वाराणसी : गंगा विलास क्रूझ वाराणसीमध्ये पोहोचली आहे. अत्यंत उत्तम दर्जाची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे. 5 स्टार हॉटेल्ससारख्या उत्तम रूम, खाण्याची सोय, याशिवाय स्मोकिंग झोन, संस्कृतीचा वारसा दाखवणारे विविध कार्यक्रम या क्रूझवर ठेवण्यात आले आहेत. 52 दिवस 3200 किलोमीटर या क्रूझचा प्रवास असणार आहे. ही क्रूझ 27 नद्यांना पार करून जाणार आहे. बनारस ते दिब्रुगड पर्यंत बांगलादेशातील ढाकामार्गे जाईल अशी माहिती मिळाली आहे. या क्रूझमध्ये १८ खोल्या असतील. ज्यामध्ये 36 लोक प्रवास करू शकतात. प्रवाशांसोबतच 36 क्रू मेंबर्सहीयामध्ये असणार आहेत. या क्रुझमध्ये एक फिल्टरेशन प्लांट आहे, ज्यामुळे गंगेचे पाणी फिल्टर करून ते आंघोळीसाठी आणि इतर कामासाठी वापरले जाईल. या क्रूझचा स्वतःचा एसटीपी प्लांट आहे, ज्यामुळे गंगेत प्रदूषण होणार नाही. या जहाजात ४०० लिटरची इंधन टाकी आहे, त्यामुळे साधारण 40 दिवस इंधनाचा तुटवडा भासणार नाही. क्रूझमध्ये स्पा, जिम, लायब्ररी सारख्या सुविधा देखील मिळणार आहेत.
क्रूझमध्ये एका व्यक्तीचे भाडे एका रात्रीसाठी 25 ते 50 हजार दरम्यान असेल अशी माहिती मिळाली आहे. गंगा विलास क्रूझ बनारसहून पाटणा, कलकत्ता, ढाका ते गुवाहाटी आणि त्यानंतर काझीरंगा या मार्गाने दिब्रुगडला पोहोचेल. एकूण 52 दिवसांचा प्रवास असेल. आतापर्यंत 31 प्रवाशांनी बुकिंग केलं असून ते स्विझर्लंड ट्रॅव्हल कंपनीकडून येत असल्याची माहिती मिळाली आहे.
यामुळे पर्यटन वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. प्रमुख शहरातील 50 पर्यटनस्थळ घेऊन ही क्रूझ पुढे जाणार आहे.
यामुळे पर्यटनाच्या नव्या युगाची सुरुवात असेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारीला या क्रूझला हिरवा झेंडा दाखवून त्याचं उद्घाटन करणार आहेत.