मुंबई, 22 जून: मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. कारण, या ठिकाणी असलेल्या शेअर मार्केटमध्ये दररोज शेकडो कोटी रुपयांची उलाढाल होते. हजारो लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. ज्या व्यक्ती शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. मुंबईत शेअर बाजाराला समांतर एक डमी शेअर बाजार चालवणाऱ्या व्यक्तीला कांदिवली येथील फ्लॅटमधून अटक करण्यात आली आहे. जतीन मेहता असं या व्यक्तीचं नाव आहे. जतीन मेहताच्या या अवैध ट्रेडिंगमध्ये मार्च 2023 ते 20 जून 2023 या काळात सुमारे 4672 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. टॅक्स न मिळाल्यानं सरकारचं सुमारे एक हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. ‘नवभारत टाइम्स’नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. डीसीपी राजतिलक रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकारच्या ट्रेडिंगला बॉक्स किंवा डब्बा ट्रेडिंग असंही म्हणतात. गुन्हे शाखेला एनएसई आणि एमसीएक्स टीमकडून आरोपीबाबत बरीच माहिती मिळाली होती. त्या आधारावर कारवाई करत गुन्हे शाखेनं आरोपीकडून पाच मोबाईल फोन, एक लॅपटॉप, एक राउटर, एक टॅब, एक पेन ड्राईव्ह आणि बरीच रोकड जप्त केली आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी अभिजित जाधव यांनी या डमी शेअर मार्केटची आणि आरोपीच्या संपूर्ण मोडस ऑपरेंडीची सविस्तर माहिती दिली. आरोपी मेहतानं MOODY नावाचं अॅप तयार केलं होतं. त्याच्या शेअर मार्केटचा संपूर्ण व्यवसाय हवालाद्वारे चालवला जात होता. आरोपी त्याच्या अॅपचा पासवर्ड लोकांना देत असे. एखाद्या स्टॉक ब्रोकरप्रमाणे मेहता काम करत होता. त्यानं गुंतवणूकदारांकडून प्रत्येकी 50 हजार रुपये डिपॉझिटही घेतलं होतं. त्याच्या अॅपवर गेल्यावर सकाळी आणि दिवसभर वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव यायचे. लोक त्याच्यामार्फत शेअर्सची खरेदी-विक्री करत असत. दैनंदिन व्यवहाराचा तपशील अॅपमध्येच ठेवला जात असे. दर गुरुवारी हिशेब होत असे. कॅश स्वरुपात देत होता परतावा शेअरमध्ये एखाद्याला नफा झाला तर जतीन त्याच्या शेअर ब्रोकरचं कमिशन कापून समोरच्या व्यक्तीला कॅश पैसे पाठवत असे. जर एखाद्याला स्टॉकमध्ये नुकसान झालं असेल तर ते पैसे त्याच्या डिपॉझिट रकमेतून वजा केले जात होते. पण तेवढीच रक्कम पुन्हा समोरच्या व्यक्तीकडून मागितली जात असे, जेणेकरून डिपॉझिट 50 हजार रुपये शिल्लक राईल. जतीन मेहताच्या ग्राहकांची संख्या जास्त असल्याने त्याच्याकडे डिपॉझिट म्हणून भरपूर रक्कम जमा होती. टॅक्समध्ये फायदा या डमी शेअर मार्केटमध्ये नफा कमवल्यावर समोरच्या व्यक्तीला भरपूर टॅक्स बेनिफिट मिळत असे. जर एखाद्यानं वर्षभरात 15 ते 20 लाख रुपये कमवले तर त्याला 15 ते 30 टक्के टॅक्स भरावा लागतो. मात्र, या डमी शेअर मार्केटमध्ये संपूर्ण व्यवसाय हवाला आणि रोखीच्या माध्यमातून होत असल्याने शेअरमधून नफा कमवणाऱ्या व्यक्तीला कोणताही टॅक्स भरावा लागत नव्हता. कायदेशीर शेअर ट्रेडिंगमध्ये, गुंतवणूकदाराला ब्रोकर चार्जव्यतिरिक्त कमॉडिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स (सीटीटी) आणि सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी) भरावा लागतो. काय आहे बॉक्स ट्रेडिंग? मुंबईतील बनावट शेअर मार्केटला बॉक्स ट्रेडिंग असंही म्हणतात. शेअर्सच्या ट्रेडिंगचं हे बेकायदेशीर मॉडेल आहे. या मध्ये, ट्रेडिंग रिंग ऑपरेटर स्टॉक एक्स्चेंज प्लॅटफॉर्मच्या बाहेर बेकायदेशीरपणे इक्विटी खरेदी करतात. एक अॅप तयार करून फिक्स रिटर्नची लालूच देतात. आयकर विभागाच्या नजरेपासून सुरक्षित राहाता यावं, म्हणून हवालाद्वारे पैशांचा व्यवहार केला जातो. लोकांना वाटतं की ते शेअर बाजारात पैसे गुंतवत आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यांची फसवणूक होत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.