नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी: सध्या देशातील कर्जाचे व्याजदर (Loan Interest rates) अत्यंत कमी पातळीवर आहेत. शिवाय MPC Meeting मध्येही रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI Policy) धोरणामुळे कर्जाचे व्याजदर सध्या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आहेत. कर्जाचे व्याजदर कमी असण्याची ही ऐतिहासिक वेळ आहे. व्यावासायिक कर्जदारांसोबतच (Corporate Loans ) गृहकर्ज (Home loan) आणि इतर प्रकारची किरकोळ कर्जं घेणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी असून, अनेक ग्राहक याचा फायदा घेत आहेत. या संधीचा फायदा घेण्यासाठी कर्जदार एका बँकेतून दुसऱ्या बँकेत कर्ज हस्तांतरित करत आहेत. स्वस्त कर्जाचा फायदा घेण्यासाठी ग्राहक इतर बँकांकडे धाव घेत असल्याचे अनेक मोठ्या बँकांच्या प्रमुखांचे म्हणणे आहे. खाण क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘वेदांता’ने (Vedanta) 31 जानेवारी रोजी सांगितले होते की, कंपनी तिचे 8,000 कोटी रुपयांचे कर्ज युनियन बँक ऑफ इंडियाकडे (Union Bank of India) हस्तांतरित करू इच्छित आहे. कंपनीने 2020 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) नेतृत्वाखालील बँक समूहाकडून 10.5 टक्के व्याजदराने 10 हजार कोटींचे कर्ज घेतले होते. आता कंपनी कमी झालेल्या व्याजदराचा फायदा घेण्यासाठी हे कर्ज दुसऱ्या बँकेत हस्तांतरीत करून 2 टक्के कमी व्याजदराचा फायदा घेऊ इच्छिते. हे वाचा- Petrol Diesel Prices Today: इंधन दरात बदल नाही, तरीही पेट्रोल 100 पार पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा (BOB) आणि बँक ऑफ इंडियाच्या (BOI) अधिकाऱ्यांच्या मते, ज्या व्यावसायिक कर्जदारांकडे पुरेसे रोख भांडवल आणि मजबूत ताळेबंद आहे, असे कर्जदार बँकांवर व्याज कमी करण्यासाठी दबाव आणत आहेत. आणि बँकांमधील स्पर्धा वाढल्यामुळे हे दर कमी केले जात आहेत. बँक ऑफ बडोदाचे मुख्य कार्यकारी संजीव चढ्ढा म्हणाले की,’ व्याजदर कपातीचे चक्र सुरू झाल्यापासून कर्जदार सतत बँका बदलत आहेत.’ बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक स्वरूप दासगुप्ता यांनीही याला दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘गृहकर्ज हे सुरक्षित कर्ज असल्यामुळे ग्राहक बँकांवर व्याजदर कमी करण्यासाठी किंवा हस्तांतरणासाठी दबाव आणत आहेत. अनेक बँका आपलं खेळतं भांडवल नवीन कर्ज वाटप करण्यासाठी वापरू शकत नाहीत. स्टेट बँकेचे स्वतःचे खेळते भांडवल 2.06 लाख कोटी आहे, त्यापैकी 1.99 लाख कोटी पडून आहेत.’ हे वाचा- दरमहा 210 रुपये भरा अन् निवृत्तीनंतर 5 हजार रुपये मासिक पेन्शन मिळवा! पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) मुख्य कार्यकारी एस. एस. मल्लिकार्जुन राव यांनी असे म्हटले होते की, ‘सध्या स्वस्त कर्जाच्या आशेने ग्राहक एका बँकेतून दुसऱ्या बँकेत कर्ज हस्तांतरित करत आहेत. त्यामुळे बँकांना ग्राहकांना रोखण्यासाठी व्याजदर कमी करावे लागत आहेत. पुढील तिमाहीत व्याजदर वाढल्यास ग्राहक कर्ज हस्तांतरीत करणार नाहीत आणि बँकांची या त्रासातून सुटका होईल.’ तेव्हा स्वस्त कर्जाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या बँकेपेक्षा कमी व्याजदर असलेल्या बँकेत कर्ज हस्तांतरीत करा आणि दरमहा हप्त्याचे ओझे थोडे कमी करण्याची संधी साधा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.