नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : काहीवेळा विशिष्ट परिस्थितीमध्ये तुम्हाला तातडीनं पैशांची गरज असते. अशावेळी शेतजमीन, सोनं, घर आदी तारण ठेवून तुम्ही कर्ज घेता. पण जर तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल, तर आपत्कालीन परिस्थितीत शेअर्स तारण ठेवून तुम्हाला कर्जही घेता येणार आहे. ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबाबत वृत्त दिलंय. तुम्हाला कठीण काळात कर्ज घ्यायचं असेल, तर आता तुम्ही तुमच्याकडील शेअर्स गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता. मिरे अॅसेट ग्रुपची नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) मिरे अॅसेट फायनॅन्शियल सर्व्हिसेसनं त्यांच्या ग्राहकांसाठी ‘लोन अगेन्स्ट शेअर्स’ची सुविधा सुरू केलीय. एनएसडीएल-नोंदणीकृत डिमॅट अकाउंट असलेल्या सर्व युजर्सना MAFS मोबाईल अॅपद्वारे या कर्ज सुविधेचा लाभ घेता येईल. मिरे अॅसेट फायनान्शिअल सर्व्हिसेस ही शेअर्सवर एंड-टू-एंड डिजिटल कर्ज पुरवणाऱ्या मोजक्या कंपन्यांपैकी एक आहे. एनएसडीएल डिमॅट अकाउंट असलेले ग्राहक त्यांची इक्विटी गुंतवणूक ऑनलाइन तारण ठेवून 10,000 ते 1 कोटी रुपयांपर्यंतच्या शेअर्सवर कर्ज घेऊ शकतात. अॅप्रुव्ड इक्विटीच्या विस्तृत सूचीमधून ग्राहक त्यांचे शेअर्स तारण ठेवू शकतात, आणि त्याच दिवशी लोन अकाउंट तयार करू शकतात. त्यानंतर ग्राहकांना आवश्यक ती रक्कम मोबाईल अॅपद्वारे कधीही आणि कुठेही काढता येईल. कर्जाची रक्कम त्याचदिवशी थेट ग्राहकाच्या बँक अकाउंटवर जमा केली जाते. तसंच संबंधित कर्ज जेवढ्या कालावधीसाठी वापरलं जाईल, तेवढ्या कालावधीसाठी वार्षिक 9 टक्के दराने व्याज घेतलं जाईल. युजर्स MAFS मोबाइल अॅपद्वारे कर्जासाठी अर्ज करू शकतात, आणि आवश्यक रक्कम काढू शकतात तसेच ती परत करू शकतात. या अॅपद्वारेच लोन अकाउंट बंद केले जाऊ शकते. अॅपवर इतर अनेक सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. कर्जाचा चांगला पर्याय - मिरे अॅसेट फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा कन्हैया या सुविधेचा शुभारंभ करताना म्हणाले, ‘आमच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये एनएसडीएल सोबत शेअर्सवर डिजिटल कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा खूप आनंददायी आहे. यामुळे आम्हाला ग्राहकांना त्यांचे शेअर्स ऑनलाइन तारण ठेवण्याची आणि त्याच दिवशी शेअर्सवर कर्ज देण्याची परवानगी मिळाली आहे. यापूर्वी, आम्ही म्युच्युअल फंडाच्या बदल्यात कर्ज सुविधा देखील सुरू केली होती, ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मला खात्री आहे की, शेअर्सवरील कर्ज आमच्या ग्राहकांना अचानक खर्च व्यवस्थापित करण्यासाठी अधिक चांगला पर्याय देईल. ही सुविधा गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी तसेच प्रवास, वैद्यकीय खर्च, घर दुरुस्ती यासारखे अल्पकालीन खर्च व्यवस्थापित करण्यास मदत करते आहे.’ हेही वाचा - Money Mantra - गुंतवणुकीच्या नव्या संधी पण आर्थिक राशिभविष्य पाहूनच शेअर मार्केटमध्ये करा खर्च किचकट प्रक्रियेपासून सुटका - यापूर्वी कर्जासाठी अर्ज करण्याची किचकट प्रक्रिया आणि लोन अकाउंट तयार करण्यासाठी लागणारा बराच वेळ, यामुळे ग्राहकांची निराशा होत होती. परंतु मिरे अॅसेट फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी आधीच म्युच्युअल फंड सुविधेवर कर्ज देत आहे. आता ग्राहकांना शेअर्सच्या बदल्यात कर्जही मिळू शकणार असून यासाठी प्रक्रियाही अतिशय सोपी आहे. दरम्यान, तुमच्या सोयीनुसार शेअर्स तारण ठेवून मिळालेलं कर्ज तुम्ही वापरू शकाल. त्यामुळे अचानक पैशाची आवश्यकता भासली, आणि तुमच्याकडे शेअर्स असतील, तर अशावेळी शेअर्स तारण ठेवण्याचा पर्याय फायदेशीर ठरू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.