मुंबई, 7 नोव्हेंबर : दिवाळीनंतर थंडी पडायला सुरूवात झालीय. या वर्षी ‘ऑक्टोबर हिट’चा फारसा त्रास झाला नाही. महाराष्ट्रात सगळीकडेच तापमान कमी झाल्याची नोंद केली गेली. पाण्यात हात घातला तरी पाणी बर्फासारखं गार असतं. त्यातच थंडीत गार पाण्याने आंघोळ करायची म्हणजे अशक्यच आहे. त्यामुळे गरम पाण्याला पर्याय नसतो. परंतु, महाराष्ट्रात आजही काही ठिकाणी लोडशेडिंगची समस्या आहे. त्यामुळे विजेअभावी गिझर वापरणं कठीण होतं. पण आता तसं नाही. गॅस गिझरमुळे पाणी गरम करणं शक्य आहे. वीज नसलेल्या ठिकाणी गॅस गिझर नक्कीच उपयुक्त ठरतो तसंच विजेच्या बिलाचा विचार करता सगळीकडेच गॅस गिझर किफायतशीर ठरतो. जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती. गॅस गिझर हा तंत्रज्ञानाचाच अविष्कार आहे. गिझर किंवा तत्सम उपकरणांना वीज जास्त लागते. यामुळे जर गॅस गिझर वापरला तर विजेची एकप्रकारे बचतच होते. परंतु, गॅस गिझर वापरताना आवश्यक ती काळजीही घ्यायला हवी. याबद्दल अनेकांना पुरेशी माहिती नसते. काय काळजी घ्याल? गॅस गिझर वापरताना काळजी घेणं आवश्यक आहे. आपण अनेकदा गॅस गिझरमुळे माणसं दगावल्याच्या घटना ऐकतो. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला उपकारक ठरतो. तज्ज्ञांच्या मते, गॅस गिझरमधे मोनोऑक्साईड वायू तयार होतो. त्यामुळे गिझर सुरू केल्यावर पाणी बादलीत पडताना तुम्ही बाथरूममध्ये फार वेळ थांबू नका. या वायूमुळे अनेकांना चक्कर येते किंवा त्यांची शुद्ध हरपू शकते. याकरिता, गरम पाणी हे दुसर्या बादलीत काढून घेऊन मगच आंघोळीला जाणं योग्य आहे. वाचा - Online Fixed Deposit कसं सुरू करायचं, गरजेच्या वेळी पैसे काढता येतात का? किंमत गॅस गिझरची किंमत ही अगदी वाजवी आहे. यासाठी तुम्हाला 4500 ते 8000 हजार रुपये इतका खर्च येतो. तसंच हा गॅस गिझर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन किंवा कुठल्याही ई-कॉमर्स वेबसाईटवर जाऊनही तुमच्या आवडत्या कंपनीचा गिझर खरेदी करू शकता. फक्त गॅस गिझर घरी बसवताना तो कुणीही वापरू शकेल अशा पद्धतीनेच बसवा. ज्यामुळे तुम्हाला त्यातील गॅस आणि पाण्याचा फ्लो नियंत्रणात ठेवणं शक्य राहील.
वीज बिल होईल कमी हा गिझर तुम्ही घरात बसवला तर तुम्ही सध्या वापरत असलेल्या इलेक्ट्रिक गिझरमुळे येणाऱ्या वीज बिलात नक्कीच कपात होईल. तसंच गॅस सिलिंडरचे पैसे आणि लागणारी वीज याचं गुणोत्तर मांडलं तर गॅस गिझर किफायतशीर ठरेल. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्थात मार्केटमध्ये तुम्हाला विविध कंपन्यांचे ब्रॅंडेड गॅस गिझर मिळू शकतात. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्सच्या वेबसाईटवर हे गॅस गिझर उपलब्ध आहेत. तुमच्या बजेटनुसार गॅस गिझर मिळू शकतात. यात विविध प्रकारदेखील आहेत. बाथरूममध्ये गॅस गिझर वापरण्यासाठी एपीजी सिलिंडरला जोडणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हाला त्याची व्यवस्था करावी लागेल. हॅवेल्सपासून बजाजपर्यंत विविध प्रसिद्ध कंपन्या गॅस गिझरची निर्मिती करतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि बजेटप्रमाणे गॅस गिझर विकत घेऊ शकता.