मुंबई, 22 जानेवारी: सध्याच्या काळात देशात डिजिटल ट्रान्जेक्शनचा वापर वाढला आहे. परंतु तरीही मोठ्या संख्येने लोक इमरजेंसीसाठी केवळ कॅशवरच अवलंबून असतात. यामुळेच लोक त्यांच्या घरी जास्तीत जास्त कॅश ठेवण्यास प्राधान्य देतात. पण आपण घरात किती कॅश ठेवू शकतो याविषयी तुम्हाला माहिती आहे का? फार कमी लोकांना याविषयी माहिती असेल. याविषयीच सविस्तर आपण जाणून घेणार आहोत.
घरात किती कॅश ठेवू शकता?
नियमानुसार, तुम्हाला हवी तेवढी रोख रक्कम तुम्ही घरात ठेवू शकता. याबाबत सरकारने कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही, परंतु अट अशी आहे की तुमच्याकडे जी काही रोकड उपलब्ध आहे, ती कुठून आली आणि त्याचा स्रोत काय आहे. त्याची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असली पाहिजे.
टॅक्स भरणे गरजेचे
जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असेल तर त्यावर संपूर्ण टॅक्स भरणे गरजेचे असते. यासह, तुमच्याकडे टॅक्स भरण्या संबंधित सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे, जेणेकरुन इनकम टॅक्स विभागाकडून विचारणा केल्यावर तुम्ही रोख संबंधित कोणतीही माहिती सहजपणे देऊ शकता. तसेच त्यांचाही तुमच्यावर विश्वास बसेल.
या प्रकरणात आकारला जाऊ शकतो दंड
जर तुमच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आणि मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली. यासोबतच, जर तुम्ही त्या रोख रकमेची योग्य माहिती देऊ शकला नाही, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. छाप्यात जप्त केलेल्या रकमेच्या 137 टक्क्यांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
कॅशसंबंधीत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
एकावेळी बँकेत 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढताना किंवा जमा करताना तुम्हाला तुमचे पॅन कार्ड दाखवावे लागेल. खरेदीच्या वेळी, 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम भरता येत नाही. यासाठी तुम्हाला पॅन आणि आधार देखील दाखवावा लागेल. तुम्ही तुमच्या बँक खात्यात एका वर्षात 20 लाख रुपयांपेक्षा जास्त कॅश डिपॉझिट केल्यास, बँकेत पॅन आणि आधार दाखवावे लागेल.