नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर: देशातला सर्वांत मोठा आयपीओ (Largest IPO in India) अशी चर्चा असणाऱ्या पेटीएम आयपीओची (Paytm IPO) येत्या 18 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात नोंदणी (Paytm IPO Listing in Stock Market) होईल. या दिवशी पेटीएमच्या शेअरचा भाव आयपीओमधल्या प्राइस बँडपेक्षा किती वाढेल यावर या आयपीओचं यश ठरवलं जाईल. या शेअरच्या किमतीत चांगली वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात असून, त्यामुळे या कंपनीतले आजी-माजी कर्मचारी करोडपती होतील, असं भाकीत केलं जात आहे.
हा आयपीओ बंद होण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (10 नोव्हेंबर) त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, आता या आयपीओद्वारे कंपनीनं विक्रीसाठी खुल्या केलेल्या सर्व शेअर्सपेक्षा 1.89 पट अधिक मागणी नोंदवली गेली आहे. कंपनीनं 18,300 कोटी रुपयांचे शेअर्स विक्रीसाठी खुले केले होते. याची किंमत 2080 ते 2150 रुपये ठेवण्यात आली आहे. आता ज्या ग्राहकांनी या शेअर्ससाठी मागणी नोंदवली आहे, त्यांना शेअर्स वाटप करण्याची प्रक्रिया 15 नोव्हेंबर रोजी पूर्ण होईल. ज्यांना शेअर्स मिळाले नाहीत, त्यांना त्यांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया 16 नोव्हेंबर रोजी होईल. 17 तारखेला ज्या ग्राहकांना शेअर्स मिळाले आहेत, त्यांच्या डीमॅट खात्यात ते जमा केले जातील आणि 18 तारखेला शेअर बाजारात या शेअरची नोंदणी होईल. त्या वेळी या शेअरची किंमत 2080 ते 2150 रुपयांपेक्षा जास्त नोंदवली गेली, तर यात गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना फायदा होईल.
हे वाचा-Jandhan अकाउंट घरबसल्या करा Aadhaar शी लिंक, अन्यथा होईल 1.30 लाखांचे नुकसान
कंपनीच्या आजी -माजी कर्मचाऱ्यांनीही या आयपीओमध्ये गुंतवणूक केली असून, लिस्टिंगनंतर सुमारे 350 कर्मचार्यांची एकूण संपत्ती किमान 1 कोटी रुपये असेल. अनेक कर्मचारी करोडपती होतील, असं म्हटलं जात आहे. कंपनीतले इलेक्ट्रॉनिक्स अभियंता सिद्धार्थ पांडे यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं, की 9 वर्षांपूर्वी या डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा क्षेत्रातल्या कंपनीत सामील होण्यासाठी त्यांच्या वडिलांनी विरोध केला होता. त्या वेळी कंपनी अगदी नवीन होती, हे कार्यक्षेत्रही नवीन होतं. डिजिटल पेमेंटसारख्या संकल्पना आजच्या इतक्या प्रचलित झाल्या नव्हत्या. तेव्हा पांडे यांनी वडिलांच्या विरोधाला न जुमानता पेटीएममध्ये प्रवेश केला. आज पेटीएम देशातली एक आघाडीची कंपनी ठरली असून, आयपीओमुळे पांडे आणि त्यांच्यासारखे अनेक कर्मचारी कोट्यधीश झाले आहेत.
कंपनीच्या एका सूत्राने रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, पेटीएमच्या 18,300 कोटींच्या आयपीओला बुधवारी इश्यूच्या शेवटच्या दिवशी 1.89 पट सबस्क्रिप्शन मिळालं. ही देशाच्या इतिहासातली सर्वांत मोठी शेअर विक्री आहे. यामुळे पेटीएम देशातल्या सर्वांत मौल्यवान कंपन्यांपैकी एक बनली आहे. शेअर बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार, पेटीएमची (Paytm) मूळ कंपनी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या (One97 Communications Limited) 4.83 कोटी शेअर्सच्या ऑफरवर एकूण 9.14 कोटी शेअर्ससाठी बोली मिळाली आहे. किरकोळ गुंतवणूकदार विभागात या आयपीओला खूप लवकर पूर्ण सबस्क्रिप्शन मिळालं. त्याच वेळी, संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव असलेल्या समभागांवर बुधवारी जोरदार बोली लागली. संस्थात्मक खरेदीदार वर्गाकडून 2.79 पट बोली लागली.
हे वाचा-Petrol-Diesel: इंधनाचे नवे दर जारी, या शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांपेक्षाही कमी
पेटीएमने या आयपीओची प्राइस बँड 2080-2150 रुपये ठेवला आहे. याच्या वरच्या स्तरावरच्या किमतीनुसार म्हणजे 2150 रुपयांनुसार सध्या कंपनीचं मूल्यांकन 1.39 लाख कोटी रुपये आहे. पेटीएमचा आयपीओ कोल इंडियाच्या आधीच्या सर्वांत मोठ्या आयपीओपेक्षा मोठा आहे. कोल इंडियाचा आयपीओ (Coal India IPO) 15,000 कोटी रुपयांचा होता. देशातल्या सर्वांत मोठ्या आयपीओला शेअर बाजारात नोंदणी होताना कसा प्रतिसाद मिळतो, त्याच्या किमतीत किती वाढ होते याचे अंदाज वर्तवले जात असून, सर्वांचं लक्ष आता शेअर बाजारातल्या नोंदणीकडे म्हणजे लिस्टिंगकडे लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Paytm