मुंबई: उद्योगपती विक्रम किर्लोस्कर यांच्या निधनानंतर किर्लोस्कर उद्योग समूहाची जबाबदारी मानसी टाटा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यानंतर मानसी टाटा या नेमक्या कोण आहेत? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष उद्योगपती विक्रम किर्लोस्कर यांचे 29 नोव्हेंबर 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 64 वर्षांचे होते. फॉर्च्युनर आणि इनोव्हासारख्या कार भारतात आणण्याचं श्रेय विक्रम किर्लोस्कर यांना जातं. त्यांच्या निधनानंतर किर्लोस्कर जॉइंट व्हेंचरच्या बोर्डाच्या अध्यक्षपदी मानसी टाटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मानसी या विक्रम किर्लोस्कर यांची एकुलती एक मुलगी असून टाटा कुटुंबाची सून आहे. किर्लोस्कर समूहाच्या व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मानसी यांनी या पूर्वीच जबाबदारी घेतली होती. आता त्या टोयोटा इंजिन इंडिया लिमिटेड, किर्लोस्कर टोयोटा टेक्सटाइल प्रायव्हेट लिमिटेड, टोयोटा मटेरियल हँडलिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर कंपन्यांच्या प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळतील. तर, मानसी यांच्या आईचे नाव गीतांजली किर्लोस्कर असून त्या किर्लोस्कर सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
Success Story : दहावीत काठावर पास, मात्र कष्टाच्या जोरावर झाला IAS
टाटा परिवाराची सून मानसी टाटा यांचं वय 32 वर्षं असून त्यांनी अमेरिकेतील रोड आयलँड स्कूल ऑफ डिझायनिंगमधून पदवी घेतली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वडिलांच्या व्यवसायामध्ये काम करण्यास सुरुवात केली. 2019 मध्ये त्यांचं लग्न नोएल टाटा यांचा मुलगा नेविल टाटा यांच्याशी झालं. हा विवाह सोहळा अतिशय साधा ठेवण्यात आला होता. केवळ निवडक लोकांनाच या लग्नासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. किर्लोस्कर आणि टाटा ही दोन्ही कुटुंबं अनेक दशकांपासून एकमेकांना ओळखतात. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. नोएल यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाची रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेड आहे. तर, टाटा कुटुंबाची सून असणाऱ्या मानसी टाटा यांना पेंटिंगचीदेखील आवड असून त्या ‘केअरिंग विथ कलर’ नावाची एनजीओसुद्धा चालवतात त्यांना पोहण्याचीही आवड आहे.
दरम्यान, विक्रम किर्लोस्कर यांच्या निधनानंतर किर्लोस्कर समूहानं कंपनीची धुरा मानसी टाटा यांच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे आता मानसी यांच्या नेतृत्वाखाली किर्लोस्कर ग्रुप पुढील वाटचाल करणार आहे. ही वाटचाल यशस्वी होईल, अशी अपेक्षा उद्योग क्षेत्रातूनही व्यक्त होताना दिसतेय.