बरेली, 18 जुलै : यूट्यूब, इन्स्टाग्रामसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कमाईची साधनं बनली आहेत. जगभरातील अनेक लोक या प्लॅटफॉर्मचा वापर मित्र, कुटुंबीय आणि नातेवाईकांशी कनेक्टेड राहण्यासोबत कमाईसाठी करत आहेत. अनेक युजर्सना युट्युब चॅनेल किंवा इन्स्टाग्राम रिल्स, पोस्टच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न देखील मिळत आहे. पण आता हे उत्पन्न प्राप्तीकर विभागाच्या रडारवर आलं आहे. उत्पन्नावरील कर चुकवणाऱ्या युजर्सवर चौकशी, कारवाईचा बडगा उगारला जात आहे. उत्तर प्रदेशातल्या बरेली येथील एका युट्युबरच्या घरावर प्राप्तीकर विभागाने छापा टाकला आहे. त्याच्या घरातून 24 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र या युट्युबरच्या कुटुंबियांनी तस्लिमवर करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. `आज तक`ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. बरेली येथील युट्युबर तस्लिम खानवर गैरमार्गाने कोट्यवधी रुपये कमवल्याचा आरोप लावण्यात आला. या संदर्भात तस्लिमच्या घराशेजारील लोकांनी तक्रार दाखल केली होती. या आरोपाची दखल घेत प्राप्तीकर विभागाने त्याच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत त्याच्या घरातून 24 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तस्लिम बरेलीतील नवाबगंज पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात राहतो. तो गेल्या दोन वर्षांपासून `ट्रेंडिंग हब 3.0` नावाचं यूट्युब चॅनेल चालवतो. या चॅनेलवरून शेअर बाजाराशी संबंधित व्हिडिओ शेअर केले जातात. तस्लिमचा भाऊ फिरोज या युट्यूब चॅनेलचा मॅनेजर आहे. दुसरीकडे या प्रकरणात तस्लिमची मालमत्ता आणि चॅनेलची चौकशी सुरू आहे. तस्लिमची देखील चौकशी केली जात आहे. तसेच छाप्यावेळी 24 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तस्लिमच्या कुटुंबियांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. ‘माझ्या मुलाला चुकीच्या पद्धतीने अडकवलं जात आहे,’ असा दावा, तस्लिमच्या आईने केला आहे. तस्लिमचे वडील मौसम खान म्हणाले, की ‘माझ्या मुलावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. 16 जुलैला प्राप्तीकर विभागाचे पथक आले होते. त्यांनी चौकशी केली. या तपासात माझा मुलगा निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या कंपनीची कागदपत्रं वैध आहेत. माझा मुलगा गेल्या काही वर्षांपासून युट्युब चॅनेल चालवतो. या चॅनेलमधून आम्ही चांगला पैसा कमावला आहे. या पैशावर माझ्या मुलाने त्याच्या व्यवसायाचा विस्तार केला. ही बाब आमच्या घराशेजारील लोकांना खटकत होती. त्यामुळे त्यांनी माझ्या मुलाविरोधात तक्रार केली. ही छापेमारी एक नियोजित कट आहे.’ तस्लिमचा भाऊ फिरोजने सांगितले की, ‘हा एक विचारपूर्वक केलेला कट असून, त्यात माझ्या भावाला गोवलं जात आहे. माझ्या भावावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. या चॅनेलच्या माध्यमातून आत्तापर्यंत एक कोटी 20 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. या उत्पन्नावरचा 40 लाख रुपये प्राप्तीकर आम्ही भरला आहे. माझ्या भावानं कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही. आम्ही आमचा युट्युब चॅनेल चालवतो. त्यातून आम्हाला चांगलं उत्पन्न मिळतं, हेच सत्य आहे.’ सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.