Forbes 2020: जगातल्या Top 100 बलशाली स्त्रियांची यादी जाहीर; निर्मला सीतारामन यांच्यासह 4 भारतीय

Forbes 2020: जगातल्या Top 100 बलशाली स्त्रियांची यादी जाहीर; निर्मला सीतारामन यांच्यासह 4 भारतीय

Forbes ने दरवर्षीप्रमाणे मोठी ताकद असलेल्या जगातल्या 100 स्त्रियांची (Top 100 most Powerful Women) यादी प्रसिद्ध केली आहे. कोण कोण आहे त्यात? वाचा सविस्तर..

  • Share this:

न्यूयॉर्क, 9 डिसेंबर : फोर्ब्स मासिकाने (Forbs) यंदाची (2020) जगातील टॉप 100 शक्तिशाली महिलांची यादी नुकतीच जाहिर केली आहे. या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman), अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा कमला हॅरिस (Kamala Harris), बायोकॉन कंपनीच्या संस्थापक किरण मुजूमदार- शॉ आणि एचसीएल एंटरप्राईजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोशनी नाडर-मल्होत्रा यांचा समावेश आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर अॅजेंला मार्केल यांनी या यादीत सलग दहाव्या वर्षी प्रथम स्थान राखलं आहे. 17 व्या वार्षिक फोर्ब्स पॉवर लिस्टमध्ये 30 देशांतील महिलांचा समावेश आहे.

याबाबत फोर्ब्सने म्हटले आहे, की यादीत 10 देशांच्या प्रमुख, 38 सीईओ आणि 5 मनोरंजन क्षेत्राशी निगडीत महिलांचा समावेश आहे. जरी त्या वेगवेगळ्या वयाच्या, राष्ट्रांच्या आणि विविध कार्यक्षेत्रातील आहेत, पण त्यांनी 2020 मधील आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्या क्षमतेचा वापर अत्यंत कुशलतेने केलेला आहे. निर्मला सीतारामन या यादीत 41 व्या स्थानावर तर रोशनी नाडर-मल्होत्रा 55 व्या स्थानावर आहेत. किरण मुजुमदार– शॉ 68 व्या क्रमांकावर आहेत. लॅंडमार्क समूहाच्या प्रमुख रेणुका जगतियानी या या यादीत 98 व्या स्थानावर आहेत.

अॅजेंला मार्केल सलग 10 व्या वर्षीही पहिल्या स्थानावर आहेत. याबाबत फोर्ब्सने म्हटले आहे, की मार्केल या युरोपातील एक प्रमुख नेत्या आहेत. जर्मनीला (Germany) मोठ्या अर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी त्या प्रयत्नशील असून, एका मोठ्या अर्थव्यवस्थेचे त्या प्रतिनिधीत्व करतात. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध करीत 10 लाख शरणार्थींना जर्मनीत राहण्याची परवानगी देणाऱ्या मार्केल यांचे नेतृत्व अत्यंत मजबूत आहे. परंतु, मार्केल यांचा कार्यकाळ संपल्यावर त्यांची जागा कोण घेणार असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत.

श्वेतवर्णीय नसलेल्या परंतु, अमेरिकेच्या (America) उपाध्यक्षपदावर विराजमान झालेल्या कमला हॅरिस (Kamala Hariss) या पहिल्या महिला आहेत. या यादीत त्या तिसऱ्या स्थानावर आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडमध्ये (Newzeland) सक्तीचा लॉकडाउन आणि होम क्वारंटाईन जाहिर करुन नागरिकांना कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेपासून वाचवणाऱ्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. जानेवारीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी अत्यंत कठीण अशी योजना राबवणाऱ्या तैवानच्या (Taiwan) राष्ट्रपती साई इंग वेन या यादीत 37 व्या स्थानावर आहेत. त्यांच्या योजनेमुळे 2.3 कोटी लोकसंख्या असलेल्या तैवानमध्ये केवळ सात लोकांचाच कोरोनामुळे (corona) मृत्यू झाला. या यादीत यंदा अशा 17 नवीन महिलांचा समावेश करण्यात आला आहे की ज्यांनी जागतिक महामारीच्या कालावधीत बदलत्या समाजाच्या प्रत्येक आघाडीवर बहुमोल असे योगदान दिले आहे.

अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी युनायटेड पार्सल सर्व्हिसच्या नव्या CEO कॅरोल टोम या यादीत 11 व्या स्थानावर आहेत तर कॅलिफोर्निया येथील क्लोरेक्स कंपनीच्या प्रमुख लिंडा रेंडले 87 व्या स्थानावर आहेत. कोरोनाकाळात अमेरिकेतील नागरिक एकमेकांच्या संपर्कात राहावेत आणि स्वच्छतेचे पालन व्हावे, या उद्देशाने या महिला अत्यावश्यक सेवा पुरवत आहेत.

कोरोनावर (corona) तसेच त्यावरील औषधांवर संशोधन करणाऱ्या कंपन्यांमधील शक्तिशाली महिलांमध्ये प्रथम स्थानावर असलेल्या आणि 2021 मधील लसीकरण कार्यक्रमाच्या आयोजनाची विशेष जबाबदारी असलेल्या सीव्हीएस हेल्थच्या कार्यकारी उपाध्यक्ष आणि भावी सीईओ करेन लिंच फोर्ब्सच्या यादीत 38 व्या स्थानावर आहेत.

या यादीत बिल आणि मिलिंडा गेटस फाउंडेशनच्या सहअध्यक्षा मिलिंडा गेट्स (5 व्या स्थानावर), अमेरिकी हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (7 व्या स्थानावर), फेसबुकच्या मुख्य संचालन अधिकारी शेरिल सैंडबर्ग (22 व्या स्थानावर), बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना (39व्या स्थानावर), ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ व्दितीय (46 व्या स्थानावर), प्रसिद्ध पॉप सिंगर कलाकार रिहाना ( 69 व्या स्थानावर) आणि बेयोन्से (72 व्या स्थानावर) यांचा समावेश आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: December 9, 2020, 5:37 PM IST

ताज्या बातम्या