Home /News /money /

हॉटेल-रेस्टॉरंट बिलात सर्व्हिस चार्ज घेत असेल तर काय कराल? नियम काय आहे?

हॉटेल-रेस्टॉरंट बिलात सर्व्हिस चार्ज घेत असेल तर काय कराल? नियम काय आहे?

सर्व्हिस चार्जेस देणं हे पूर्णपणे ऐच्छिक, पर्यायी आणि ग्राहकांच्या विवेकबुद्धीवर अवलंबून आहे, याबाबत रेस्टॉरंट किंवा हॉटेल्सनी ग्राहकांना सूचित करणं आवश्यक आहे, असं CCPA ने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलंय.

मुंबई, 5 जुलै : हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला असाल तर तुमच्याकडून त्या ठिकाणी सर्व्हिस चार्जेस आकारले गेले असतील. खरं तर ते सर्व्हिस चार्जेस (Service Charges) भरणं ग्राहकांना अनिवार्य नसतं, परंतु तरीही अनेक हॉटेल, रेस्टॉरंट ते अनिवार्य असल्याचं सांगत ग्राहकांकडून पैसे उकळतात. मात्र, आता केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (Central Consumer Protection Authority (CCPA) या संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, हॉटेल किंवा रेस्टॉरंट ग्राहकांवर दबाव टाकून सर्व्हिस चार्जेस आकारू शकत नाहीत. सर्व्हिस चार्जेस देणं न देणं हे पूर्णपणे ग्राहकांवर अवलंबून असेल. सीसीपीएने सोमवारी (4 जुलै, 2022) सांगितलं की, हॉटेल किंवा रेस्टॉरंट (hotels or restaurants) ऑटोमॅटिकली किंवा डिफॉल्टनुसार जेवणाच्या बिलांमध्ये सर्व्हिस चार्जेस लावू शकत नाहीत. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सेवा शुल्क आकारण्यासंदर्भात सीसीपीएने अनुचित व्यापार पद्धती आणि ग्राहक अधिकारांचे उल्लंघन रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहे. कोणतंही हॉटेल किंवा रेस्टॉरंट ग्राहकांना सर्व्हिस चार्जेस भरण्याची सक्ती करू शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं. सर्व्हिस चार्जेस देणं हे पूर्णपणे ऐच्छिक, पर्यायी आणि ग्राहकांच्या विवेकबुद्धीवर अवलंबून आहे, याबाबत रेस्टॉरंट किंवा हॉटेल्सनी ग्राहकांना सूचित करणं आवश्यक आहे, असं CCPA ने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलंय. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय. "सर्व्हिस चार्ज वसूल करण्यावर आधारित सेवांच्या प्रवेशावर किंवा तरतुदीवर कोणतेही निर्बंध ग्राहकांवर लादले जाणार नाहीत. सर्व्हिस चार्ज हे जेवणाच्या बिलासह जोडून आणि एकूण रकमेवर जीएसटी लागू करून वसूल करता येणार नाहीत, असं सीसीपीएने म्हटलंय. 24 जुलै 2020 रोजी ग्राहकांच्या हक्कांचा प्रचार, संरक्षण आणि अंमलबजावणी करण्यासाठी सीसीपीएची स्थापना करण्यात आली होती. एनसीएचकडे मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी सर्व्हिस चार्जेसबद्दल तक्रारी केल्यानंतर ही मार्गदर्शक तत्त्वं जाहीर करण्यात आली आहेत. ग्राहकांनी तक्रारी करताना अनेक मुद्दे मांडले होते. त्यात रेस्टॉरंटने सर्व्हिस चार्ज अनिवार्य करणं आणि ते डीफॉल्टनुसार बिलात लावणं, सर्व्हिस चार्ज भरण्यास विरोध केल्यास ग्राहकांचा अपमान करणं, अशा बाबींचा उल्लेख होता. त्यामुळे सर्व्हिस चार्जेस भरणं हे ऐच्छिक असावं, अशी ग्राहकांची मागणी होती, असं सीसीपीएने म्हटलंय. रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स बिलात सामान्यत: 10 टक्के सर्व्हिस चार्जेस वाढवतात. हॉटेल, रेस्टॉरंटने तुमच्या बिलात सेवा शुल्क लावल्यास तुम्ही काय करू शकता? हॉटेल किंवा रेस्टॉरंट वर नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन करून सेवा शुल्क आकारत असल्याचं कोणत्याही ग्राहकाला आढळल्यास, तो संबंधित हॉटेल किंवा रेस्टॉरंटला बिलाच्या रकमेतून सर्व्हिस चार्जेस काढून टाकण्याची विनंती करू शकतो. मात्र हॉटेल्सनी विनंती न ऐकल्यास ग्राहक राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर (NCH) 1915 वर कॉल करून किंवा NCH मोबाइल अॅपद्वारे तक्रार नोंदवू शकतात. याशिवाय www.e-daakhil.nic.in या ई-दाखिल पोर्टलद्वारे ग्राहक अनुचित व्यापार पद्धतींविरोधात ग्राहक आयोगाकडे तक्रार करू शकतात. तसंच ती व्यक्ती संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांकडे सीसीपीएद्वारे तपासासाठी आणि त्यानंतरच्या कार्यवाहीसाठी तक्रारदेखील दाखल करू शकते. तक्रार CCPA ला com-ccpa@nic.in वर ई-मेलद्वारे देखील पाठवता येते.
First published:

Tags: Money, Restaurant, Tax

पुढील बातम्या