• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • सोन्यात गुंतवणूक करायची आहे? निवडा Gold ETF चा पर्याय, असा मिळेल फायदा

सोन्यात गुंतवणूक करायची आहे? निवडा Gold ETF चा पर्याय, असा मिळेल फायदा

तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड किंवा गोल्ड ईटीएफमध्ये (Investment in Gold ETF) गुंतवणूक करणे योग्य ठरेल, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर: आपल्या देशात सोन्यातल्या गुंतवणुकीला (Gold Investment) नेहमीच पहिली पसंती असते. हा गुंतवणुकीचा एक सुरक्षित आणि चांगला परतावा देणारा पर्याय मानला जातो. सध्या सोन्याच्या किमतीत (Gold Price) घसरण सुरू असून, गेल्या वर्षभरात सोन्याचा दर 56 हजारांवरून 47 हजारांवर आला आहे. येणाऱ्या काळात सोन्याचे भाव पुन्हा वाढू शकतात. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. या पार्श्वभूमीवर, तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड किंवा गोल्ड ईटीएफमध्ये (Investment in Gold ETF) गुंतवणूक करणे योग्य ठरेल, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. गोल्ड ईटीएफ म्हणजे काय? हा ओपन एन्डेड म्युच्युअल फंड (Open Ended Mutual Fund) असतो, जो सोन्याच्या किमतींतल्या चढउतारांवर आधारित असतो. एक गोल्ड ईटीएफ युनिट म्हणजे 1 ग्रॅम शुद्ध सोनं. मुंबई शेअर बाजार किंवा राष्ट्रीय शेअर बाजारात तुम्ही शेअर्सप्रमाणे (Shares) गोल्ड ईटीएफची खरेदी आणि विक्री करू शकता; मात्र यात तुम्हाला प्रत्यक्ष सोनं मिळत नाही. गोल्ड ईटीएफची विक्री केल्यानंतर तुम्हाला सोन्याच्या किमतीइतके पैसे मिळतील. हे वाचा-पेन्शनधारकांसाठी खूशखबर! SBI च्या सेवेअंतर्गत घरबसल्या मिळतील सुविधा गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे गोल्ड ईटीएफमध्ये अगदी कमीत कमी सोनंही खरेदी करता येतं. यात एक युनिट म्हणजे एक ग्रॅम सोनं असते. यामुळे कमी प्रमाणात किंवा एसआयपीच्या (SIP) माध्यमातूनही सोनं खरेदी करणं शक्य होतं. ज्वेलरकडून इतक्या कमी प्रमाणात सोनं खरेदी करणं अनेकदा शक्य नसतं. गोल्ड ईटीएफची किंमत पारदर्शक आणि एकसमान असते. लंडन बुलियन मार्केट असोसिएशननुसार (London Bullion Market Association) याची किंमत ठरते. ज्वेलर्सकडे (Jewellers) सोन्याच्या किमतीत फरक असू शकतो. गोल्ड ईटीएफद्वारे खरेदी केलेलं सोनं 99.5 टक्के शुद्ध असतं. ही शुद्धतेची सर्वोच्च पातळी आहे. तुम्ही घेतलेल्या सोन्याची किंमत या शुद्धतेवर आधारित असते. गोल्ड ईटीएफ खरेदी करण्यासाठी केवळ 0.5 टक्के किंवा त्यापेक्षाही कमी दलाली द्यावी लागते. तसंच हे सोनं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात (Gold in Electronic Format) असतं. त्यामुळे चोरीची भीती नाही. ते डीमॅट खात्यात (Demat Account) ठेवलं जातं. त्यात फक्त वार्षिक डीमॅट शुल्क भरावं लागतं. तसंच याच्या व्यवस्थापनासाठी दर वर्षी फक्त एक टक्का शुल्क द्यावं लागतं. हेच तुम्ही ज्वेलरकडून सोन्याचं नाणं किंवा बिस्किट खरेदी केलं तर 8 ते 10 टक्के मजुरी द्यावी लागते. तसंच ते सोनं सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेत लॉकरसाठीही शुल्क भरावं लागतं. गोल्ड ईटीएफची शेअर मार्केटमध्ये त्वरित खरेदी आणि विक्री करता येते. यावर कर्जही मिळू शकतं. हे वाचा-Gold Price Today: स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, 9358 रुपयांनी कमी आहेत दर गुंतवणूक कशी करता येते? गोल्ड ईटीएफ खरेदी करण्यासाठी, तुमचं डीमॅट खातं असणं आवश्यक आहे. त्याद्वारे तुम्ही राष्ट्रीय शेअर बाजारात उपलब्ध गोल्ड ईटीएफची युनिट्स खरेदी करू शकता. त्यासाठीची रक्कम तुमच्या डीमॅट खात्याशी जोडलेल्या बँक खात्यातून कापली जाईल. डीमॅट खात्यात ऑर्डर दिल्यानंतर दोन दिवसांनी गोल्ड ईटीएफ तुमच्या खात्यात जमा होतात. सोन्याचा दर 54 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता कोरोनामुळे आणि वाढत्या महागाईमुळे सध्या सोन्याच्या किंमतीवर (Gold Price Today) थोडासा दबाव आहे; मात्र आगामी काळात सोन्याच्या किमती वाढतील. येत्या एक वर्षात सोनं पुन्हा 54 हजारांपर्यंत जाऊ शकतं, असं केडिया कमोडिटीचे (Kedia Commodity) संचालक अजय केडिया यांनी म्हटलं आहे. पृथ्वी फिनमार्टचे (Pruthvi Finmart) संचालक मनोज कुमार जैन यांनीही याला दुजोरा दिला असून, येत्या वर्षाअखेरीस सोन्याची किंमत 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज वर्तवला आहे. मर्यादित प्रमाणात गुंतवणूक आवश्यक रुंगटा सिक्युरिटीजचे (Rungata Securities) हर्षवर्धन रुंगटा यांच्या मते, ‘सोन्यात गुंतवणूक करणं आवडत असलं, तरी ती मर्यादित प्रमाणातच करणं आवश्यक आहे. एकूण पोर्टफोलिओच्या केवळ 10 ते 15 टक्के रक्कमच सोन्यात गुंतवली पाहिजे. कारण सोन्यात गुंतवणूक केल्यानं संकटाच्या काळात तुमच्या पोर्टफोलिओला स्थैर्य मिळू शकतं; पण त्यामुळे तुमचा दीर्घकालीन परतावा कमी होऊ शकतो.’
First published: