मुंबई, 20 जुलै: भारतीय रेल्वे (Indian Railway) ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडूंना प्रवास भाड्यात पूर्वीप्रमाणं सवलत (concessions on fares for senior citizens and sports persons) न देण्याचा निर्णय घेतला आहे. कमी तिकीट दर आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सवलतींमुळं रेल्वेला मोठा तोटा होत असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी आज लोकसभेत दिली. रेल्वे तिकीटाचा दर किंवा प्रवासभाडं आधीच खूप कमी होतं आणि त्यात विविध श्रेणीतील प्रवाशांना सवलती दिल्यामुळं रेल्वेला वारंवार तोटा सहन करावा लागला आहे, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. कोविड-19 साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावानंतर रेल्वे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि क्रीडा व्यक्तींसाठी असलेल्या सवलतींवरील बंदी मागे घेण्याचा विचार करत आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात रेल्वेमंत्र्यांनी ही माहिती दिली. प्रवासी सेवांसाठी कमी भाड्यांमुळं रेल्वेला आधीच ज्येष्ठ नागरिकांसह सर्व प्रवाशांसाठी सरासरी प्रवास खर्चाच्या 50 टक्के पेक्षा जास्त खर्च करावा लागत आहे, असं वैष्णव म्हणाल्या. “याशिवाय, कोविड 19 मुळे, 2019-2020 च्या तुलनेत गेल्या दोन वर्षांतील रेल्वेची कमाई कमी आहे. याचा दीर्घकालीन परिणाम रेल्वेच्या आर्थिक आरोग्यावर होतो. सवलती देण्यामुळं रेल्वेवर खूप जास्त ताण येत आहे, त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांसह सर्व श्रेणीतील प्रवाशांसाठी सवलतींची व्याप्ती वाढवणं इष्ट नाही,” असं वैष्णव म्हणाल्या. **हेही वाचा:** Online Tax Filing App: ऑनलाइन रिटर्न भरताना होणारा त्रास संपणार, टाटाच्या ‘या’ अॅपमध्ये आहेत उत्तम सुविधा
रेल्वेमंत्र्यांनी या वर्षी मार्चमध्ये लेखी उत्तरात लोकसभेत सवलती पुनर्स्थापित न करण्याचे नमूद केलं होतं. परंतु रेल्वेच्या वित्त आणि सेवांमध्ये सुधारणा झाल्यामुळं आणि कोविडची परिस्थिती सुधारल्यामुळं किमान ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती पुनर्संचयित केल्या जातील अशी अपेक्षा होती. दरम्यान रेल्वेनं अपंग व्यक्तींच्या चार श्रेणी, रुग्ण आणि विद्यार्थ्यांच्या अकरा श्रेणींसाठी भाड्यात सवलत सुरू ठेवली आहे.
2019-20, 2020-21 आणि 2021-22 मध्ये आरक्षित वर्गात प्रवास केलेल्या ज्येष्ठ नागरिक प्रवाशांची संख्या अनुक्रमे 6.18 कोटी, 1.90 कोटी आणि 5.55 कोटी होती. 2020-21 आणि 2021-22 दरम्यान कोरोनामुळं ज्येष्ठ नागरिक प्रवाशांच्या संख्येत घट झाली. दरम्यान वैष्णव यांनी सभागृहाला माहिती दिली की 2019-20 मध्ये सुमारे 22.6 लाख ज्येष्ठ नागरिक प्रवाशांनी रेल्वेच्या शाश्वत विकासासाठी प्रवासी भाड्यात सवलत योजना सोडण्याचा पर्याय निवडल्याची माहिती रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सभागृहाला दिली