नवी दिल्ली, 03 मे: यावर्षी आलेल्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळं देशात संसर्ग वेगानं पसरत आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरातही पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. सोन्याच्या भावांत घसरणही पाहायला मिळाली आहे. तज्ज्ञांच्या मते ही घसरण फार काळ टिकणार नाही. येत्या काळात सोन्याचे दर पुन्हा उसळी मारणार असल्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. सध्या देशात सोन्याचे दर 46 हजार 743 इतके आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल 1015 रुपयांची घसरण झाली आहे. असं असलं तरी, एप्रिल महिन्यात सोन्याच्या दरात 2602 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. 31 मार्च 2021 रोजी देशात सोन्याचे दर 44 हजार 190 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे होते. त्यामुळे येत्या काळात सोन्याचे दर गगनाला भिडण्याची शक्यता असल्याचं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे. येत्या काही महिन्यात देशात सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा ओलांडू शकतात. या पाच कारणांमुळे सोन्याच्या किमती वाढणार 1. कोरोना विषाणूच्या साथीमुळं सध्या जगभर अनिश्चिततेचं वातावरण आहे. याचा परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात अनेक चढउतार येत आहेत. अशा स्थितीत गुंतवणूकदारांसाठी सोनं खरेदी हा सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक पर्याय बनत आहे. त्यामुळे सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट 2020 मध्येही सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. तेव्हा प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 च्या विक्रमी पातळीवर पोहचली होती. 2. चीनची मध्यवर्ती बँक सोन्याच्या साठ्यात वाढ करताना दिसत आहे. त्याचबरोबर येथील बँकांनाही सोन्याची आयात करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. 3. मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किमती कमकुवत होत आहेत. तसेच रुपयाच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. परिणामी येणाऱ्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत तेजी दिसू शकते. हे ही वाचा- कोरोना काळात Mutual Funds देत आहेत खास योजना, गुंतवणूक केल्यास मिळेल मोफत विमा 4. गेल्या आठवड्यात राष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. असं असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दराची तेजी कायम आहे. अमेरिकन बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस 1773 डॉलर इतकी आहे. 1 एप्रिल रोजी अमेरिकेत सोन्याचा दर प्रति औंस 1,730 डॉलर इतका होता. 5. किरकोळ आणि घाऊक बाजारातील महागाईच्या आकड्यांमुळेही सोन्या-चांदीच्या किमतींमध्येही वाढ दिसून येईल. किरकोळ आणि घाऊक महागाईने गेल्या 8 वर्षातील उच्चांक गाठला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.