मुंबई, 5 डिसेंबर: थिंक टँक पीपल रिसर्च ऑन इंडियाज कन्झ्युमर इकॉनॉमी (PRICE) ने 2021 मध्ये 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 63 शहरांमध्ये सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणाच्या निकालानुसार, या शहरांमध्ये राहणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी 27 टक्के नागरिक मध्यमवर्गीय म्हणजेच वार्षिक 5 लाख ते 30 लाख रुपये कमावणारे आहेत. PRICE सर्वेक्षणाचा दावा आहे की देशाच्या एकूण उत्पन्नापैकी 29 टक्के उत्पन्न या शहरांमधून येत आहे कारण येथे वस्तूंची मागणी वाढत आहे. पण त्याहूनही विशेष म्हणजे सुपर रिच लोकांच्या बाबतीत या शहरांचा वाटा 43 टक्के आहे. 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांचा अतिश्रीमंतांच्या म्हणजेच सुपर रिच श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत या शहरांचा एकूण खर्चात 27 टक्के वाटा आहे आणि एकूण बचतीत 38 टक्के वाटा आहे.
छोट्या शहरांमधून बाहेर पडत आहेत सुपर रिच-
कोरोनाच्या काळापासून भारताचा विकास दर जगातील सर्वात वेगानं वाढत असल्याचं सातत्यानं सांगितलं जात आहे. आता या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी देशातील मध्यमवर्ग काम करत असल्याचा दावा एका सर्वेक्षणात करण्यात आला आहे. या विकासाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे देशातील झपाट्यानं होणारं शहरीकरण, जे मध्यमवर्गीय लोकांच्या आणि देशाच्या प्रगतीचं लक्षण आहे. पण ही केवळ शहरीकरणापुरती मर्यादित आकडेवारी नाही, तर खेड्यांचं शहरांमध्ये आणि शहरांचं मोठ्या शहरांमध्ये रूपांतर होत आहे. भारतातील श्रीमंत वर्ग आता मेट्रो शहरांपुरता मर्यादित नाही. आता देशाच्या कानाकोपऱ्यात श्रीमंत लोक राहत आहेत, जे सर्वत्र अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम करत आहेत. त्यामुळं देशातील छोटी शहरेही आता विकासाची केंद्रे बनली आहेत. यामुळेच देशातील छोट्या शहरांतील लोकही कमाईच्या बाबतीत मागे नाहीत.
हेही वाचा: सत्यानाश! ‘या’ दोन मोठ्या बँकाचा ग्राहकांना झटका, कर्जावरील व्याजदरात ‘एवढी’ वाढ
सुरतमध्ये सर्वात वेगानं वाढणारा श्रीमंत
त्यामुळेच सुरतसारख्या छोट्या शहरांमध्येही सुपर रिच लोकांचं प्रमाण वाढलं आहे. 2015-16 आणि 2020-21 दरम्यान सुरतमधील अतिश्रीमंत कुटुंबांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. याशिवाय दुसऱ्या क्रमांकावर बंगळुरू, तिसऱ्या क्रमांकावर अहमदाबाद आणि नाशिक, चौथ्या क्रमांकावर चेन्नई, पाचव्या क्रमांकावर पुणे, सहाव्या क्रमांकावर कोलकाता, सातव्या क्रमांकावर नागपूर, आठव्या क्रमांकावर मुंबई आणि दहाव्या क्रमांकावर दिल्ली आहे. मुंबई आणि दिल्लीची तुलना केल्यास, सर्वेक्षणाच्या निकालानुसार मुंबईत 2.7 लाख अतिश्रीमंत कुटुंबे होती. तर दिल्लीत अतिश्रीमंत कुटुंबांची संख्या 1.8 लाख होती आणि सुरतमध्ये 31 हजार अतिश्रीमंत कुटुंबे होती.
देशात श्रीमंतांची वाढती संख्या-
PRICE नुसार, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1.25 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, असे देशातील 2 टक्क्यांहूनही कमी लोक 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या 63 शहरांमध्ये राहतात. तर या उत्पन्न गटातील उर्वरित 98 टक्के लोक देशाच्या इतर भागात राहतात. मध्यमवर्गाबद्दल बोलायचं झालं तर 55 टक्के मध्यमवर्ग या शहरांमध्ये राहतो. याशिवाय 32 टक्के लोकसंख्या कमी उत्पन्न वर्गातील आहे. या शहरांमध्ये गरीब लोकांची संख्या केवळ 1 टक्के आहे. तर 13 टक्के श्रीमंत या शहरांमध्ये राहतात.
या शहरांमध्ये लोकांचं उत्पन्न झपाट्यानं वाढलं-
भोपाळ, कोईम्बतूर, इंदूर, जयपूर, कन्नूर, कोची, कोझिकोड, लखनौ, मदुराई, मलप्पुरम, नागपूर, नाशिक, तिरुअनंतपुरम, त्रिशूर आणि तिरुपूर ही तरुण लोकसंख्या असलेली मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. या शहरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचं उत्पन्न झपाट्यानं वाढलं आहे. देशातील दोन तृतीयांशपेक्षा जास्त मध्यमवर्गीय कुटुंबे चेन्नई आणि दिल्लीसारख्या महानगरांमध्ये राहतात. येथील अर्थव्यवस्थेत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. याशिवाय मुंबई आणि पुण्यातील 50 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या मध्यमवर्गीय आहे. नागपूर, अहमदाबाद, कोलकाता, सुरत आणि नाशिकमध्ये 40 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या मध्यमवर्गीय आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Richest man in india