नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : सोन्याच्या किमती (Gold Prices) सातत्याने वाढत आहेत. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) प्रति तोळा (10 ग्रॅम) 49 हजार रुपयांच्या वरच्या पातळीवर राहिल्यानंतर गुरुवारी, 11 नोव्हेंबरला सोन्याची किंमत 49,292 रुपयांवर पोहोचली. ही नऊ महिन्यांतली सर्वोच्च पातळी आहे. सोन्याच्या दरातली तेजी कायम राहिली आहे. एमसीएक्समध्ये अंतिम व्यवहाराच्या सत्रात चांदीची किंमतही 0.27 टक्क्यांनी वाढून 67 हजार 148 रुपये प्रति किलो या पातळीवर बंद झाली आहे. जिंस बाजाराच्या जाणकारांच्या म्हणण्यानुसार, वर्षाअखेरीपर्यंत सोने आणि चांदीच्या (Silver) किमतीतली तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. जागतिक महागाई आणि सोन्या-चांदीची औद्योगिक क्षेत्रातली मागणी येत्या काही महिन्यांपर्यंत अशीच राहील. सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या किमतीत 2021 च्या अखेरीपर्यंत वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, MCX वर सोन्याची किंमत 51 हजार रुपये प्रति तोळा एवढी होण्याचा अंदाज आहे. तसंच, चांदीची किंमत या वर्षाच्या अखेरीपर्यंत प्रति किलोग्रॅम 72 हजार ते 74 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. IIFL Securities मध्ये कमोडिटी अँड करन्सी ट्रेडचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले अनुज गुप्ता यांनी सांगितलं, की वाढती वैश्विक चलनवाढ, कमजोर अमेरिकी डेटा, सोन्या-चांदीची वाढती औद्योगिक मागणी आणि बुलियनमध्ये गुंतवणूक आदी कारणांमुळे सोन्याच्या किमती वाढत चालल्या आहेत. हे सगळं पुढचे काही महिने चालू राहू शकेल. त्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतीतली वाढ या वर्षाच्या अखेरीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत सोन्याची किंमत 10 ग्रॅम्सना 50 हजार ते 51 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. चांदीच्या किमती एमसीएक्सवर 72 हजार ते 74 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात. हे ही वाचा- तुम्हीही मृत व्यक्तीच्या बँक खात्यातून किंवा एटीएममधून पैसे काढत आहात? मग जाणून स्वास्तिका इन्व्हेस्टमार्टचे अभिषेक चौहान म्हणाले, की जगभरात तुटवड्यामुळे महागाई वाढत आहे. अन्नधान्य, खाद्यतेल, धातू आणि वीज आदींसह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. पुरवठ्यातल्या अडचणी लवकर संपण्याची शक्यता नाही. ही परिस्थिती सुधारण्यासाठी वर्षभराचा किंवा त्याहून अधिक कालावधी लागू शकतो. महामारीच्या पहिल्या टप्प्यात सगळी परिस्थिती सर्वसामान्य होती; मात्र आता औद्योगिक मागणी वाढत आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीत तेजी अपेक्षित असून, चांदीच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. तांत्रिकदृष्ट्या सोनं आणि चांदीच्या किमतींनी आपला अपट्रेंड पुन्हा सुरू केला आहे. येत्या काळात तो नवा उच्च स्तर गाठू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.