मुंबई, 15 जुलै: आजकाल एटीएममधून (ATM) पैसे काढणे ही अगदी सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. अगदी रात्री, अपरात्रीदेखील रोख पैसे मिळण्याची सोय झाल्यानं एटीएम सुविधा आता चांगलीच वाढली आहे. शहरात तर अगदी पावलापावलावर कोणत्या न कोणत्या बँकेचे एटीएम आढळते. गेल्या 20 वर्षात देशात एटीएमचा पूर आला आहे, तरीही आश्चर्याची बाब म्हणजे आपण जागतिक पातळीवर यात खूपच मागे आहोत. एटीएमची जागतिक सरासरी प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमागं 50 इतकी आहे, त्या तुलनेत आपल्या देशात प्रति लाख लोकसंख्येमागं केवळ 28 एटीएम आहेत. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सप्टेंबर 2020 मधील एका अहवालानुसार संपूर्ण देशातील एटीएमची संख्या 2लाख 34 हजार 244 होती. तर दी हिंदू बिझिनेस लाइनच्या अहवालानुसार, एटीएमच्या माध्यामातून दरवर्षी सरासरी 2 लाख 60 हजार कोटी रुपये काढले जातात. हे प्रमाण एकूण चलन व्यवहाराच्या 10 टक्के आहे. बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) आणि बँकिंगच्या दृष्टीनं (Banking) एटीएम हे एक महत्त्वाचे साधन आणि सुविधा आहे, मात्र ग्रामीण भागात (Rural Area) त्याचा विस्तार आणखी होणं आवश्यक आहे. त्यामुळं बँका एटीएमचं जाळं वाढवण्यावर भर देत असून, याद्वारे एका चांगल्या व्यवसायाची संधी उपलब्ध होत आहे. नोटाबंदीनंतर या व्यवसायात बरीच भरभराट झाली आहे. बर्याच कंपन्या देतात एटीएम फ्रँचायझी एटीएम फ्रँचायझी (ATM Franchisee) हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. याद्वारे नियमित उत्पन्न मिळते. मात्र बँका स्वतः आपल्या एटीएमची फ्रँचायझी देत नाहीत तर त्यांनी हे काम तृतीय पक्षाकडे (Third Party) सोपविले आहे. यामध्ये अनेक कंपन्यांचा समावेश आहे. टाटा इंडिकॅश एटीएम, हिताची, मुथूट एटीएम आणि इंडिया 1 एटीएम ही यामधील प्रमुख नावे आहेत. टाटा इंडिकॅश (Tata Indicash) ही त्यांच्यातील सर्वात मोठी आणि जुनी कंपनी आहे. हे वाचा- RBI ने रद्द केला राज्यातील या बँकेचा परवाना, ग्राहकांना काढता येणार नाहीत पैसे किती करता येईल गुंतवणूक? टाटा इंडिकॅश 3 लाख रुपये भांडवल आणि 2 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट अशा 5 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर फ्रँचायझी देते. 2 लाख रुपयांचे हे डिपॉझिट परत दिले जाते. तुमच्याकडे योग्य ठिकाणी किमान 60 ते 80 चौरस फूट व्यावसायिक जागा स्वमालकीची किंवा लीजवर घेतलेली असेल तरीही तुम्ही ही फ्रँचायझी घेऊ शकता. टाटा इंडिकॅश तुमचे लोकेशन शॉर्टलिस्ट करते. यानंतर कंपनीबरोबर करार केला जातो. तीन लाख रुपयांचे खेळते भांडवल हे तुम्हाला एटीएम मशीनमधील रोख रक्कम संपल्यानंतर भरण्यासाठी वापरायचे असते. हे पैसे त्या बँकेतील तुमच्या चालू खात्यात भरले जातात. गरजेनुसार तुम्ही ते काढून एटीएम मशीनमध्ये भरायचे असतात. एटीएममधून जसे व्यवहार होत जातात तशी बँक तुमच्या खात्यात पैसे जमा करत जाते. तुमच्यावर असेल महत्त्वाची जबाबदारी एकदा एटीएम सुरू झाल्यानंतर त्याचे सर्व कामकाज पाहण्याची जबाबदारी तुमची असते. वीज बिल भरणे, देखभाल आणि स्वच्छता ही सगळी जबाबदारी तुमची असते. यासाठी एक वर्षाचा लॉक-इन कालावधी असतो. त्याआधी एटीएम केंद्र बंद करावे लागल्यास एक लाख रुपये दंड म्हणून वजा केला जातो. किती मिळेल कमिशन? तुमच्या एटीएम सेंटरवरून होणाऱ्या प्रत्येक रोख व्यवहारावर 8 रुपये आणि विना रोकड व्यवहारावर 2 रुपये कमिशन मिळते. वार्षिक आधारावर हा परतावा साधारण 33 ते 50 टक्के असतो. हे वाचा- Gold Price Today: आज खरेदी करता येईल 7921 रुपयांनी स्वस्त सोनं,तपासा लेटेस्ट दर याठिकाणी मिळवा सविस्तर माहिती तुम्हालाही एटीएम फ्रँचायझी घ्यायची असेल तर https://indicash.co.in/contact-us/atm-franchise/ या लिंकवर जाऊन पूर्ण माहिती भरा किंवा 1800 2662 660 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून माहिती मिळवू शकता. महिन्याला कमावा जवळपास 50000 रुपये तुमच्या एटीएममधून दररोज 250 व्यवहार होत असतील आणि त्यात 65 टक्के व्यवहार रोख रक्कम काढण्याचे आणि 35 टक्के इतर व्यवहार असतील तर तुम्हाला कमिशनच्या माध्यमातून महिन्याला 45 हजार रुपये मिळतील. दररोज सरासरी 350 व्यवहार होत असतील तर 60 ते 62 हजार रुपये आणि दररोज 500 व्यवहार झाले तर 80-90 हजार रुपये उत्पन्न मिळू शकतील. एटीएमची जागा तुमची स्वतःची असेल तर वीज आणि सुरक्षा रक्षकाचा एकूण खर्च दरमहा 30 हजार असेल. तो वजा जाता एका महिन्यात तुम्ही किमान 15 हजार आणि जास्तीत जास्त 50 हजार रुपये मिळवू शकता. दररोज किती ग्राहक येतात आणि ते किती व्यवहार करतात यावर ही कमाई अवलंबून आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.