नवी दिल्ली, 7 मार्च : रशिया आणि युक्रेनमनधील युद्धाचा
(Russia-Ukraine War) परिणाम जगभरात आणि अनेक क्षेत्रांवर जाणवत आहे. इंधनासह अनेक गोष्टींच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कृषी क्षेत्रावरही
(Agriculture) या युद्धाचा परिणाम होऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे या युद्धामुळे आपल्या देशात फर्टिलायझर्स
(Fertilizers) म्हणजेच खतांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
भारताच्या खतांच्या एकूण आयातीपैकी
(Fertilizers Import) जवळपास 10 ते 12 टक्के आयात रशिया, युक्रेन आणि बेलारुसमधून
(Belarus) होते. आता रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम साहजिकच खतांच्या आयातीवरही होऊ शकतो. पेमेंट किंवा लॉजिस्टिक्समध्ये अडथळे येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. खत निर्मितीसाठी पोटॅशची
(Potash) आवश्यकता असते आणि रशियातून मोठ्या प्रमाणात पोटॅशची आयात भारतात केली जाते. रशिया आणि बेलारुस पोटॅशचे मोठे निर्यातदार
(Exporter) आहेत. युक्रेनही पोटॅशची निर्यात करतो. पण युक्रेन-रशिया युद्धामुळे पोटॅशचा पुरवठा होणं कठीण झालं आहे.
चालू आर्थिक वर्षात पोटॅशची आयात जवळपास 280 डॉलर प्रतिमेट्रिक टन या किमतीवर केली जात होती. पण आताचा पुरवठाच कमी होत असल्यामुळे या किंमतीत वाढ होऊन त्याची किंमत जवळपास 500 ते 600 डॉलर प्रति मेट्रिक टनपर्यंत पोहोचू शकते असा अंदाज आहे. रशिया आणि बेलारुसवर लावल्या गेलेल्या निर्बंधांमुळे पुरवठ्यामधील अडथळे वाढू शकतात. शेतकऱ्यांना कमी किंमतीत खतं द्यायची असतील तर सरकारने आता जास्त अनुदान
(Subsidy on Fertilizers) देण्याची गरज आहे असं मत इक्राचे संशोधन प्रमुख रोहित अहुजा यांनी एबीपी न्यूजशी बोलताना व्यक्त केलं आहे.
रशिया खतांचा मोठा निर्यातक देश आहे. त्यामुळेच आयातमूल्यात वाढीची पूर्ण शक्यता आहे. त्याशिवाय युरियाच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या वायूंच्या किमतीही वाढल्या आहेत. याचाही परिणाम खतांच्या किमतींवर होऊ शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
हे युद्ध सुरु होण्याआधी रशियातील बंदरांच्या माध्यमातून भारतात पोटॅश आणण्याची भारताची योजना होती, पण निर्बंधांमुळे ही योजना सध्या सुरू झालेली नाही. त्याशिवाय पोटॅश निर्मिती करणारे कॅनडासारखे
(Canada) देश पोटॅश उत्पादनवाढीसाठी सध्या तरी तयार नाहीत. त्यामुळे जागतिक बाजारात सध्या पोटॅशचे भाव वाढलेले आहेत. खतांच्या वाढत्या किमतींमुळे केंद्र सरकारला जास्त अनुदान देणं भाग पडू शकतं.
एकूणच युद्ध जरी जगाच्या कोणत्याही टोकाला, कोणत्याही देशांमध्ये होत असलं तरी त्याचे परिणाम जगभरातील छोट्यामोठ्या देशांवर होतातच. आता भारत सरकारपुढे खतांच्या किंमत वाढीवर तोडगा काढण्याचं मोठं आव्हान आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.