मुंबई, 07 ऑगस्ट: केंद्र सरकारनं लोकांना रेशनचा लाभ देण्यासाठी नवीन पोर्टल सुरू केलं आहे. या अंतर्गत बेघर, निराधार, मजूर आणि इतर पात्र लाभार्थी शिधापत्रिकेसाठी (How to apply for Ration Card?) अर्ज करू शकतात. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत 81.35 कोटी लोक जोडले गेले आहेत. मात्र, सध्या 79.77 कोटी लोकांना रेशनचा लाभ मिळत आहे, म्हणजेच नवीन रेशन व्यवस्थेच्या माध्यमातून 1.58 कोटी लोकांना या योजनेत जोडलं जाणार आहे. अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी शुक्रवारी ‘कॉमन रजिस्ट्रेशन पॉलिसी’ (माय रेशन माय पॉलिसी) सादर केली. NFSA अंतर्गत पात्र असलेली राज्ये आणि लाभार्थी यांना मदत करणं हे त्याचे उद्दिष्ट आहे. सचिव म्हणाले की, 7-8 वर्षात 4.7 कोटी शिधापत्रिका विविध कारणांमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत 18-19 कोटी लोकांना लाभ दिला जात होता. आता नवीन पोर्टल अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची शिधापत्रिका बनवली जाणार आहेत. या राज्यांना मिळणार लाभ- अन्न सचिव सुधांशू पांडे म्हणाले की, नवीन वेब बेस सुविधा प्रायोगिक तत्त्वावर 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिली जाईल. त्याच वेळी, या महिन्याच्या अखेरीस, सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या व्यासपीठावर समाविष्ट केले जातील. त्यात आसाम, गोवा, लक्षद्वीप, महाराष्ट्र, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, पंजाब आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे. हेही वाचा- EPFO: जुन्या कंपनीचा PF कसा करायचा विलीन? फक्त 5 मिनिटांचं आहे काम, नंतर मिळेल मोठं व्याज
अर्ज कसा करायचा?-
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही NFSA च्या नवीन पोर्टलला भेट देऊन अर्ज करू शकता. तसेच, Ration Mitra अॅपवर मोबाईल लिंक करूनही याचा लाभ घेता येईल. या सुविधेमुळं राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांतील पात्र लाभार्थी ओळखण्यात आणि त्यांना यादीत समाविष्ट करण्यात मदत होईल. सर्व 36 राज्ये/केंद्रशासित प्रदेश वन नेशन वन रेशन कार्ड (ONORC) योजनेअंतर्गत जोडले गेले आहेत.