मुंबई, 12 जानेवारी : देशातील सर्वात मोठा आयपीओ (Largest IPO in Country) म्हणून गवगवा झालेल्या पेटीएमच्या (Paytm) शेअरची अद्यापही म्हणावी तशी वाढ झालेली नाही. गेल्यावर्षी 18 नोव्हेंबर रोजी पेटीएमची ऑपरेटर कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स (One 97 Communications) शेअर बाजारात नोंदणीकृत झाली. तेव्हापासून आतापर्यंत फार कमी वेळा या शेअरमध्ये तेजी (Growth) नोंदवली गेली आहे. या शेअरमध्ये वाढीपेक्षा घसरण अधिक वेळा झाली आहे. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरदेखील शेअर बाजार तेजीत असताना पेटीएमच्या शेअरमध्ये मात्र सातत्याने घसरणच होत आहे. आजही शेअर बाजार वधारत असतानाही पेटीएमच्या शेअर्समध्ये घसरणीचा कल दिसून आला. आज (12 जानेवारी 22) सकाळी सेन्सेक्सनं 400 अंकांची झेप घेतली तर निफ्टी 123 अंकांनी वधारला. मात्र सकाळी शेअर बाजार सुरू होताच 1,124 रुपयांवर उघडलेला पेटीएमचा शेअर काही वेळातच 1,075 रुपयांपर्यंतच्या नीचांकी पातळीपर्यंत (Lowest Level) घसरला. दुपारी 1.30 वाजता पेटीएमचा शेअर 1.90 टक्क्यांनी खाली घसरून 1,098 रुपयांवर आला. मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी या शेअरची विक्री केल्यानं याची घसरगुंडी कायमच राहिल्याचं दिसत आहे. ‘आजतक’नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. हेही वाचा : मुंबईत कोरोनाबाधितांचा पुन्हा आकडा वाढला, दिवसभरात तब्बल 16 हजार 420 नवे रुग्ण पेटीएमच्या शेअरमधील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची मोठी निराशा झाली होती. देशातील सर्वात मोठा आयपीओ अशी चर्चा असलेल्या पेटीएमच्या आयपीओमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी मोठ्या अपेक्षेने पैसे गुंतवले होते. पण याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अवघ्या 2 महिन्यांत पेटीएमचा शेअर आयपीओमधील त्याच्या किमतीच्या निम्म्या किमतीवर (Half price of IPO issue price) आला आहे. याचा सर्वाधिक फटका किरकोळ गुंतवणूकदारांना बसला आहे. आज सकाळी या शेअरनं 1,075 रुपयांची नीचांकी पातळी गाठली. ही त्याच्या आयपीओमधील किमतीच्या निम्मी किंमत आहे. आयपीओमध्ये या शेअरची किंमत 2150 रुपये होती. त्यामुळं गुंतवणूकदारांनी आयपीओमध्ये गुंतवलेले पैसे आता निम्मे झाले आहेत. पेटीएमच्या शेअरमधील या घसरणीमागील मुख्य कारण म्हणजे ब्रोकरेज हाऊस मॅक्वेरीचे नवीन लक्ष्य (Target) आहे. या ब्रोकरेज हाऊसच्या मते, पेटीएमच्या व्यवसायात आगामी काळात महसुलामुळे दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मॅक्वेरीने या शेअरच्या किंमतीचे लक्ष्य 1200 रुपयांवरून 900 रुपये केले आहे. हेही वाचा : मुंबईत 500 फुटांपर्यंत घरांना आणि शाळेतील बसेससाठी करमाफी, सरकारचे 7 मोठे निर्णय पेटीएमने आयपीओद्वारे प्राथमिक बाजारातून 18 हजार 300 कोटी रुपये उभे केले होते. मात्र मूल्य खूप जास्त असल्यानं गुंतवणूकदारांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. किरकोळ गुंतवणूकदारांनी आयपीओमध्ये मोठ्या आशेने गुंतवणूक केली होती. मात्र त्यांची पेटीएमनं निराशा केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.