मुंबई: बँकेतील मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी ग्राहकांकडे पॅन कार्ड असणं बंधनकारक आहे. पॅन ही ओळखीचा पुरावा म्हणून वापरल्या जाणाऱ्या सर्वांत महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. पर्मनंट अकाउंट नंबर किंवा पॅन (PAN) हा आयकर विभागाने जारी केलेला 10 अंकांचा एक अद्वितीय अल्फान्यूमरिक नंबर आहे. एका लॅमिनेटेड प्लॅस्टिक कार्डच्या स्वरूपात हा नंबर व्यक्तीला दिला जातो. पॅनमुळे आयकर विभागाला पॅन धारकाचे सर्व व्यवहार विभागाशी लिंक करण्यास मदत होते. या व्यवहारांमध्ये कर भरणा, टीडीएस/टीसीएस क्रेडिट, इन्कम टॅक्स रिटर्न, स्पेसिफाइड ट्रॅन्झॅक्शन्स, करस्पॉन्डन्स इत्यादींचा समावेश होतो. या क्रमांकामुळे पॅन धारकांची माहिती सहज मिळवता येते आणि पॅन धारकाच्या विविध गुंतवणूक, कर्जे आणि इतर व्यावसायिक हालचालींची जुळणी करणं सोपं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पॅनकार्डचा इतरांकडून गैरवापर किंवा फसवणूक झाल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. काही टिप्स फॉलो केल्या तर आपल्या पॅनचा गैरवापर आपण टाळू शकतो. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. फसवणूक टाळण्यासाठी पॅन हिस्ट्री तपासत रहा आपण आपल्या पॅनची हिस्ट्री नियमितपणे तपासली पाहिजे. जेणेकरून कोणीही त्याचा गैरवापर करत नाहीये याची खात्री करता येईल. असं केल्यानं तुम्ही पॅनचा गैरवापर टाळू शकता. हे काम आयकर विभागाच्या ऑनलाइन पोर्टलद्वारे किंवा विभागाशी थेट संपर्क साधून करता येईल. आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन घरबसल्या पॅन हिस्ट्री तपासता येते. त्यासाठी तुम्हाला पोर्टलवर अकाउंट तयार करावं लागेल आणि तुमचा पॅन कार्ड क्रमांक व इतर तपशील वापरून लॉग इन करावं लागेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या पॅन कार्डचे तपशील पाहू शकता. तिथे पॅनद्वारे केलेले कोणतेही व्यवहार किंवा बदल दिसतात. पॅन हिस्ट्री तपासल्यास तुमच्या पॅन कार्डचा अनधिकृत वापर ओळण्यास तो थांबवण्यास मदत होईल. या पद्धतींनीही करता येतो तपास 1. क्रेडिट स्कोअर जनरेट करून तुम्ही तुमच्या पॅन नंबरवर दुसऱ्यानं कर्ज घेतलं आहे की नाही, हे सहजपणे तपासू शकता. 2. सिबिल, इक्विफॅक्स, एक्सपेरियन किंवा सीआरआयएफ हाय मार्कसारख्या क्रेडिट ब्युरोद्वारे तुम्ही तुमच्या नावावर घेतलेल्या कर्जाचे तपशील तपासू शकता. 3. तुमचे आर्थिक अहवाल पाहण्यासाठी तुम्ही पेटीएम किंवा बँक बाजारसारख्या फिनटेक प्लॅटफॉर्मला भेट देऊ शकता. तिथे तुमचं नाव, जन्मतारीख आणि तुमच्या पॅन कार्ड तपशील टाकणं आवश्यक आहे. आयकर विभागातर्फेही करता येते चौकशी 1. जर तुम्ही ई-फायलिंग पोर्टलचा वापर करू शकला नाहीत तर आयकर विभागाच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधू शकता. 2. तेथील कर्मचारी तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड हिस्ट्रीविषयी माहिती देऊ शकतात. याशिवाय तुम्हाला भेडसावणाऱ्या कोणत्याही समस्यांचं निराकरण करण्यात मदत करू शकतात. 3. पॅन कार्डचा गैरवापर आणि फसवणूक झाल्याचं निदर्शनास आल्यास आयकर विभाग कठोर पावलं उचलतो. विभागानं ग्राहकांच्या आर्थिक माहितीचं संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबवल्या आहेत.
4. प्रत्येकानं सावध राहणं आणि आपल्या पॅन कार्डचा योग्यरितीने वापर होत आहे याची खात्री करण्यासाठी नियमितपणे हिस्ट्री तपासणं फार महत्त्वाचं आहे.