मुंबई, 1 ऑक्टोबर : पॅनकार्ड हे अत्यावश्यक डॉक्युमेंट आहे. इन्कम टॅक्स रिटर्नपासून ते बॅंकेच्या व्यवहारांपर्यंत सगळ्यासाठी पॅनकार्डची गरज लागतेच. पॅनकार्डचा उपयोग ओळखपत्र म्हणूनही केला जातो. तसंच आर्थिक व्यवहार करतानाही पॅनकार्डची गरज लागते. काही जणांकडे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड्स असतात. त्यामुळे अशा व्यक्ती अडचणीत येऊ शकतात.
खरं तर पॅनकार्ड काढताना त्या व्यक्तीची माहिती आणि ओळख पटवूनच तयार केलं जाते; पण 2016च्या पूर्वी आयकर विभागाकडे काही तक्रारी नोंदवल्या गेल्या, ज्यात एकाच व्यक्तीची दोनपेक्षा अधिक पॅनकार्ड्स असल्याचं सांगण्यात आलं.
दोन पॅनकार्ड्स असल्यास सरेंडर करा
तुमच्याकडे दोन पॅन कार्ड्स असतील, तर ते तुम्ही आयकर विभागाकडे सरेंडर करणं आवश्यक आहे. सरेंडर कसं करावं याची एक प्रक्रिया आहे. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन या दोन्ही मार्गांनी हे करू शकता.
एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असल्यास वाढतील अडचणी
आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार एकपेक्षा जास्त पॅनकार्ड बाळगणार्या व्यक्तीस 6 महिन्यांची कैद किंवा 10 हजार रुपये दंड होऊ शकतो. या शिक्षेत किंवा दंडात वाढही होऊ शकते.
काय आहे नियम?
एकपेक्षा जास्त पॅनकार्ड बाळगणं हे अवैध आहे आणि फसवणूकदेखील आहे. हे टाळण्यासाठी तुम्हाला तुमचं पॅनकार्ड नियमानुसार कोणत्या वॉर्ड किंवा सर्कलमध्ये येते हे जाणून घ्यायला हवे. वॉर्ड म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक व भौगोलिक स्थितीची माहिती. त्यानुसार जे वर्गीकरण होतं, त्याला सर्कल किंवा वॉर्ड असं म्हणतात.
अर्ज कसा कराल?
1. पॅनकार्ड आयकर विभागाकडूनच कुठल्याही व्यक्तीला दिलं जातं. प्रत्येक पॅनकार्डवर एक वॉर्ड असतो. या वॉर्डबद्दलची माहिती तुम्हाला आयकर विभागाच्या साइटवर मिळते. वॉर्डची माहिती मिळाल्यावर तुमच्या वॉर्ड अधिकार्याची अपॉईंटमेंट घ्यावी लागते.
2. तुम्हाला एक अर्ज करावा लागतो. सोबत तुम्हाला 100 रुपयांच्या बॉंड पेपरवर स्वत:च्या दोन्ही पॅनकार्ड्सबद्दल माहिती द्यावी लागते. वॉर्ड ऑफिसर तुमच्या पॅनकार्डची ऑनलाइन पडताळणी करील. तुम्हाला त्याच्याकडून एक रीसीव्हिंग मिळेल.
3. अर्जासोबत तुम्हाला दोन्ही पॅनकार्ड्स आयकर विभागाकडे जमा करावी लागतात. पॅनकार्ड सरेंडर करण्याची एकंदर प्रक्रिया पूर्ण होण्यास 30 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो.
4. आयकर विभागाच्या साइटवर स्वत:च्या पॅनकार्ड स्टेटसची माहिती मिळू शकते.
5. आता ही प्रक्रिया ऑनलाइनदेखील पूर्ण करता येते. परंतु, पॅनकार्ड सरेंडर करण्यासाठी तुम्हाला आयकर विभागात किंवा तुमच्या पॅन कार्ड वॉर्ड ऑफिसरच्या ऑफिसमध्ये जावं लागेल.
एकापेक्षा अधिक पॅनकार्ड बाळगल्यामुळे निर्माण होणार्या अडचणींची पुरेशी माहिती अनेकांना नसते. यासाठीच तुमच्याकडे दोन पॅनकार्ड असतील, तर तुम्ही आयकर विभागाशी तातडीने संपर्क साधणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pan card