सध्याच्या डिजीटल (Digital) काळात घरबसल्या कमाई करणं अगदी सोपं झालं आहे. विविध वेबसाइटस किंवा अॅप्सच्या माध्यमातून सहजपणे तुम्ही उत्पन्न मिळवू शकता. काही वेबसाइटस तर अगदी छोट्या कामासाठी देखील तुम्हाला पैसे देतात. क्युरा (Quora) ही त्यापैकीच एक वेबसाइट. या वेबसाइटवर केवळ प्रश्नोत्तरांच्या (Question and Answer) माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करू शकता. यासाठी या वेबसाइटनं एक पार्टनर प्रोग्रॅमही सुरू केला आहे. `टीव्ही नाइन हिंदी`नं या वेबसाइटच्या कार्यप्रणालीची सविस्तर माहिती दिली आहे.
सध्या कोरोनामुळे (Corona) जवळपास सर्व क्षेत्र अडचणीत सापडली आहेत. या कोरोनाकाळात अनेकांनी आपले रोजगार किंवा नोकऱ्या (Jobs) गमावल्या आहेत. जे सध्या नोकरी करत आहेत, त्यांना देखील अपेक्षित पैसे मिळत नसल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत कमाईचे आणखी स्रोत शोधण्याकडे अनेकांचा कल आहे. त्यात कोरोनाची स्थिती पाहता घरबसल्या उत्पन्न मिळावे, अशीही काहींची इच्छा आहे.
या पार्श्वभूमीवर `क्युरा` ही वेबसाइट तुम्हाला कमाईसाठी सहाय्य करू शकते. या वेबसाइटवर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कमाई (Earning) करता येते. ही वेबसाइट 2009 मध्ये सुरु झाली. या वेबसाइटचं अलेक्सा रॅकिंग 100 पेक्षा कमी आहे. या वेबसाइटवर कोणीही व्यक्ती कोणत्याही संदर्भात प्रश्न विचारू शकते. त्यावर कोणीही किंवा संबंधित विषयातील तज्ज्ञ उत्तर देऊ शकतात. जर तुम्हाला लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसंदर्भात काही समस्या असेल आणि त्याबाबतचा प्रश्न तुम्ही या वेबसाइटवर विचारला तर तुम्हाला कोणतीही व्यक्ती त्यासंदर्भात उत्तर देते. तुम्ही देखील एखाद्या प्रश्नावर उत्तर देऊ शकता. या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळू शकतात.
हे वाचा - अरे वा! आता शेतीशिवाय कॉफीचं उत्पन्न; जाणून घ्या या नव्या तंत्राविषयी...
अर्थात या वेबसाइटच्या माध्यमातून होणारी कमाई ही तुमच्या कंटेंटवर (Content) येणाऱ्या प्रतिक्रियांवर अवलंबून असते. जर तुम्हाला चांगलं वोटिंग मिळालं तर तुम्हाला जास्त पैसे मिळू शकतात. या प्रोग्रॅम पेजवरील माहितीनुसार, अनेक लोकांनी या माध्यमातून 2 लाख रुपयांपर्यंत कमाई केली आहे. चांगले प्रश्न विचारून किंवा समर्पक उत्तरं देऊन तुम्ही भरपूर पैसे या माध्यमातून मिळवू शकता.
या माध्यमातून पैसे मिळवण्यासाठी या प्रोग्रॅममध्ये तुम्हाला सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल. त्यानंतर काही प्रश्न विचारावे लागतील तसेच योग्य उत्तरेही द्यावी लागतील. यात अन्य सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मप्रमाणे लाईक्स, कमेंट हे पर्यायदेखील उपलब्ध आहेत. यात तुम्ही जितके जास्त प्रश्न विचाराल किंवा जितकी जास्त उत्तरं द्याल तितके जास्त पैसे कमवू शकता. तुम्ही विचारलेल्या एखाद्या प्रश्नावर जर प्रमाणापेक्षा जास्त प्रतिक्रिया आल्या तर तुमचा प्रश्न लोकांना आवडला असं समजावं. त्यानंतर क्युरा तुम्हाला त्यांना जाहिरातीतून मिळालेली काही रक्कम देईल. क्युरा युट्यूबप्रमाणे कमाईचे अन्य मार्गही उपलब्ध करून देत आहे. त्यातूनही तुम्ही चांगले पैसे मिळवू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Money, जॉब