नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : देशातली सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) कोरोना संकटाच्या काळात मे 2020मध्ये स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट स्कीम (Special Fixed Deposit Scheme) अर्थात मुदत ठेवीची विशेष योजना सुरू केली होती. त्याअंतर्गत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) अतिरिक्त 0.30 टक्के व्याज देण्यात येतं. SBI WECARE Deposit Scheme असं त्या योजनेचं नाव आहे. ही योजना सप्टेंबर 2021मध्ये संपणार होती; मात्र आता या योजनेला मार्च 2022पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता 31 मार्च 2022पर्यंत या योजनेत गुंतवणूक करून अतिरिक्त व्याजाचा लाभ घेता येऊ शकतो. स्टेट बँकेने या योजनेत गुंतवणूक करण्याचा कालावधी वाढवण्याची ही पाचवी वेळ आहे.
एसबीआय वुई केअर डिपॉझिट स्कीमअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त मुदतीच्या किरकोळ ठेवींसाठी (Retail Term Deposits) निर्धारित व्याजदराच्या तुलनेत 0.30 टक्के अतिरिक्त व्याज दिलं जातं. थोडक्यात सांगायचं झालं, तर सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या व्याजदराच्या तुलनेत एकूण 0.80 टक्के जास्त व्याज मिळू शकेल. कारण एसबीआयमध्ये फिक्स्ड डिपॉझिटसाठी ज्येष्ठ नागरिकांना अन्य नागरिकांच्या तुलनेत मुळातच 0.50 टक्के जास्त व्याजदर दिला जातो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना एकूण 0.80 टक्के जास्त व्याजदर मिळू शकतो.
सध्या स्टेट बँक सर्वसाधारण ग्राहकांना पाच वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर वार्षिक 5.40 टक्के दराने व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर वार्षिक 5.90 टक्के असतो. समजा, ज्येष्ठ नागरिकांनी वुई केअर डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक केली, तर त्यांना त्यातही 0.30 टक्के अधिक व्याजदर मिळेल. म्हणजेच या स्कीममध्ये ज्येष्ठ नागरिकांनी पाच वर्षांची एफडी केली, तर त्यांना वार्षिक 6.20 टक्के व्याजदर मिळेल. हा व्याजदर 8 जानेवारी 2021पासून लागू झाला आहे. हा व्याजदर रिटेल टर्म डिपॉझिट अर्थात दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवीसाठी लागू आहे.
हे ही वाचा-तुमच्याकडेही आहे PNB चे हे कार्ड तर मिळेल 2 लाख रुपयांचा फायदा, कसा मिळवाल लाभ?
एसबीआयच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, एसबीआय वुई केअर डिपॉझिट स्कीमच्या अतिरिक्त व्याजदराचा लाभ नवी अकाउंट्स, तसंच आधीच्या ठेवींच्या रिन्यूअलवेळी मिळू शकतो. मॅच्युरिटीपूर्वी ठेव काढून घेतली तर अतिरिक्त व्याजदराचा लाभ मिळणार नाही, असं बँकेनं स्पष्ट केलं आहे. तसंच, ठेव मुदतपूर्व मोडल्यास 0.50 टक्क्यांपर्यंत दंडही भरावा लागू शकतो.
एसबीआय वुई केअर योजनेअंतर्गत विविध व्याजदर
- ज्येष्ठ नागरिकांना 7-45 दिवसांपर्यंतच्या ठेवींवर 3.45 टक्के व्याज
- 46-179 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 4.4 टक्के व्याज
- 180-210 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 4.9 टक्के व्याज
- 211 दिवसांपासून एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठीही 4.9 टक्के व्याज
- एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.5 टक्के व्याज
- दोन वर्षं ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.6 टक्के व्याज
- तीन वर्षं ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठीच्या ठेवींवर 5.8 टक्के व्याज
- 5 वर्षं ते 10 वर्षांपर्यंतच्या ठेवींसाठी 6.20 टक्के व्याज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sbi fd rates, Senior citizen, बँक