Home /News /money /

LPG अनुदानबाबत नियमात बदल, कोण असणार पात्र? तुम्हाला किती मिळणार अनुदान

LPG अनुदानबाबत नियमात बदल, कोण असणार पात्र? तुम्हाला किती मिळणार अनुदान

उज्ज्वला योजनेअंतर्गत जवळपास 9.17 कोटी एलपीजी कनेक्शन्स (LPG Connections) देण्यात आली, अशी माहिती PMUY च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. देशात सध्या जवळपास 30.5 कोटी एलपीजी कनेक्शन्स आहेत.

    मुंबई, 4 मे : देशात LPG सिलेंडरचे भाव खूप वाढलेले आहेत. सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. अशा परिस्थितीत सरकारनं एलपीजीवर अनुदान (LPG Subsidy) द्यावं अशी मागणी सातत्यानं करण्यात येत आहे. सध्या सरकारकडून एलपीजीवर अनुदान देण्यात येतं का याबाबतही अनेकांच्या मनात संभ्रम आहे. यावरच ऑईल सेक्रेटरी पंकज जैन यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. सरकारकडून देण्यात येणारं एलपीजीवरील हे अनुदान (LPG Subsidy) काही मर्यादित लाभार्थ्यांसाठीच (Limited Beneficiaries ) उपलब्ध आहे. उर्वरित सर्व ग्राहकांना बाजारभावाप्रमाणेच पैसे द्यावे लागतील, असं ऑईल सेक्रेटरी पंकज जैन यांनी सांगितलं आहे. जून 2020 पासून घरगुती गॅस सिलेंडरवर कोणतंही अनुदान देण्यात येत नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मार्चमध्ये जाहीर केलेलं अनुदान हेच एकमेव अनुदान दिलं जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. एलपीजी अनुदान कुणाला मिळणार? (Who Will Get LPG Subsidy?) देशातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Ujjwala Yojana) ज्यांना मोफत गॅस कनेक्शन्स मिळाली आहेत अशा नऊ कोटी गरीब महिलांनाच एलपीजी अनुदान मिळणार आहे. “कोविडच्या सुरुवातीपासूनच एलपीजी ग्राहकांसाठी कोणतंही अनुदान देण्यात येत नाही. उज्ज्वला लाभार्थ्यांना सध्या जे अनुदान जाहीर करण्यात आलं आहे, फक्त त्यांनाच ते अनुदान दिलं जातं,” असंही जैन यांनी सांगितलं. Real Estate Investment: प्रॉपर्टी खरेदी न करताही कमावा नियमित भाडे, कसं? अनुदानाबाबत नुकतीच घोषणा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक ट्विट केलं होतं. “पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील नऊ कोटी लाभार्थ्यांनाच आम्ही प्रत्येक गॅस सिलेंडरमागे 200 रुपये अनुदान देणार आहोत (12 सिलेंडर्सपर्यंत). यामुळे देशातील आपल्या माताभगिनींना मोठी मदत होणार आहे. यामुळे वर्षाला जवळपास 6,100 कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे, ” असं सीतारामन यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. पंतप्रधान उज्ज्वला योजना: (Pradhan Mantri Ujjwala Yojana) 2016 च्या मे महिन्यात ही योजना आणण्यात आली. ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीने लाकूड, शेणाच्या गोवऱ्या यावर स्वयंपाक करणाऱ्या गरीब महिलांना धुराचा त्रास होतो. या त्रासामुळे महिलांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावरही वाईट परिणाम होतो. हे टाळण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी एलपीजीसारखं (LPG) स्वच्छ इंधन पुरवण्याच्या हेतूने ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत जवळपास 9.17 कोटी एलपीजी कनेक्शन्स (LPG Connections) देण्यात आली, अशी माहिती PMUY च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. देशात सध्या जवळपास 30.5 कोटी एलपीजी कनेक्शन्स आहेत. अनुसूचित जाती (SC), भटक्या विमुक्त जमातींच्या (ST) प्रौढ महिलांना, पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण),अतिमागास वर्ग, अंत्योदय अन्न योजना (AAY), चहाच्या मळ्यांत सध्या काम करणारे किंवा यापूर्वी काम केलेले भटके, आदिवासी,वनवासी, बेटांवर आणि नदीच्या बेटांवर राहणारे, सामाजिक आर्थिक मागास घरं (SECC Households – AHL-TIN), 14 पॉईंट जाहीरनाम्यानुसार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे यांना या योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शन देण्यासाठी पात्र समजले जाते. अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असावे आणि त्या घरामध्ये अन्य दुसरे कोणतेही गॅस कनेक्शन नसावं या या योजनेसाठीच्या अटी आहेत. Investment Tips: FD चे केवळ फायदे नाही तोटे देखील आहेत; समजून घ्या मग गुंतवणूक करा किती अनुदान मिळणार? हे अनुदान जाहीर होण्यापूर्वी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसह सर्व ग्राहकांचे अनुदान जून 2020 पासून रद्द करण्यात आले होते. त्यांना बाजारभावाप्रमाणेच सिलेंडर खरेदी करावा लागत होता. 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची (LPG Cylinder) किंमत दिल्लीमध्ये बाजारभावाप्रमाणे 1,003 रु. आहे. आता सरकारच्या या नुकत्याच घेतलेल्या निर्णयानंतर, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनोच्या (Pradhan Mantri Ujjwala Yojana) लाभार्थ्यांना प्रत्येक सिलेंडरवर 200 रु. अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल. त्यामुळे त्यांना 14.2 किलो सिलेंडरची किंमत त्यांच्यासाठी 803 रुपये आहे. उज्ज्वला लाभार्थ्यांना एलपीजी अनुदान दिल्यामुळे सरकारचा वर्षाचा 6,100 रु. कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे. जून 2010 मध्ये सरकारनं पेट्रोलवरील अनुदान रद्द केलं होतं. तर 2014 मध्ये डिझेलवरील अनुदान रद्द करण्यात आलं होतं. काही वर्षांपूर्वी केरोसिन म्हणजे रॉकेलवरील अनुदानही बंद करण्यात आलं आहे. आता बहुतांश लोकांचं एलपीजीवरील अनुदानही बंद होणार आहे. अर्थात पेट्रोल, डिझेल आणि केरोसिनप्रमाणे अनुदान बंद होईल असा कोणताही अधिकृत आदेश अजूनपर्यंत निघालेला नाही; पण एलपीजीवरील अनुदान बंद झाल्यामुळे बहुतांश मध्यमवर्गीयांचं बजेट कोलमडलं आहे हे नक्की.
    First published:

    Tags: Gas, LPG Price, Money, Subsidy

    पुढील बातम्या