डिजीटल पेमेंटची सुविधा आल्याने लोकांना रोकडविरहीत व्यवहार करणं सोपं झालं आहे. यामुळे बँक खात्यातून थेट पैसे देता येतात. ही सुविधा जितकी सोयीची आहे तितकेच त्यामध्ये धोके आहेत. डिजिटल व्यवहारांमध्ये फसवणुकीचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. युजर्सना वारंवार सुचना दिल्यानंतरही सायबर हल्ला करणारने फसवणुकीसाठी वेगवेगळ्या कल्पना लढवत असतात.
Google Pay, Pyatm, PhonePe यावरून मोठ्या प्रमाणावर पैशांची देवघेव केली जाते. इतर अॅपलादेखील हे अॅप जोडता येते. यात तुम्हाला एखादी वस्तू ऑनलाइन खरेदी करायची असेल तर त्याचे पेमेंटही इथून करता येते. त्यामुळे ऑनलाइन खरेदी-विक्री करताना फसवणूक होण्याची शक्यता असते. यासाठी तुम्ही जिथून साहित्य खरेदी करत आहात किंवा विकत आहात त्याची सुरक्षितता तपासून पाहा. एखाद्या पॉपअपवर क्लिक करणे टाळा. जाहिरातीच्या माध्यमातून प्रलोभन दाखवून तुमच्या खात्यातले पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात.
सध्या मोबाइलवर स्पॅम लिंक टेक्स्ट मेसेजवर पाठवल्या जातात. यात तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर देण्याचा दावा केला जातो. या लिंकवर क्लिक केल्यानंतर एखादं अॅप डाऊनलोड होतं. त्यानंतर तुम्हाला डिटेल्स द्याव्या लागतात. अशा लिंक्स क्लिक करणे टाळा आणि अॅप इन्स्टॉल करू नका.
तुमच्या खात्याची, मोबाईल वॉलेटची माहिती इतर कोणाला देऊ नका. वॉलेट अॅपमध्ये सिक्युरीटीचा पर्याय सिलेक्ट करा. तसेच ऑनलाइन खरेदी, विक्री करताना लगेच अॅडव्हान्स पेमेंट करण्यास सांगण्यात येत असेल तर थोडं सावध रहा.
तुम्ही एखाद्याला पैसे पाठवत असाल तर संबंधित व्यक्तीचा नंबर आणि खाते याची खात्री करून घ्या. तसेच ओटीपी, पिन नंबर याची माहिती इतरांशी शेअर करू नका.
फेक कॉलवरून तुम्हाला लॉटरी लागल्याचेही कॉल येऊ शकतात. त्यानंतर लॉटरीचे पूर्ण पैसे मिळण्यासाठी अॅडव्हान्स रकमेची मागणी केली जाते. त्यावर विश्वास ठेवू नका. आजकाल अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Google pay, Paytm