नवी दिल्ली 21 मार्च : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलसह अनेक गोष्टींच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या किमतीतही मागील काही दिवसात वाढ झाली असून यामुळे किचनचं बजेट बिघडलं आहे. मोहरीच्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होण्याचं कारण कोरोना आणि लॉकडाऊनंतर पूर्वपदावर येणारी स्थिती असल्याचंही म्हटलं जात आहे. याच कारणामुळे मोहरीच्या मागणीत वाढ झाल्यानं दरांवर याचा परिणाम झाला आहे. मागील एका वर्षात मोहरीच्या किमतींमध्ये 31 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. अशात आता सामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. खाद्यतेलाच्या किमती (Edible Oil Prices Fall) सध्या दोन ते तीन रुपयांनी घसरल्याचं पाहायला मिळत आहे. लवकरच मार्केटमध्ये याचा आणखी परिणाम पाहायला मिळेल. जाणून घ्या आज किती स्वस्त झालं तेल - शनिवारी मोहरीचं तेल, रिफाइंड आणि पाम तेलाच्या किमतीत आणखी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मोहरीच्या तेलाचे दर घसरुन 2200 वर आले आहेत. याआधी हे दर 2270-2280 रुपये आणि रिफाइंडचे दर वाढून 2150 रुपये 15 लीटर इतके झाले होते. आता किरकोळ बाजारात मोहरीच्या तेलाच्या 145-150 या दरात दोन रुपयांची घसरण झाली आहे. तसंच रिफाइंडच्या दरात एक ते दोन तर पाम तेलाच्या दरातही तीन ते चार रुपयांची घट झाली आहे. होळीच्या आधी दरात आणखी घसरणा होण्याची शक्यता असल्यानं महागाईच्या काळात सामान्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. यंदा मोहरीच्या उत्पादनात 14 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या दुसऱ्या प्रगत अंदाजानुसार, मोहरीचे उत्पादन यंदा 1.04 कोटी टन इतकं होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी मोहरीचं उत्पादन 91.2 लाख टन इतकं झालं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.