मुंबई, 15 सप्टेंबर : देशातली सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँकेनं त्यांचा बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (BPLR) 70 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.7 टक्क्यांनी वाढवून 13.45 टक्के केला आहे. बँकेच्या या घोषणेनंतर BPLR शी निगडित असलेली स्टेट बँकेकडून दिली जाणारी सर्व प्रकारची कर्जं महाग होणार आहेत. जूनमध्ये झालेल्या बदलानंतर सध्या स्टेट बँकेचा BPLR 12.75 टक्के आहे. त्या वेळी रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानंतर BPLRमध्ये वाढ करण्यात आली होती. आता त्यात पुन्हा वाढ करण्यात आली असून, 15 सप्टेंबरपासून सुधारित दर म्हणजेच 13.45 टक्के (वार्षिक) BPLR लागू होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. बँकेने 13 सप्टेंबर रोजीच बेस रेटमध्येही (Base Rate) एवढीच वाढ केली होती. त्यामुळे त्यानंतर बेस रेटवर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या EMI मध्ये वाढ झाली आहे. बेस रेट हा कर्ज देण्यासाठीचा जुना बेंचमार्क आहे. आता मात्र बहुतांश बँका एक्स्टर्नल बेंचमार्क बेस्ड लेंडिंग रेट (EBLR) किंवा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) या आधारावर कर्ज देतात. भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) अलीकडच्या काळात अनेकदा रेपो रेट (Repo Rate) वाढवला होता. त्यानंतर सरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या बँकांनी आपल्या कर्जांच्या व्याजदरात वाढ केली आहे. रेपो रेट वाढल्यामुळे साहजिकच कर्जांच्या EMI मध्ये वाढ होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची आगामी तीन दिवसीय पतधोरण बैठक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या काळात होऊ शकते. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा दरवाढ करू शकते, असा अंदाज आहे. रिझर्व्ह बँकेच्या या बैठकीच्या काही आठवडे आधीच स्टेट बँकेने आपल्या बेंचमार्क लेंडिंग रेट्समध्ये वाढ केली आहे. बँकेकडून दर तिमाहीला लेंडिंग रेट आणि बेस रेट यांमध्ये सुधारणा केली जाते. Business loan: तुम्हालाही व्यवसाय कर्जासाठी अर्ज करायचाय? ‘ही’ कागदपत्रं आहेत आवश्यक कर्जांचे व्याजदर वाढले, की साहजिक ग्राहकांना द्याव्या लागणाऱ्या मासिक हप्त्याच्या रकमेत म्हणजेच EMI मध्ये वाढ होते. त्यात वाढ झाली, की त्याचा ग्राहकावर ताण येतो आणि त्याच्या बजेटवर त्याचा परिणाम होतो. स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वांत मोठी कर्ज देणारी बँक असल्याने याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.