मुंबई, 5 ऑक्टोबर: आजच्या डिजिटल युगाच्या काळात आपली अनेक कामं घरबसल्या ऑनलाईन करता येतात. आज बँकिंग, शिक्षणापासून ते इतर अनेक कामं ऑनलाइन मोठ्या सहजतेनं होत आहेत. एकीकडे डिजिटायझेशनमुळे आपली कामं खूप सोपी झाली आहेत. तर दुसरीकडे सायबर फसवणुकीचे जगही खूप वाढले आहे. फसवणूक करणारे रोज नवनवीन पद्धती शोधून लोकांची फसवणूक करत आहेत. तुमचे SBI बँकेत खाते असल्यास. अशा परिस्थितीत ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. अनेकदा SBI खातेधारकांना बँकेच्या नावाने अनेक प्रकारचे बनावट कॉल येतात. SBI ने आपल्या खातेदारांसाठी एक विशेष अलर्ट जारी केला आहे. यामध्ये बँकेनं आपल्या ग्राहकांना अनोळखी नंबरवरून पाठवलेल्या कोणत्याही फसवणुकीच्या लिंकवर क्लिक करू नये, असं सांगितलं आहे. अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं. एसबीआयनं आपल्या खातेधारकांना अलर्ट जारी केला आहे की, जर इतर कोणत्याही नंबरवरून येणाऱ्या कॉलवर बँकेशी संबंधित आवश्यक माहिती मागवली गेली तर अशा परिस्थितीत तुम्हाला बँकेशी संबंधित तपशील शेअर करण्याची गरज नाही. असं केल्यानं तुम्ही मोठ्या फसवणुकीला बळी पडू शकता. याशिवाय बँकेनं एसएमएस आणि ईमेलवर येणाऱ्या फसवणुकीच्या लिंकपासून सावध राहण्यास सांगितलं आहे. बँकेनं खातेधारकांना सावध केलं आहे की त्यांनी डीओबी, डेबिट कार्ड नंबर, इंटरनेट बँकिंग तपशील, डेबिट कार्ड पिन आणि ओटीपी यासारखी कोणतीही महत्त्वाची माहिती इतर कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नये. हेही वाचा: FDचे अनेक फायदे पण तोटेही नाहीत कमी, या 5 प्रकारे होऊ शकतं नुकसान असं केल्यानं तुमच्या खात्यातील सर्व पैसे सायबर ठगांपर्यंत पोहोचू शकतात. याशिवाय बँकेनं आपल्या ग्राहकांना आरबीआय, सरकार, बँक, कार्यालय, पोलीस किंवा केवायसी प्राधिकरणाच्या नावानं येणाऱ्या कॉलपासून सावध राहण्यास सांगितलं आहे.
एसबीआयनं म्हटलं आहे की सोशल मीडियावर दिसणार्या कोणत्याही प्रकारच्या बनावट आणि आमिषं दाखवणाऱ्या ऑफरपासून सावध रहा. जर तुम्ही तुमच्या बँकेचं किंवा डेबिट कार्डच्या तपशीलाचा फोटो घेतला असेल तर अशा परिस्थितीत तुमचे हे महत्त्वाचे तपशील लीक होऊ शकतात.