नवी दिल्ली, 25 जानेवारी : भारतीय बाजारांत आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी 25 जानेवारी 2021 रोजी सोन्याच्या दरात (Gold Price Today) 141 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचा भाव (Silver Price Today) काहीसा वधारला आहे. चांदीच्या दरात 43 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 48,650 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर चांदीचा भाव 65, 976 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे भाव घसरले आहेत. सोन्याचे नवे दर (Gold Price, 25 January 2021)- दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर सोमवारी 141 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरला. त्यामुळे दिल्लीत 99.9 ग्रॅम सोन्याचा भाव 48,509 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. आधीच्या सत्रात तो 48,650 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. चांदीचा आजचा भाव (Silver Price, 25 January 2021) - चांदीच्या दरात सोमवारी काहीशी वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 43 रुपयांनी वधारला. त्यामुळे दिल्लीत चांदीचा भाव 66,019 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे.
(वाचा - मोठी बातमी: आता 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोट चालणार नाही? RBI ने दिली माहिती )
एचडीएफसी सिक्योरिटीजचे सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचा परिणाम भारतीय बाजारातही झाला आहे. सोन्या-चांदीचे दर सध्या काहीसे स्थिर असल्याचं पाहायला मिळतंय. तसंच कोरोना लशीच्या चांगल्या बातम्याचा परिणामही मौल्यवान धातूच्या किंमतीवर होतो आहे. कोरोना लसीकरणामुळे सोन्या-चांदीचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. कोरोना काळात सोन्या-चांदीच्या दराने उच्चांकी पातळी गाठली होती. कोरोना काळात शेअर मार्केटमध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं. त्यामुळे गुंतवणुकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत होते. त्याचाच परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर झाला होता. परंतु आता कोरोना वॅक्सिनच्या सकारात्मक बातम्यांमुळे सोन्याचे भाव काही प्रमाणात कमी झाले आहेत.

)







