळं करण्याचा त्यांचा जो हेतू होता, तो त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. वर्षभर नोकरी केल्यानंतर एक दिवस संजीव बिखचंदानी यांनी नोकरी सोडली. ते वर्ष होते 1990, आणि याच वर्षी इन्फोएजची स्थापना झाली.
पत्नीच्या पगारावर चालला होता संसार
नोकरी करताना संजीव यांना महिन्याला 8 हजार रुपये मिळत होते. 1990 मध्ये दरमहा आठ हजार रुपये कमी नव्हते. पण काहीतरी मिळवण्यासाठी तुम्हाला काहीतरी गमवावे लागतं. नोकरी सोडण्यापूर्वी त्यांनी पत्नी सुरभीसोबत चर्चा केली होती. 'आता तुझ्या पगारावर घरचा खर्च भागव, कारण मी माझी नोकरी सोडून माझे काम करणार आहे, असं त्यांनी तिला सांगितलं होतं. सुरभीचीही इच्छा होती की संजीव यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. सुरभी ही संजीव यांच्यासोबत आयआयएममध्ये शिकत होती, नंतर दोघांनी लग्न केलं.
Success Story: कधीकाळी कमवत होता अवघे 10 रुपये, आज आहे तब्बल 730 कोटींची कंपनी
दोन कंपन्यांची केली स्थापना
संजीव बिखचंदानी यांनी त्यांच्या घरातील एका खोलीत काम सुरू केले, त्यासाठी ते वडिलांना भाडेही देत होते. 1990 मध्ये त्यांनी त्यांच्या एका मित्रासोबत दोन कंपन्या स्थापन केल्या. एकाचे नाव इंडमार्क (Indmark) आणि दुसरीचं नाव इन्फोएज असं होतं. तीन वर्षे एकत्र काम केल्यानंतर, दोन्ही भागीदार 1993 मध्ये वेगळे झाले. संजीव बिखचंदानी यांच्या वाट्याला इन्फोएज ही कंपनी आली. इन्फोएजचे मुख्य काम पगाराशी संबंधित सर्वेक्षण करणं होतं. या कंपनीने सुरुवातीला सर्वेक्षण केले की कोणत्या कंपन्या एमबीए आणि इंजिनीअर यांना किती पगार देतात. ते याबाबत सविस्तर अहवाल बनवून वेगवेगळ्या कंपन्यांना विकत होते. यामधून सुरुवातीला फार उत्पन्न मिळत नसल्यामुळे संजीव यांनी अनेक संस्थांमध्ये जाऊन कोचिंग क्लासेस घेतले. यामधून त्यांना महिन्याला दोन हजार रुपये मिळत होते, त्यामधून ते स्वतःचा खर्च भागवत होते.
पुन्हा त्याच खोलीतून काम सुरू
मित्रासोबत असणारी भागीदारी संपुष्टात आल्यानंतर संजीव बिखचंदानी यांना त्याच खोलीत परत जावं लागलं जिथं त्यांनी आपले काम सुरू केलं होतं. ही खोली त्यांच्या स्वतःच्या घरातल्या नोकरासाठी होती. त्यांनी त्यांचा खर्च कमी केला. तसेच खर्च भागवण्यासाठी त्यांनी एका कंपनीत सल्लागार संपादकाची नोकरी केली. येथे त्यांनी जवळजवळ 4 वर्षे काढली.
रिक्षाचालकाच्या मुलीनं जग जिंकलं; कोल्हापूरच्या अमृताची जागतिक कंपनीत निवड
नोकरी डॉट कॉमची अशी सुचली कल्पना
तो 1996 मधील ऑक्टोबर महिना होता. आयटी एशिया प्रदर्शन (IT Asia exhibition) दिल्लीत चालू होतं. संजीव तिथे गेले. त्यांची नजर एका स्टॉलवर पडली जिथे WWW लिहिलेले होते. संजीव स्टॉलवर पोहोचले आणि चौकशी केल्यावर व्हीएसएनएल (VSNL) चे ई-मेल अकाउंट तेथे विकले जात असल्याचे समजले. संजीव यांनी अधिक माहिती घेतल्यावर विक्रेत्याने ई-मेल म्हणजे काय, आणि ते कसं वापरलं जातं, हे सांगितलं. यानंतर, त्याने इंटरनेटवर काही ब्राउझिंग देखील केले आणि जगभरातील किती माहिती इंटरनेटवर मिळू शकते हे दाखवले.
संजीव बिखचंदानी यांच्या डोक्यात तेव्हाच एक आयडिया क्लिक झाली. एचएमएममध्ये काम करीत असताना लोकांना क्लासिफाईड जाहिराती किती आवडत होत्या, याची आठवण संजीव यांना झाली. 30-40 पानांची क्लासिफाईड जाहिराती असणारे मासिके काळजीपूर्वक वाचली जात होती. बहुतेक लोक नोकरीच्या जाहिराती पाहत होते. त्या वेळी भारतात फक्त 14000 इंटरनेट युजर्स होते. मात्र, आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी इतके लोक देखील पुरेसे आहेत, असे संजीव यांचे मत होते. त्यामुळे संजीव यांनी संबंधित ई-मेल विक्रेत्याला त्यांच्यासाठी वेबसाइट बनवण्यास सांगितले. मात्र, याचे सर्व्हर यूएसमध्ये असल्याने वेबसाइट तयार करू शकत नसल्याचे विक्रेत्याने सांगितले.
जालन्याच्या डॉक्टरची कमाल! सोलर कुकीज करत महिलांना दिला रोजगार, लाखोंची उलाढाल
संजीव बिखचंदानी यांचा मोठा भाऊ अमेरिकेतील एका बिझनेस स्कूलमध्ये प्राध्यापक होता. संजीव यांनी लगेच त्यांना फोन केला आणि सांगितले की त्यांना एक वेबसाइट सुरू करायची आहे, ज्यासाठी सर्व्हर आवश्यक आहे. पण त्यासाठी पैसे नाहीत, नंतर पैसे देतील. त्यांच्या भावाने हे मान्य केले. सर्व्हरचे भाडे त्यावेळी महिन्याला 25 डॉलर होते, जे त्यांचा भाऊ देणार होता. संजीवने त्यांच्या कंपनीचा 5 टक्के हिस्सा भावाच्या नावावर हस्तांतरित केला. तसेच भारतातील आणखी दोन लोकांना कंपनीचे शेअर्स देऊन सामील केले आणि नोकरी डॉट कॉम सुरु केले.
नोकरी डॉट कॉम लाँच
वेबसाइट तयार करण्यात आली होती, परंतु ती अद्याप लाँच करण्यात आली नव्हती. 90 च्या दशकाच्या मध्यावर मंदीचा काळ सुरू झाला होता. लोकांच्या नोकऱ्या जात होत्या. संजीव आणि त्यांच्या टीमला वाटले की वेबसाइट लाँच करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यांच्या टीमने अनेक वृत्तपत्रे आणि मासिकांमधून डेटाबेस तयार केला. या डेटासह नोकरी डॉट कॉम लाँच करण्यात आले.
यापूर्वी, सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्म अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना लक्ष्य करत होते. नोकरी डॉट कॉम हे असे पहिले पोर्टल होते, जे भारतामध्ये फक्त भारतीयांना लक्ष्य करत होते. त्यावेळी भारतामध्ये इंटरनेटची सुरुवातच झाली होती. त्यानंतर अनेक वृत्तपत्रांनी इंटरनेटबद्दल बातम्या देण्यास सुरुवात केली होती. भारतातील लोकांना इंटरनेटबद्दल माहिती देण्यासाठी काही भारतीय उदाहरणेही देणे आवश्यक होते, त्यासाठी नोकरी डॉट कॉमचे नाव वापरले जात होते. त्यामुळे संजीव यांना आपल्या वेबसाईटच्या प्रमोशनसाठी कोणताही खर्च करावा लागला नाही.
पहिल्या वर्षी झाला होता अडीच लाखांचा व्यवसाय
पहिल्या वर्षी नोकरी डॉट कॉमने फक्त 2.5 लाख रुपयांचा व्यवसाय केला. तर 80 टक्के नोकऱ्या मोफत उपलब्ध करुन दिल्या. पुढच्या वर्षी 18 लाखांचा व्यवसाय झाला, म्हणून लोकांनी संजीव बिखचंदानी यांना फोन करून पोर्टलसाठी निधी देण्याची तयारी दाखवली. पण बिखचंदानी यांनी त्यास नकार दिला, कारण त्यांना वाटत होते की निधी नसतानाही कंपनी चांगली कामगिरी करत आहे. पण स्पर्धा वाढत असल्यामुळे त्यांनी अखेर 2000 मध्ये त्यांनी आयसीआयसीआय व्हेंचर्सकडून 7.3 कोटींचा फंड घेतला आणि त्या बदल्यात त्यांना 15 टक्के भागभांडवल दिले. आज इन्फोएज चे मूल्यांकन 85,760 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.े
विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक
2006 मध्ये, बॉम्बे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होणारी भारतातील पहिली डॉट कॉम कंपनी नोकरी डॉट कॉम ही बनली. इन्फोएजने नंतर जीवनसाथी डॉट कॉम (Jeevansathi.com) सुरू केले. जीवनसाथी शिवाय कंपनीकडे नोकरीगल्फ (naukarigulf.com), शिक्षा (Shiksha.com), 99 एकर (99acres.com) आणि फर्स्टनोकरी (Firstnaukari.com) पोर्टल्स आहेत. एवढेच नाही तर कंपनीने झोमॅटो, व्हेकेशन लॅब्स, उन्नती आणि पॉलिसी बाजार इत्यादी बर्याच मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Success story