प्रॉव्हिडंट फंडातून पैसे काढण्याबाबत नवे नियम; बेरोजगार असाल तर अ‍ॅडव्हान्स घेण्याची सुविधा

प्रॉव्हिडंट फंडातून पैसे काढण्याबाबत नवे नियम; बेरोजगार असाल तर अ‍ॅडव्हान्स घेण्याची सुविधा

अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत किंवा अनेकांचे पगार कमी झाले आहेत. अशावेळी एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशननं (EPFO) आपल्या सदस्यांना मदतीचा हात दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जून: कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी तसंच नोकरीच्या काळात आर्थिक अडचण उद्भवल्यास मदत करण्यासाठी प्रॉव्हिडंट फंड (Provident Fund) उपयुक्त ठरतो. कर्मचारी आणि कंपनी यांच्या योगदानातून यात पैसे साठवले जातात. सध्याच्या कोरोनाच्या काळात अनेक उद्योगधंदे बंद पडले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत किंवा अनेकांचे पगार कमी झाले आहेत. अशावेळी एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशननं (EPFO) आपल्या सदस्यांना मदतीचा हात दिला आहे.

ईपीएफओनं (EPFO) एक महिना किंवा त्याहून अधिक काळ बेरोजगार (Unemployed) असलेल्या आपल्या सदस्यांना अ‍ॅडव्हान्स (Advance) घेण्याची परवानगी दिली असून, ही रक्कम परत करण्याची (Non Refundable) गरज नाही. आता सदस्य त्यांच्या भविष्य निर्वाह निधी (PF) खात्यात उपलब्ध असलेल्या एकूण रकमेच्या 75 टक्क्यांपर्यंतची रक्कम आगाऊ घेऊ शकतात. नुकतीच ईपीएफओनं आपल्या ट्विटर हँडलवर ही घोषणा केली आहे. यामुळं बेरोजगार असलेल्या सदस्यांना अधिक आर्थिक सहाय्य मिळेल. त्याचबरोबर त्यांचं ईपीएफ खातंही सुरू राहिल्यानं निवृत्तीवेतन सदस्यत्वही कायम राहिल. ईपीएफओच्या या निर्णयानं लाखो सदस्यांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा- शेअरमध्ये पैसे गुंतवायचे आहेत?, हा शेअर देईल तुम्हाला भरपूर नफा

कोरोनाविषाणू साथीच्या (Coronavirus Pandemic) या कठीण काळात कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. त्यासाठी पीएफ खात्यांमधून सदस्यांना रोख रक्कम देण्याची सुविधा ईपीएफओच्या सहकार्यानं देण्यात आली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्या सदस्यांना परतफेड करण्याची आवश्यकता नसलेला कोविड-19 अ‍ॅडव्हान्सचा (Covid-19 Advance) दुसरा हप्ता घेण्याची परवानगी दिली होती. मूळ पगार आणि महागाई भत्त्याची रक्कम अशी 3 महिन्यांची रक्कम किंवा खात्यात शिल्लक असलेल्या रकमेच्या 75 टक्के यापैकी जी कमी रक्कम असेल ती काढण्याची परवानगी देण्यात आली होती.

कोविड-19 साथीच्या काळात सर्व सदस्यांना विशेषत: ज्यांचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा सदस्यांना अ‍ॅडव्हान्स घेण्याची सुविधा प्राधान्यानं देण्यात आली होती.

ईपीएफओद्वारे करण्यात आलेले आणखी काही बदल :

ईपीएफमधून कोविड अ‍ॅडव्हान्सद्वारे पैसे काढण्याची सुविधा पूर्णपणे वापरलेली नसेल तर सदस्य नोकरी सोडल्यानंतरही कोविड अ‍ॅडव्हान्स सुविधा वापरू शकतील.

ईपीएफओच्या सूचनेनुसार, कोविड-19 साथीच्या काळात पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटूंबाला एम्प्लॉयी डीपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) योजनेद्वारे जास्तीत जास्त 7 लाख रुपये मिळतील. यापूर्वी ही रक्कम 6 लाख रुपये होती, ती आता वाढवून 7 लाख रुपये करण्यात आली आहे. तर किमान रक्कम अडीच लाख रुपयेच कायम ठेवण्यात आली आहे.

ईएसआयसी (ESIC) योजनेंतर्गत विमा उतरवलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी कामगार मंत्रालयानं (Labour Ministry) कोविड-19 मुळे मरण पावलेल्या कर्मचार्‍याच्या कुटुंबाला महत्त्वपूर्ण सामाजिक सुरक्षा प्रदान केली आहे. त्यासाठी दोन लाभदायी तरतुदी केल्या आहेत. कोविड-19मुळे मरण पावलेल्या कामगाराच्या पगाराची नुकसान भरपाई आणि दिवंगत कामगारांच्या अंतिम संस्कारांसाठी खर्चाची तरतूद करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

Published by: Pooja Vichare
First published: June 21, 2021, 5:29 PM IST

ताज्या बातम्या