मुंबई, 14 फेब्रुवारी : देशाच्या अर्थव्यवस्थेतीत महत्त्वाचा मानला जाणारा स्टॉक एक्सचेंज हिमालयात बसलेला एखादा व्यक्ती चालवू शकतो का? असं विचारलं तर अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण होतील. मात्र असं विचारण्याचं कारणही तसंच आहे. कारण एखाद्या चित्रपटात किंवा पुस्तकात शोभणारी कथा सध्या एका महत्त्वाच्या पदावर काम केलेल्या व्यक्तीच्या बाबतील समोर येत आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्णा (Chitra Rankrishna) या मागील 20 वर्षांपासून हिमालयातील कथित योगीच्या सल्यानुसार आपल्या आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेत होत्या. तसेच शेअर बाजाराशी संबंधित महत्वाची माहितीही योगीला पाठवत होत्या. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत त्या एकादाही या योगीला भेटलेल्या नाहीत. SEBI ने शुक्रवारी काढलेल्या आदेशामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. चित्रा रामकृष्णा या कथित योगीच्या सल्याने निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. चित्रा रामकृष्णा योगीच्या संपर्कात असल्या तरी त्यांनी त्याला कधीही पाहिले नाही. हे योगी कुठेही प्रकट होऊ शकतात असा त्यांचा दावा आहे. हायप्रोफाईल नियुक्ती योगीच्या शिफारशीने? शेअर बाजाराचे ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि सल्लागार आनंद सुब्रमण्यन यांच्या हायप्रोफाईल नियुक्तीमध्येही या निनावी योगीचा सहभाग असल्याचे सेबीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आनंद सुब्रमण्यन यांची NSE समूहाचे कार्यकारी अधिकारी आणि चित्रा रामकृष्ण यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गंमत म्हणजे सुब्रमण्यन यांना गुंतवणूक विश्वातील कोणीही ओळखत नाही. त्यांनी 2016 मध्ये पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या चौकशीत अनेक खुलासे समोर आले आहेत. आनंद सुब्रमण्यम यांच्या नियुक्ती प्रकरणी सेबीने शुक्रवारी मोठी कारवाई केली. यात चित्रा रामकृष्णा आणि रवी नारायण यांच्यासह काही व्यक्तींना सुरक्षा कराराच्या नियमांचे (Security Contract Rule) उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले आहे. रामकृष्णा यांना 3 कोटी रुपये, प्रत्येकी 2 कोटी रुपये नारायण आणि सुब्रमण यांना आणि व्हीआर नरसिंहन यांना 6 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. नरसिंहन हे NSE चे मुख्य नियामक अधिकारी आणि मुख्य अनुपालन अधिकारी होते. सेबीने आपल्या आदेशात म्हटले आहे की, चित्रा रामकृष्णा यांच्या मते ही निनावी व्यक्ती एक आध्यात्मिक शक्ती होती. ती जिथे पाहिजे तिथे प्रकट होऊ शकतो. त्याचा कोणताही निश्चित पत्ता आणि ठावठिकाणा नव्हता. ती व्यक्ती मुख्यतः हिमालय पर्वतांमध्ये राहत होती. चित्रा रामकृष्णा पूर्णपणे सुब्रमण्यम यांच्यावर अवलंबून होत्या सेबीने असेही म्हटले आहे की, सुब्रमण्यन हे या योगींचे साथीदार होते, जे महत्त्वाचे निर्णय घेताना चित्रा रामकृष्णा यांच्यावर प्रभाव टाकत असत. त्यामुळे ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि एमडीचे सल्लागार हे पद त्यांच्यासाठी पूर्णपणे योग्य होते. सेबीच्या या आदेशावर त्याचे पूर्णवेळ सदस्य अनंत बरुआ यांची स्वाक्षरी आहे. आदेशात असेही म्हटले आहे की, योगीच्या आदेशानुसार सुब्रमण्यन यांना दरवर्षी मोठी रक्कम दिली जात होती. दुसरीकडे, सुब्रमण्यन यांनी 12 सप्टेंबर 2018 रोजी दिलेल्या निवेदनात कबुली दिली होती की, ते अज्ञात योगीला गेल्या 22 वर्षांपासून ओळखत होते. सेबीने म्हटले आहे की, सुब्रमण्यन यांच्यासाठी एनएसईच्या तिजोरीतून दरवर्षी किमान 5 कोटी रुपये जात होते. चित्रा रामकृष्णा या पूर्णपणे सुब्रमण्यम यांच्यावर अवलंबून होत्या आणि त्यांच्याशिवाय त्यांनी कोणताही मोठा निर्णय घेतला नसता. सेबीच्या आदेशानुसार रामकृष्णा यांनी सेबीशी संबंधित महत्त्वाची माहिती, निर्णय, कर्मचाऱ्यांशी संबंधित धोरणे आणि संस्थेची रचना त्या योगीला लीक केली होती. ही माहिती 2014 ते 2016 या काळात लीक झाली होती. यासाठी वापरण्यात आलेल्या ईमेलचाही खुलासा सेबीने केला आहे. गुंतवणूकदारांचं किती नुकसान झालं? SEBI ने त्यांच्या तपासात या घोटाळ्यामुळे NSE चे किती नुकसान झाले हे उघड केलेले नाही. देशातील सर्वात मोठ्या एक्स्चेंजवर शेअर्सच्या व्यापारात भाग घेऊन काही विशिष्ट व्यक्तींनी या घोटाळ्यातून पैसे कमावले होते की नाही हे देखील सांगितले नाही. या घोटाळ्याचा देशातील करोडो गुंतवणूकदारांवर परिणाम झाला का? तथाकथित योगीशी कोणाचे ईमेल खाते संबंधित होते? असे अनेक प्रश्न अनु्त्तरित आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.