नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : ट्विटरची सूत्रं इलॉन मस्क यांच्याकडे गेल्यानंतर कंपनीच्या ध्येय-धोरणांत खूप बदल करण्यात येत आहेत. कंपनीतल्या अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं. अजूनही बऱ्याच जणांवर टांगती तलवार कायम आहे. कंपनीत काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांचीही स्थिती फारशी चांगली नसल्याचं चित्र आहे. ट्विटरने त्यांना कामावरून कमी केल्यानं आता करिअरच्या दृष्टीनं मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
भारतीय असलेल्या सुजाता कृष्णस्वामी ह्या त्यापैकी एक आहेत. गर्भवती असलेल्या सुजाता यांच्याकडे एच 1 बी व्हिसा असून त्याचा कालावधी संपण्यासाठी केवळ 60 दिवस शिल्लक आहेत. त्यांना आता ट्विटर कंपनीतून अचानक काढून टाकण्यात आलं आहे. या काळात व्हिसा स्पॉन्सर करणाऱ्या इतर कुठल्याही कंपनीत त्यांना नोकरी मिळाली नाही, तर त्यांच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा राहू शकतो, त्यांना देश सोडावा लागू शकतो.
ट्विटर कंपनीत टेक्निकल प्रोग्रॅम मॅनेजर पदावर सुजाता कार्यरत होत्या. त्यांनी ट्विटरवरून आपला अनुभव शेअर केला. त्या म्हणाल्या, की 'ट्विटर कंपनीला त्यांच्या नियमांचं तंतोतंत पालन करता यावे म्हणून गर्भवती असतानाही या वर्षाच्या सुरुवातीपासून मी ट्विटरच्या युजर-फेसिंग प्रायव्हसी फीचरसाठी अहोरात्र काम केलं. कामाबद्दल पूर्ण आत्मीयता बाळगली. मी व माझ्या टीमला काम खूप प्रिय होतं. परंतु दुर्दैवाने कंपनी आमच्यावर प्रेम करत नसल्याचं दिसतं.
आमच्या बाबतीत ज्या काही घडामोडी झाल्या त्यावर विश्वासच बसत नव्हता. सर्व प्रकार समजून घेण्यासाठी दोन दिवस लागले. शुक्रवारी ट्विटर कंपनीत माझा शेवटचा दिवस होता. मी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. एच 1 बी व्हिसा संपत असल्याने स्थिती आणखी गंभीर आहे.' पुढील काही दिवसांत नवीन स्पॉन्सर मिळाला नाही तर देश सोडावा लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा - आता पेन्शनधारकांना घरबसल्या मिळणार ‘ही’ सुविधा, करावं लागेल सोपं काम
एकट्या सुजाताच नव्हे, अनेक जण अडचणीत
नोकरी गेल्यानं एकट्या सुजाताच नव्हे, इतरही भारतीय कर्मचारी अडचणीत आले आहेत. सॉफ्टवेअर इंजिनीअर मधुरा दिघे यांनीही त्यांच्या भावना मांडल्या. त्या म्हणाल्या, की 'ट्विटरच्या निर्णयानंतर ज्या 50 टक्के कर्मचाऱ्यांची नोकरी गेली त्यात आमचाही समावेश आहे. सायंकाळी माझा व टीममधल्या इतर सहकाऱ्यांचा जीमेल व स्लॅक लॉग ऑफ झाला. त्यानंतर काहीही संवाद साधला गेला नाही. ही गोष्ट पचवणं आमच्यासाठी खूप त्रासदायक आहे. परंतु ट्विटरमध्ये हुशार आणि चांगल्या सहकाऱ्यांसोबत काम करण्याचा अनुभव आमच्यासाठी खूप चांगला होता.'
रुचिता परेरा यांनीही त्यांचं दु:ख सांगितलं. त्या म्हणाल्या, की, 'नोकरी गेलेल्या 50 टक्के कर्मचाऱ्यांत माझा समावेश आहे. मी सध्या एच 1 बी व्हिसावर इथे राहत असून नवीन पर्याय शोधण्यासाठी मर्यादित वेळ आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून माझ्याकडे 5 वर्षांचा अनुभव आहे आणि सक्रिय राहून नवीन संधींचा शोध मी घेत आहे.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.