नवी दिल्ली, 30 जुलै: मोबाइल विश्वात आणि त्याद्वारे संपूर्ण जगभरात क्रांती घडवून आणलेले तंत्रज्ञ अशी स्टीव्ह जॉब्ज (Steve Jobs) यांची ओळख आहे. 'अॅपल'ची (Apple) स्थापना करून जॉब्ज यांनी कार्यपद्धतीच्या व्याख्याच बदलून टाकल्या आहेत. दरम्यान या स्टीव्ह जॉब्ज यांनी स्वतःला जॉब मिळवण्यासाठी ऑफलाइन स्वरूपात, स्वतःच्या हाताने अर्ज (Handwritten Job Application by Steve Jobs) लिहला होता. त्या काळाचा विचार करता यात काही नवल नाही; मात्र जॉब्ज यांनी पुढे केलेल्या कार्यामुळे त्यापूर्वीच्या त्यांच्या या कृतीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यांनी नोकरी मिळवण्यासाठी स्वतः हाती लिहिलेल्या अर्जाचा नुकताच लिलाव (Auction) झाला आणि त्याला तब्बल 34300 डॉलर्स म्हणजेच 2.5 कोटी रुपये एवढी मोठी किंमत मिळाली.
स्टीव्ह जॉब्ज 18 वर्षांचे होते तेव्हा म्हणजेच 1973 साली त्यांनी नोकरीसाठी केलेला हा अर्ज आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या आयुष्यात त्यांनी नोकरी मिळण्यासाठी केलेला हा एकमेव अर्ज असल्याचं सांगण्यात येतं.
आयुष्यातली पहिली नोकरी मिळवताना प्रत्येकाच्या मनात जे चालू असतं, तेच जॉब्ज यांनीही अनुभवलं होतं. आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसेन्स असल्याचं जॉब्ज यांनी अर्जात नमूद केलं आहे. जॉब यांच्या नोकरीच्या अर्जाचा लिलाव होण्याची ही तिसरी वेळ होती. यंदाच्या मार्च महिन्यात याच अर्जाला लिलावात 162000 जीबी पौंड म्हणजेच 1.7 कोटी रुपये एवढं मूल्य मिळालं होतं. त्यापूर्वी 2017 साली न्यूयॉर्कमध्ये बॉनहॅम्समध्येही त्याचा लिलाव झाला होता.
हे वाचा-पाकिस्तानचा दुतोंडीपणा चव्हाट्यावर, चीनसोबत संगनमत करून तालिबानला मदत
या वेळचा लिलाव मात्र वेगळा होता. कारण या वेळी प्रत्यक्ष स्वरूपातल्या अर्जासोबत NFT अर्थात नॉन फंजिबल टोकन स्वरूपातला म्हणजेच डिजिटल अर्जही लिलावासाठी ठेवण्यात आला होता. या स्वरूपातला अर्ज उपलब्ध असल्यानेच विन्थ्रॉप व्हेंचर्सतर्फे (Winthrope Ventures) या वेळचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. प्रत्यक्ष स्वरूपातल्या अर्जासाठी अमेरिकी डॉलर्समध्ये बोली लावण्यात आली होती, तर NFT स्वरूपातल्या अर्जाचा लिलाव Ethereum चा वापर करून करण्यात आला. डिजिटल स्वरूपातल्या जागतिक पेमेंट्ससाठी Ethereum ही यंत्रणा वापरली जाते.
हे वाचा-तालिबाननं दानिश सिद्दीकींची हत्या कशी केली? सुन्न करणारी माहिती आली समोर
लिलावादरम्यान डिजिटल स्वरूपातल्या अर्जाला जास्त किंमत मिळते की प्रत्यक्ष प्रिंट स्वरूपातल्या अर्जाला, या प्रश्नाचं उत्तर लिलावाच्या आयोजकांना शोधायचं होतं. त्यात असं दिसून आलं, की प्रिंट स्वरूपातल्या अर्जाला डिजिटल स्वरूपातल्या अर्जापेक्षा चौपट अधिक किंमत मिळाली. याचाच अर्थ असा, की लोकांना डिजिटलपेक्षा स्टीव्ह जॉब्ज यांनी स्वतः हाती लिहिलेल्या प्रत्यक्ष अर्जात जास्त रस होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Apple, Inspiration