मुंबई : सध्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये खूप तेजी आहे. मध्यम वा उच्च मध्यमवर्गीय कुटुंबं मोठ्या प्रमाणात फ्लॅट वा घरखरेदी करत आहेत. अर्थातच घरखरेदी करण्याएवढी मोठी रक्कम या वर्गातल्या कुटुंबांकडे एकरकमी असण्याची शक्यता नसते. त्यासाठी बँकेच्या कर्जाचं साह्य घ्यावं लागतं.
त्यामुळे ही कुटुंबं बॅंकेकडून गृहकर्ज घेतात. गृहकर्ज घेणं ही पूर्वी खूप मोठी अवघड आणि किचकट गोष्ट होती. आता मात्र जगातल्या अन्य अनेक डिजिटल गोष्टींप्रमाणे गृहकर्जही डिजिटल स्वरूपात मिळवता येतं. डिजिटल स्वरूपात कर्ज घेण्याची पद्धत दिवसेंदिवस अधिक सुलभ होत आहे.
आता कर्ज घेण्यासाठी बॅंकेत 50 चकरा मारण्याची गरज नाही. कर्जप्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक झाल्याने विनाकारण होणारा त्रास टाळता येत आहे किंवा कमी करता येत आहे.
बॅंकेच्या शाखेतून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा कागदपत्रांतल्या काही ना काही त्रुटींमुळे आपल्याला बॅंकेत बरेच हेलपाटे मारावे लागतात; पण गृहकर्ज डिजिटल पद्धतीने घेताना त्रासाची शक्यता खूप कमी असते. गृहकर्ज डिजिटल पद्धतीने घेण्याचे फायदे कोणते आहेत, याबद्दल जाणून घेऊ या.
आता तुमची सगळी कामं घरबसल्या होणार, SBI देतंय खास सुविधा
स्वस्त कर्ज निवडता येतं
डिजिटल पद्धतीने कर्ज घेताना गृहकर्ज देणाऱ्या वेगवेगळ्या वित्तसंस्थांची तुलना करता येते. या तुलनेतून स्वस्त असं गृहकर्ज तुम्ही निवडू शकता. तुम्हाला गृहकर्जाची माहिती व त्याच्याशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता बॅंकेत जाण्याची गरज नसते. बॅंकेची वेबसाइट किंवा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कर्ज मागणी करू शकता.
कागदपत्रांच्या कटकटीपासून सुटका
कर्जासाठी अनेक प्रकारची कागदपत्रं जमा करावी लागणं ही बॅंकेत जाऊन कर्ज घेतानाची सर्वांत मोठी समस्या आहे. यासाठी बॅंकेत अनेकदा जावं लागू शकतं. डिजिटल पद्धतीत आपण आपली कागदपत्रं डिजिटल स्वरूपात अपलोड करू शकतो. ही प्रक्रिया आपण घरबसल्या अगदी आरामात पूर्ण करू शकतो. शिवाय आपला वेळ आणि येण्या-जाण्याचा खर्चही वाचतो. तसंच बॅंका डिजिटल कर्ज 24 तासांच्या आत मंजूरही करतात.
व्वा! बँक ऑफ महाराष्ट्रची भन्नाट ऑफर, 50 रुपयांपासून करा गुंतवणुकीचा श्रीगणेशा
परतफेडीमध्ये लवचिकता
डिजिटल गृहकर्ज घेतल्यावर आपल्याला परतफेडही खूप सुलभरीत्या करता येते. उदाहरणार्थ, कर्जाच्या परतफेडीदरम्यान तुमची आर्थिक परिस्थिती बदलल्यास, तुम्ही बँक अधिकाऱ्याच्या मदतीने अटी आणि शर्तींमध्ये बदल करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
अशा प्रकारे डिजिटल पद्धतीचा वापर करून अगदी आरामात व त्वरित गृहकर्ज घेता येऊ शकतं व आपल्या घराचं स्वप्न साकार करता येऊ शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Home Loan, Instant loans, Loan, Pay the loan