मुंबई, 29 डिसेंबर : ज्येष्ठ भारतीय उद्योगपती रतन टाटा हे अनेकांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्यामुळे इतर उद्योगपती कसे प्रेरित झाले, याबाबतच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. बुधवारी (28 डिसेंबर) बिझनेस आयकॉन रतन टाटा 85 वर्षांचे झाले. त्यानिमित्तानं उद्योगपती, राजकारणी आणि नियमित सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. व्हेंचर कॅपिटल कंपनी ‘कलारी कॅपिटल’च्या व्यवस्थापकीय संचालक वाणी कोला यांनी एक गोष्ट सांगितली आहे. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना भेटल्यानंतर प्रत्येक वेळी वाणी यांनी कशी प्रेरणा मिळाली, याबाबत त्यांनी माहिती दिली. वाणी कोला यांनी एका लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटलं आहे की, रतन टाटा प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी उत्सुक असतात आणि परस्परसंवादासाठी ते पूर्णपणे तयारी करून येतात. रतन टाटा यांच्याकडून शिकलेल्या चार महत्त्वाच्या गोष्टीही वाणी यांनी शेअर केल्या आहेत. रतन टाटा यांच्याकडून शिकण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे मीटिंगसाठी तयारी करणं. “संस्थापकांच्या मीटिंगमध्ये ते नेहमी अभ्यासपूर्ण प्रश्न घेऊन येतात. प्रत्येक तपशीलाकडे असलेलं लक्ष, कुतूहल आणि स्वभावातील शांतपणा, त्यांची बुद्धी आणि तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता यामुळे मला प्रेरणा मिळाली,” असं वाणी म्हणाल्या.
अभिप्राय देण्याबाबत रतन टाटांचा असलेला सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन हा वाणी कोला यांच्यासाठी दुसरा धडा आहे. त्यांच्याशी केवळ संपर्क साधता येतो असं नाही तर ते भेटीमध्ये खरोखर रस दाखवतात. त्या म्हणाल्या, “टाटा नेहमी नवीन कल्पना ऐकण्यासाठी आणि तरुण उद्योजकांशी संपर्क साधण्यासाठी उत्सुक असतात.” टाटांकडून तिसरी शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांचा दयाळूपणा. ते अतिशय नम्र असून, अजिबात दिखाऊपणा करत नाहीत. जसे आहेत तसेच ते सर्वांसमोर वावरतात. टाटांच्या या गुणांबद्दल त्यांचे अनेक चाहते या पूर्वीही बोललेले आहेत. “त्यांच्याबद्दल कधीच काही वाईट ऐकायला मिळालं नाही. एक अस्सल प्रमुख कसा असावा याचं, ते एक परिपूर्ण उदाहरण आहेत,” असं वाणी कोला वाढदिवसाच्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत. रतन टाटांचे ते गोल्डन रूल्स, ज्यांच्या आधारे उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय जगाला जगण्यासाठी एक चांगलं स्थान बनवण्यासाठी योगदान देण्यात रतन टाटा नेहमी उत्सुक असतात. त्यांचा हा गुण वाणी यांना प्रेरित करणारा चौथा घटक आहे. त्या म्हणाल्या, “सकारात्मक बदल घडवणाऱ्या कल्पना त्यांना खऱ्या अर्थानं उत्तेजित करतात. व्यवसायाची सुरुवात करणार असलेल्या संस्थापकांसाठी तसेच काही मोठ्या स्टार्टअप्सचे नेतृत्व करणाऱ्या उद्योजकांसाठी ते सर्वोत्तम आदर्श आहेत,’ असं त्यांनी स्पष्ट केलंय.