नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : रशिया-युक्रेन संकटादरम्यान (Russia-Ukraine Crisis) गुंतवणुकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक करत आहेत. यामुळे भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात (Gold - Silver Price) वाढ पाहायला मिळत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सकाळी सोन्याचा वायदे भाव 1.5 टक्क्यांनी वाढला. या वाढीसह सोन्याचा दर 50,990 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. सोने दरात तब्बल 800 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्यासह चांदीचा वायदे भावही वाढला आहे. चांदीच्या दरात 1.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीसह दर 65,869 किलोग्रॅमवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली आहे. जगभरातील वाढत्या महागाईमुळे सोने दरात वाढ होत असल्याचं एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. या महिन्यात सोनं 6 टक्क्यांनी महागलं - मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव फेब्रुवारीमध्ये 6 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. हे दर मागील एका वर्षाच्या सर्वोच्च स्तरावर आहेत. रशिया आणि युक्रेनमधील संकट वाढतचं राहिलं, तर सोन्या-चांदीच्या किमती वाढतच जातील असं जाणकारांचं म्हणणं आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत सोनं 55 हजारपर्यंत पोहोचू शकतं असा अंदाज आहे. शुक्रवारी सोने दरात काहीशी घसरण झाली होती. MCX वर शुक्रवारी सोन्याचा वायदे भाव 1.05 टक्के अर्थात 553 रुपयांनी कमी झाला होता. यामुळे सोने दर 51000 रुपयांजवळ होता. चांदीचा वायदे भावही 1105 रुपयांनी कमी होऊन 65,793 रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत होता. परंतु आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात मोठी वाढ झाली आहे.
हे वाचा - Personal Loan मुदतीआधी बंद करायचं आहे का? किती दंड लागतो? चेक करा
कशी तपासाल सोन्याची शुद्धता - तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
हे वाचा - आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या अंमलबजावणीला केंद्राची मंजुरी, 1600 कोटींची तरतूद
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे सोने दरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जगभरातील शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणुकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले असल्याचं चित्र आहे.