नवी दिल्ली, 16 मार्च: अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme) ही असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आली होती. परंतु, आता ज्यांचे पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) अकाऊंट आहे, असे 18 ते 40 वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करुन पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. या योजनेतून रक्कम जमा करणाऱ्या व्यक्तीस वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळू लागेल. अटल योजनेतील पेन्शनची रक्कम ही तुम्ही गुंतवणूक (Investment) केलेल्या रकमेवर आणि वयावर (Age) अवलंबून असेल.
या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला कमीत कमी 1000, 2000, 3000, 4000 किंवा जास्तीत 5000 रुपये पेन्शन मिळू शकते. केंद्र सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरु केली. या योजनेसाठी जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर तुमच्याकडे सेव्हिंग्ज अकाऊंट (Savings Account), आधार क्रमांक (Aadhar Number) आणि मोबाईल क्रमांक (Mobile Number) असणं आवश्यक आहे.
ही योजना नेमकी कशी आहे?
जितक्या लवकर तुम्ही या योजनेत सहभागी व्हाल, तितका फायदा अधिक मिळेल. जर कोणतिही व्यक्ती वयाच्या 18 वर्षी या योजनेत सहभागी झाली तर त्यास वयाच्या 60 वर्षांनंतर 5000 रुपये पेन्शन मिळू शकते, मात्र यासाठी संबंधित व्यक्तीस दरमहिना 210 रुपये या योजनेत जमा करणं आवश्यक आहे. म्हणजेच दररोज तुम्ही जर 7 रुपये जमा केले तर तुम्हाला 60 वर्षांनंतर दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळू शकेल. जर तुम्ही दर महिन्याला 42 रुपये जमा केले तर तुम्हाला दरमहा 1000 रुपये पेन्शन मिळेल. त्याचप्रमाणे 2000 रुपये पेन्शनसाठी 84 रुपये, 3000 रुपयांसाठी 126 रुपये, 4000 रुपये पेन्शनसाठी दरमहा 168 रुपये जमा करावे लागतील.
(हे वाचा: Mera Ration App :रेशन कार्ड धारकांच्या अडचणी संपणार, घरसबल्या मिळणार सर्व माहिती )
आपले कॉन्ट्रीब्युशन असं तपासा
अटल पेन्शन योजनेतून केलेलं ट्रान्झॅक्शन (Transaction) तपासण्यासाठी ग्राहक APY मोबाईल अॅप्लिकेशन किंवा APY आणि NPS Lite app वापरु शकतात. APY युझर्सकडून पहिल्या 5 ट्रान्झॅक्शन तपासण्यासाठी कोणतेही शुल्क घेतलं जात नाही. तसेच युझर्स आपले ट्रान्झॅक्शन स्टेटमेंटस आणि e-PRAN विनाशुल्क डाऊनलोड करु शकतात. तसेच आपले APY ट्रान्झॅक्शन पाहण्यासाठी युझर्सला APY NSDL CRA या वेबसाईटवर जावे लागेल. इथे लॉग-इन करण्यासाठी मात्र PRAN आणि सेव्हिंग अकाऊंटचा तपशील आवश्यक आहे. जर तुमच्याकडे PRAN चा तपशील उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमचे नाव, अकाऊंट क्रमांक आणि जन्म तारखेचा तपशील वापरु शकता. तसेच युझर्स UMANG या अॅपच्या माध्यमातून एकूण जमा रकमेचा तपशील, ट्रान्झॅक्शन तपशील आणि e-PRAN कार्ड डाऊनलोड करु शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India, Lifestyle, Money, Pension scheme, Scheme