नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर: आयकर (Income Tax) चुकवण्यासाठी मोठ्या कंपन्या, फर्मस अनेक क्लृप्त्या लढवत असल्याचं अनेक प्रकरणांमध्ये समोर आलं आहे. असं असलं तरी आयकर विभाग छापा टाकून कर चुकवणाऱ्यांचा पर्दाफाश करत असतो. असाच एक प्रकार नुकताच उघडकीस आला असून, हेट्रो फार्मा (Hetero Pharma IT Raid) या कंपनीवर आयकर विभागानं छापा टाकला असता, आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. आयकर विभागानं छापा टाकला असता या कंपनीकडं 550 कोटी रुपयांची बेहिशोबी रक्कम आढळून आली. त्यात 142 कोटींच्या रोख रकमेचाही समावेश आहे. विशेष म्हणजे अँटी व्हायरल रेमडिसिव्हिर (Remdesivir) या औषधाचं उत्पादन ही कंपनी करते. या औषधाचा वापर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी केला जातो. या व्यतिरिक्त ही कंपनी अनेक औषधं परदेशात निर्यात करते. याबाबतचं वृत्त नवभारत टाइम्सनं दिलं आहे.
हैदराबाद येथील हेट्रो फार्मा या कंपनीवर आयकर विभागानं नुकताच छापा टाकला. यावेळी आयकर विभागाला सुमारे 550 कोटी रुपयांच्या बेहिशोबी उत्पन्नाची माहिती आढळून आली. यात 142 कोटी रुपयांच्या रोख रकमेचाही समावेश होता. ही सर्व रक्कम एका घरातील कपाटात आणि बॉक्समध्ये सापडली. त्याचप्रमाणे भारतीय स्टेट बॅंकेच्या लॉकर्स आणि अमीरपेट भागातील काही खासगी लॉकर्समध्ये लपवून ठेवलेले पैसे आयकर विभागाला मिळाले असून, ज्या घरांमधील बॉक्स आणि कपाटांमध्ये ही रक्कम लपवून ठेवण्यात आली होती, ती घरं एकतर कंपनीच्या संचालकांची होती किंवा ती त्यांनी भाडेतत्त्वावर घेतली असावीत, अशी चर्चा आहे.
6 कोटी PF खातेधारकांच्या खात्यात येणार व्याजाचे पैसे, अशाप्रकारे तपासा स्टेटस
कर टाळण्यासाठी रोख रक्कम लपवून ठेवणं, किमती अधिक दाखवणे, खर्च अधिक दाखवणे आणि त्याचे पैसे लपवणे अशा पद्धतीचा अवलंब केला जातो. भारतात भारतीय आणि परदेशी कंपन्यांसाठी करविषयक नियम वेगवेगळे आहेत. तसेच उलाढालीनुसार भारतीय कंपन्यांसाठी दोन स्लॅब ठेवण्यात आले आहेत. 2021 -22 या मूल्यांकन वर्षानुसार काही नियम ठरवण्यात आले आहेत, त्यानुसार, जर देशातील एखाद्या कंपनीची वार्षिक उलाढाल 400 कोटींपेक्षा कमी असेल तर त्यावर कंपनीला 25 टक्के कॉर्पोरेट कर (Corporate Tax) द्यावा लागतो. जर निव्वळ उत्पन्न 1 कोटी रुपयांपेक्षा कमी असेल तर कोणताही कर आकारला जात नाही. परंतु, जर 1 ते 10 कोटी रुपयांदरम्यान निव्वळ उत्पन्न असलेल्या कंपनीला 7 टक्के कर द्यावा लागेल. जर निव्वळ उत्पन्न 10 कोटींपेक्षा अधिक असेल तर 12 टक्के कर द्यावा लागेल.
जर देशातील एखाद्या कंपनीची वार्षिक उलाढाल 400 कोटींपेक्षा अधिक असेल तर 30 टक्के कॉर्पोरेट कर संबंधित कंपनीला भरावा लागेल. जर कंपनीचे निव्वळ उत्पन्न 1 कोटी रुपयांपेक्षा कमी असेल तर कोणातही अधिभार आकारला जात नाही. परंतु, जर 1 ते 10 कोटी रुपयांदरम्यान निव्वळ उत्पन्न असलेल्या कंपनीला 7 टक्के तर 10 कोटींपेक्षा निव्वळ उत्पन्न असलेल्या कंपनीला 12 टक्के अधिभार द्यावा लागेल.
Jhunjhunwala यांनी या शेअर्समधून कमावले 310 कोटी रुपये,तुम्ही गुंतवणूक केली आहे?
जर कंपनी परदेशी असेल तर कंपनीला 40 टक्के कॉर्पोरेट कर भरावा लागेल. जर परदेशी कंपनीचे निव्वळ उत्पन्न 1 कोटींपेक्षा कमी असेल तर त्यावर कोणाताही अधिभार आकारला जात नाही. मात्र जर कंपनीचे निव्वळ उत्पन्न 1 ते 10 कोटींदरम्यान असेल तर 2 टक्के तर निव्वळ उत्पन्न 10 कोटींपेक्षा अधिक असेल तर 5 टक्के अधिभार आकारला जातो.
आयकर विभागानं मागील दोन दिवसांत आंध्र प्रदेश, तेलंगणासह 6 राज्यातील 50 ठिकाणी छापेमारी केली. हेट्रो फार्मा कंपनीवर आयकर विभागानं छापा टाकून तपास केला असता, या कंपनीनं इनपुट कॉस्ट (Input Cost) प्रमाणापेक्षा अधिक दाखवली असल्याचं स्पष्ट झालं. कंपनीनं उत्पादित केलेल्या औषधांचं उत्पादित मूल्य (Production Cost) वाढीव दाखवलं. तसेच कंपनीनं कच्च्या मालाच्या किंमती आणि अन्य खर्च प्रमाणापेक्षा अधिक दाखवल्याचं स्पष्ट झालं.
याबाबत एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'या कंपनीने बनावट कंपन्यांकडून खरेदी केल्याचं दाखवलं असून, अशा कोणत्याच कंपन्या अस्तित्वात नाहीत. अमीरपेठमधील 8 खासगी लॉकर्समध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळून आली. यात प्रत्येक लॉकरमध्ये 1.5 कोटी म्हणजेच 8 लॉकर्समध्ये सुमारे 12 कोटी रुपये लपवून ठेवण्यात आले होते.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Income tax