नवी दिल्ली, 26 मार्च : गेल्या काही महिन्यांत इंधन, घरगुती वापराचा गॅस, खाद्य तेल आदी गोष्टींच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. महागाईचा (Inflation) भडका उडाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच आता एक नवी माहिती समोर आली आहे. अत्यावश्यक औषधांच्या (Essential Medicines) किमती एप्रिलपासून वाढणार असून, या औषधांच्या किमतीत थेट 10 टक्क्यांनी वाढ होणार आहे. या औषधांमध्ये पॅरासिटामॉल (Paracetamol) या अत्यावश्यक औषधाचाही समावेश आहे. त्यामुळे याचा थेट फटका नागरिकांना सहन करावा लागणार आहे. इंधन (Fuel), एलपीजी (LPG), खाद्यतेल, खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले आहेत. वाढत्या महागाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच आता औषधांच्या किमतीही वाढणार आहेत. शेड्यूल औषधांच्या (Schedule Drugs) किमती वाढवण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला 800 पेक्षा अधिक औषधांच्या किमतीत थेट 10 टक्क्यांनी वाढ होत आहे. यात पॅरासिटामॉलसह ताप, हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर, त्वचा विकार आणि अॅनिमियावरच्या उपचारांकरता वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे. कोरोनाच्या साथीनंतर फार्मा इंडस्ट्री (Pharma Industry) सातत्याने औषधांच्या किमती वाढवण्याची मागणी करत होती. या पार्श्वभूमीवर शेड्यूल औषधांच्या किमतीत 10.7 टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शेड्यूल ड्रगमध्ये अत्यावश्यक औषधांचा समावेश होतो आणि त्यांच्या किमती नियंत्रित केल्या जातात. या औषधांच्या किमती मंजुरीशिवाय वाढवता येत नाहीत.
हे वाचा - साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता
येत्या काही दिवसांत म्हणजेच एप्रिलपासून फिनाइटोन सोडियम, मेट्रोनिडाझॉल, पॅरासिटामॉल यांसारख्या आवश्यक पेनकिलर (Pain Killer) अर्थात वेदनाशामक आणि अॅंटिबायोटिक (Antibiotic) औषधांच्या किमती वाढणार आहेत. नॅशनल फार्मा प्रायसिंग ऑथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार, घाऊक किंमत निर्देशांकात वाढ झाल्यामुळे औषधांच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे 1 एप्रिल 2022 पासून औषधांच्या किमतीत वाढ होणार आहे. एकीकडे औषधांच्या किमतीत वाढ होणार असताना दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किमती रोज वाढताना दिसत आहेत. बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने यापूर्वीच शंभरी पार केली आहे. इंधन दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने येत्या काही दिवसांत खाद्यपदार्थांच्या किमतीतही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
हे वाचा - पेट्रोल-डिझेल दरवाढीला सरकार नव्हे, तर ‘ही’ गोष्ट जबाबदार; नितीन गडकरींनी सांगितलं कारण
दरम्यान, या महागाईचा परिणाम औषधांवरदेखील होताना दिसत आहे. एप्रिलपासून 800 पेक्षा अधिक अत्यावश्यक औषधांच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे साहजिकच याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.