मुंबई, 6 ऑक्टोबर : खरेदी-विक्रीसाठी ई कॉमर्स पोर्टलचा वापर नेहमी केला जातो. या पोर्टल्सच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या घटना देखील उघड झाल्या आहेत. एका फसवणुकीच्या प्रकरणात हैदराबाद येथील ग्राहक विवाद निवारण आयोगानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ई-कॉमर्स पोर्टलवर विकल्या जाणार्या उत्पादनावर उत्पादक देशाचं नाव नमूद केलेलं नसल्यास, संबंधित पोर्टल स्वतः या उत्पादनासाठी जबाबदार असेल. म्हणजे त्या उत्पादनाचे दुष्परिणाम झाले तरीही त्याची जबाबदारी उत्पादक कंपनीसोबत ते विकणाऱ्या ई-कॉमर्स पोर्टलचीही असेल, असे या न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या निर्णायानुसार, ई-कॉमर्स नियमांनुसार कंपन्यांनी ग्राहकांना प्रॉडक्ट ज्या देशात तयार झालं आहे त्याची माहिती देणं आवश्यक आहे. प्रॉडक्टसंबंधी आवश्यक ती माहिती ग्राहकांना वेबसाईटवर दाखवली पाहिजे. जेणेकरून ते योग्य निवड करू शकतील, याची खात्री ई-कॉमर्स मार्केटप्लेसनं केली पाहिजे. आयोगानं पुढे म्हटलं आहे की, ई-कॉमर्स नियमांचं उल्लंघन झाल्यास ई-कॉमर्स मार्केटप्लेस फोरम संबंधित कंपन्यांना माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत दंडापासून संरक्षण देऊ शकत नाही. ग्राहक मंचानं ई-कॉमर्स कंपनी पेटीएमला मार्केट प्लेस आणि युनी वन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (विक्रेता) विरुद्ध दाखल झालेल्या एका तक्रारीत 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणातील तक्रारदार ग्राहक आकाश कुमार यांना ही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. Leave Encashment म्हणजे काय? EL मधून मिळालेल्या पैशांवर कर भरावा लागतो का? काय आहे प्रकरण? तक्रारदार आकाश कुमार यांनी ऑगस्ट 2020 मध्ये पेटीएमद्वारे 13 हजार 440 रुपये किमतीचं उषा शिलाई मशीन खरेदी केलं होतं. हे मशीन थायलंडमध्ये बनलं असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. ई-कॉमर्स नियम 2020 नुसार कंपनीनं साइटवर मूळ उत्पादक देशाचा उल्लेख केला नव्हता. खरेदी करताना, उत्पादन कुठे झालं आहे याची कोणतीही माहिती न मिळाल्यानं हे उत्पादन भारतातच बनवलेलं असावं, असा अंदाज आकाश कुमार यांनी बांधला होता. मात्र, प्रत्यक्षात ते मशीन भारताबाहेर तयार झालेलं होतं. ऑनलाइन पोर्टलवर मूळ उत्पादक देशाचा उल्लेख असता तर आपण शिलाई मशीन विकत घेतलं नसतं, असं आकाश यांचं म्हणणं आहे. कंपनीनं केला ‘हा’ युक्तिवाद आकाश कुमार यांच्या तक्रारीला विरोध करताना, पेटीएमनं जोरदार युक्तिवाद केला आहे. कंपनीनं केलेल्या युक्तीवादानुसार, पेटीएम हे एक ऑनलाइन मार्केटप्लेस आहे. जे अनेक विक्रेत्यांना त्यांची उत्पादनं विकण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतं. कंपनी केवळ विक्रेते आणि खरेदीदार यांच्यातील व्यवहार सुलभ करण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करते. आमचा थेट उत्पादनाच्या विक्रीशी काहीही संबंध नाही. याबाबत प्रॉडक्ट निर्मात्यानेही युक्तीवाद केला आहे. ‘इतर सर्व आवश्यक माहिती दिली असताना मूळ देशाशी संबंधित माहिती वगळणं चुकीचं नाही. त्यामुळे तक्रारदाराला कोणतीही हानी, दुखापत, मानसिक त्रास किंवा आघात झालेला नाही,’ असं कंपनीनं म्हटलं आहे. EPFO कर्मचाऱ्यांचे पैसे कुठेही जाणार नाहीत; सरकारकडून आश्वासन, नेमकं काय प्रकरण हैदराबादच्या जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाची ही टिप्पणी महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे ई-कॉमर्स पोर्टलला प्रॉडक्ट उत्पादक देशाचा उल्लेख करणं आवश्यक बनलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.