मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PAN-Aadhaar Link: पॅन-आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता कोणत्या महिन्यात किती दंड भरावा लागणार?

PAN-Aadhaar Link: पॅन-आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता कोणत्या महिन्यात किती दंड भरावा लागणार?

Aadhaar-PAN Link

Aadhaar-PAN Link

आता ही सेवा मोफत नसेल. यासाठी दंड भरावा लागेल आणि मग ही जोडणी करावी लागेल. Aadhaar-PAN मोफत लिंक करण्यासाठी जी अंतिम मुदत दिली गेली होती, ती आता राहणार नाही. म्हणजे लिंक होईल पण दंड वसूल करूनच.

नवी दिल्ली, 2 एप्रिल : पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणीबद्दल (PAN-Aadhaar Link) लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. पॅन आणि आधार ही दोन महत्त्वाची कार्डं लिंक करणं म्हणजे त्यांची जोडणी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतीय नागरिकाच्या बँकेशी संबंधित सर्व व्यवहारांचा या जोडणीशी संबंध आहे. पॅन-आधार लिंक करण्याची मुदत सरकारने वाढवली आहे. पण आता नवा निर्णय सरकारने जाहीर केला आहे.

आपले पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाने मुदतीत वाढ तर केली आहे, पण आता ही सेवा मोफत नसेल. यासाठी दंड भरावा लागेल आणि मग ही जोडणी करावी लागेल. परंतु, नागरिकांच्या मनामध्ये याविषयी गोंधळ आहे, हजारो शंका आहेत. एकीकडे तर सांगितलं आहे की दंड भरावा लागेल. दुसरीकडे 2023 पर्यंत पॅन कार्ड रद्द होणार नाही, असंही सांगितलं जात आहे. यातलं नक्की खरं काय, आपल्या आर्थिक व्यवहारांवर याचा नक्की कसा आणि कोणता फायदा होणार आहे, असे अनेक प्रश्न सध्या लोकांच्या मनात आहेत.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटसाठी (Income Tax Department) धोरणं आखणाऱ्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) पॅन आणि आधार जोडणीची मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढवली आहे. परंतु, ही जोडणी मोफत करण्यासाठी जी अंतिम मुदत दिली गेली होती, ती आता राहणार नाही. म्हणजे जोडणी होईल पण दंड वसूल करूनच.

कोणत्या महिन्यात किती दंड?

आता अगदी सोप्या शब्दांत समजवायचं झालं तर आता 1 एप्रिल 2022 पासून तुम्हाला पॅन-आधार जोडणी करण्यासाठी दंड भरावा लागेल. पहिल्यांदा 500 रुपये आणि त्यानंतर 1000 रुपयांपर्यंत या जोडणीसाठी पैसे भरावे लागतील. मार्च 2023 पर्यंत पॅन आणि आधारची जोडणी झाली नाही, तर मग पॅनकार्ड रद्द केले जाईल. 500 रुपये दंड हा पहिल्या तीन महिन्यांसाठी आहे. म्हणजेच एप्रिल, मे आणि जून 2022 पर्यंत जोडणी करणाऱ्यांना 500 रुपये दंड पडेल. तर पुढच्या 9 महिन्यांसाठी म्हणजेच जुलै 2022 ते मार्च 2023 पर्यंत 1000 रुपये दंड भरावा लागेल, त्यानंतरच पॅन आधार जोडणी करून मिळेल.

तूर्तास पॅन PAN रद्द होणार नाही

CBDT च्या सूचनांनुसार नव्या व्यवस्थेत मार्च 2023 पर्यंत तुमचे पॅन PAN कार्ड रद्द होणार नाही. यादरम्यान आपले कोणतेही आर्थिक व्यवहार थांबणार नाहीत. त्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. इन्कम टॅक्स रिटर्न ते अगदी ITR रिफंडसाठी पॅनचा वापर होतच राहील. मार्च 2023 नंतर पॅन कार्ड रद्द केले जाईल.

आकडेवारीनुसार 24 जानेवारी, 2022 पर्यंत 43.34 कोटी पॅन कार्ड आधारला जोडली गेली आहेत. आत्तापर्यंत 131 कोटी आधार कार्ड दिली गेली आहेत. पॅन आणि आधारच्या जोडणीतून बनावट पॅन कार्डला आणि कर चोरी करण्याला आळा बसेल.

हे वाचा - सर्वसामान्यांचं घर खरेदीचं स्वप्न महागणार, रेडी रेकनरच्या दरात वाढ

आपलं पॅन PAN कार्ड रद्द झालेलं आहे की नाही, हे कसं समजेल?

अगदी घरबसल्या आपलं पॅन कार्ड चालू आहे की बंद हे समजून घेण्याची सोय आहे. आयकर विभागाची अत्यंत सोपी ऑनलाइन प्रक्रिया करून तुम्हाला ते समजून घेता येईल. इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर जाऊन त्याच्या 3 सोप्या स्टेप्स समजून घ्याव्या लागतील.

- आयकर विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन तिथे उजव्या बाजूला वर काही कॉल दिले आहेत तिथे जा.

- नो युअर पॅन (KYP) अशा नावाचा जो पर्याय आहे, त्यावर क्लिक केल्यावर एक विंडो उघडेल. त्यात तुमचं आडनाव, नाव, लिंग, वैवाहिक स्टेट्स, जन्मतारीख आणि नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.

- ही सगळी माहिती भरल्यानंतर आणखी एक विंडो उघडेल. तसेच तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवण्यात येईल. तो आधीच्या विंडोमध्ये टाकायचा आणि सबमीट करायचे आहे. यानंतर तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक, नाव, नागरिकत्व, वॉर्ड नंबर आणि रिमार्क दिसेल. रिमार्कमध्ये लिहिले असेल की आपले पॅन कार्ड रद्द झाले की सुरू आहे.

First published:

Tags: Aadhar card link, Pan card